पाकिस्तानमध्ये हिंदू अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या या नित्याच्याच आहेत. मात्र असे असतांनाही तिथे राहत असलेल्या हिंदूंनी अतिशय खडकर परिस्थितीमध्ये आपले अस्तित्व टिकवले आहेच, शिवाय तेथील हिंदू अल्पसंख्याकांना बळ देईल, अशी कामगिरीही केली आहे. यातच एक नाव सध्या चर्चेत आहे, ते म्हणजे, राजेंद्र मेघवार. सिंध प्रांतातील ग्रामीण आणि अविकसित बदीन भागातील राजेंद्र मेघवार यांनी पाकिस्तानमध्ये इतिहास रचला आहे. पाकिस्तानचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी होण्याचा मान राजेंद्र यांना मिळाला असून ही पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदूंसाठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट ठरली आहे. राजेंद्र मेघवार यांनी फैसलाबादच्या गुलबर्ग भागात सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून आपली जबाबदारी स्वीकारली असून हा आपल्या जीवनातील सर्वोच्च क्षण असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. राजेंद्र मेघवार यांनी पाकिस्तानात इतिहास रचला आहे. त्यांनी नागरी सेवा प्राधिकरण परीक्षा, म्हणेजच सीएसएस उत्तीर्ण करुन पाकिस्तानमधील पहिले हिंदू अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. पाकिस्तान हिंदू मंदिर व्यवस्थापन समितीचे कृष्णा शर्मा यांनी राजेंद्र यांचे कौतुक करत ही माहिती सोशल मिडियावर शेअर केली आहे. राजेंद्र यांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ महत्त्वपूर्ण कामगिरी केली नाही तर समाजाला अभिमानही मिळवून दिला आहे. (Rajendra Meghwar)
त्यांचे हे यश समाजातील इतर तरुणांना प्रेरणादाई ठरणार असल्याची आशा कृष्णा शर्मा यांनी व्यक्त केली आहे. सिंध प्रांतातील ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या बदीन येथील रहिवासी असलेल्या राजेंद्र मेघवार यांनी सुरुवातीपासून पोलीस दलात अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले होते. यातून आपल्या समाजाची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. याशिवाय अल्पसंख्याक समाजातील असूनही यश मिळवता येते हे मेघवार यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने सिद्ध केले आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना, राजेंद्र मेघवार यांना पाकिस्तानमधील हिंदू अल्पसंख्याकांना मदत करण्याची संधी मिळणार आहे. फैसलाबादमध्ये त्यांची नियुक्ती झाल्यामुळे तेथील पोलीस दलांनेही राजेंद्र यांचे स्वागत केले आहे. राजेंद्र मेघवार यांची फैसलाबादमध्ये नियुक्ती केल्याने येथील अल्पसंख्याक समाजाचे प्रश्नही समजून घेता येतील तसेच सर्वसामान्यांचा पोलिसांवरील विश्वासही वाढेल अशी अपेक्षा पोलीस दलातून व्यक्त होत आहे. (International News)
अभिमानस्पद गोष्ट अशी की, राजेंद्र मेघवार यांच्याशिवाय इतर पाच हिंदू विद्यार्थ्यांनीही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रूपमती मेघवार, पूजा ओड या दोन तरुणींचाही समावेश आहे. शिवाय सुनील मेघवार, जीवन रिबारी आणि भीष्म मेघवार अशा तरुणांनीही प्रतिष्ठित सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यामुळे हे सर्व तरुण पाकिस्तानमधील प्रशासन आणि नोकरशाहीमध्ये वरिष्ठ पदे भुषवणार आहेत. रूपमती मेघवार ही तरुणी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून रुजू होणार आहे. यापूर्वीही पाकिस्तानमध्ये हिंदू अल्पसंख्यांक समुदयातील तरुण सरकारी नोकरीमध्ये वरिष्ठ पदावार आले आहेत. त्यामध्ये पुष्पा कोहली यांचे नाव आहे. त्यांना पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सहायक उपनिरीक्षक पद मिळाले आहे. सुमन पवन भोडानी यांची दिवाणी आणि न्यायदंडाधिकारी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. (Rajendra Meghwar)
========
हे देखील वाचा : राज्यातले देवेंद्र उद्या केंद्रातले नरेंद्र होऊ शकतात !
========
या सर्वांमध्ये राजेंद्र मेघवार यांची नियुक्ती अधिक गौरवशाली ठरली आहे. भारताच्या फाळणीनंतर मुस्लिम देश म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली. मात्र तिथे राहिलेल्या हिंदू समाजाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. येथील समाज अल्पसंख्यांक असून त्यामध्ये दलितांची संख्या जास्त आहेत. गावात राहणा-या हिंदूंची परिस्थिती तर अधिक बिकट आहे. हे सर्व लोक मोकळ्या जागेवर घरे बांधून राहतात. केव्हाही गावातील जमीनदार येऊन त्यांना घर रिकामे करायला सांगतात. काही हिंदू आपली नावे बदलून मुस्लिमांची नावे ठेवत आहेत. त्यामुळे आपल्या घरातील मुली, महिला सुरक्षित राहतील अशी त्यांची अपेक्षा आहे. पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स लोकसंख्या 2023 च्या अहवालानुसार, पाकिस्तानातील बहुतांश हिंदू लोकसंख्या ग्रामीण भागात राहत आहेत. त्यात शिख आणि जैन धर्मातीलही नागरिक आहेत. या सर्वांसाठी शिक्षणाचीही कुठलिही सोय नाही. स्थानिक शाळांमध्ये उर्दु भाषेचाच वापर असून हिंदूनाही त्याच भाषेत शिकावे लागते. या सर्व परिस्थितीवर मात करत राजेंद्र मेघवार यांची झालेली नियुक्ती ही तमाम हिंदूंना प्रेरणादाई ठरणार आहे. (International News)
सई बने