Home » ’रागा’ च्या ‘यंग ब्रिगेडमधला’ विश्वासू शिलेदार – राजीव सातव…..

’रागा’ च्या ‘यंग ब्रिगेडमधला’ विश्वासू शिलेदार – राजीव सातव…..

by Correspondent
0 comment
Rajeev Satav | K Facts
Share

राजीव सातव यांना आपली आई आणि माजी मंत्री रजनीताई सातव यांच्याकडून बालवयातच राजकारणाचे बाळकडू मिळाले होते. राजीव सातव यांच्या आई रजनी सातव काँग्रेसच्या आमदार आणि राज्यसभेच्या खासदार होत्या. राजीव सातव यांनी पुण्यात फर्ग्यूसन कॉलेजमधून एम.ए. तर आय.एल.एस. लॉ कॉलेजमधून एल.एल.एम. ची पदवी घेतली होती.

राजीव सातव (Rajeev Satav) यांनी आपली राजकीय कारकीर्द पंचायत समितीपासून सुरू केली. २००२ मध्ये कळमनुरी पंचायत समितीच्या मसोड गणाचे ते सदस्य झाले. २००७ मध्ये हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये सदस्य व कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती झाले. २००९ मध्ये शिवसेनेचे दोन टर्मचे आमदार आणि खासदार असलेले सुभाष वानखेडे यांना पराभूत करून कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. याच काळात त्यांनी आधी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व नंतर अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम बघितले.

Congress MP Rajeev Satav Loses Battle To Covid-19
Congress MP Rajeev Satav Loses Battle To Covid-19

२०१४ च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले. त्यातले हिंगोलीतून निवडून आलेले राजीव सातव एक. त्यामुळेच त्यांच्या विजयाची दखल महाराष्ट्रातल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत घेण्यात आली. राजीव सातव यांनी केवळ १८ वर्षात पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

हिंगोलीच्या खासदारपदी असताना राजीव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला होता. लोकसभेचे खासदार असताना २०१७ मध्ये आधार विधेयकावर विरोधी पक्षाकडून सर्वांत आधी बोलण्याची संधी त्यांना देण्यात आली. संसदेत भाजपच्या (BJP) विरोधात आक्रमकपणे बोलणाऱ्या काँग्रेसच्या (Indian National Congress) यंग ब्रिगेडचे ते महत्त्वाचे वक्ते मानले जात होते. संसदेत १०७५ प्रश्न विचारत २०५ वादविवादांमध्ये राजीव सहभागी झाले होते. संसदेत राजीव सातव यांची ८१ टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. राजीव यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

Rajeev Satav-Former Member of the Lok Sabha
Rajeev Satav-Former Member of the Lok Sabha

राजीव सातव हे अनेक संसदीय समित्यांचे सदस्य होते, ज्यात रेल्वेची स्थायी समिती, संरक्षण विषयक स्थायी समिती, इतर मागासवर्गीयांची कल्याण समिती, भूसंपादन विधेयकांची संयुक्त संसदीय समिती आणि युवा कार्य व क्रीडाविषयक सल्लागार समिती यांचा समावेश होता.  राजीव सातव हे कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत संसदीय समितीचे सदस्य होते. संसद अधिवेशन व संसदीय समितीच्या बैठकीत विधानमंडळ व्यवसायाची तपासणी करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले होते.

राजीव यांच्यावर २०१७ साली झालेल्या गुजरातमधील निवडणुकीत सौराष्ट्रच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला जोरदार टक्कर दिली आणि राजीव यांच्या प्रयत्नांना यश मिळून ह्या निवडणुकीत सौराष्ट्र प्रांतातून काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यानंतर राजीव यांच्याकडे संपूर्ण गुजरातच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तसच ह्याच काळात पंजाब विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या स्क्रिनिंग कमीटीचेदेखील ते सदस्य होते. २०१९ ची लोकसभा निवडणूक ते लढले नाहीत. मात्र पक्षाने आणि स्वतः राहुल गांधीजींनी त्याच्या कामाची दखल घेत एप्रिल २०२० मध्ये राज्यसभेत हुसेन दलवाई यांची जागा रिक्त होताच राजीव यांची त्या जागी निवड करत त्यांना वरच्या सभागृहात पाठवले होते.

 Congress Mp Rajeev Satav
Congress Mp Rajeev Satav

२२ एप्रिल २१ रोजी राजीव सातव यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कॅाग्रेसच्या या युवा नेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर तात्काळ उपचार सुरु झाले. दोन दिवसांतच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले. १०मे रोजी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. यानंतर राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळवण्यात आले. पुढे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचेही समजले. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांची तब्येत सुधारेल अशी अपेक्षा होती पण त्यांना सायटोमेगॅलो या नवीन विषाणूचा संसर्ग झाला. कोरोनामुळे सातव यांचा घात झाल्याचं समोर येत असलं तरी ‘सायटोमेगॅलो व्हायरस’ हा त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालं आहे! अनेकांनी अद्याप या व्हायरसचं नाव देखील ऐकलेलं नाहीये.

संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॅा इश्वर गिलाडा यांनी दिलेल्या माहितीनुसार…. “सायटोमेगॅलो व्हायरस हा एक संधीसाधू रोग म्हणून ओळखला जातो. गरोदर महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे महिलांची TORCH टेस्ट केली जाते. या व्हायरसच्या संसर्गामुळे दृष्टी जाऊ शकते. रॅटिनावर याचा परिणाम होतो. काही लोकांमध्ये याचं इन्फेक्शन फुफ्फुसात होतं. याला सीएमई न्यूमोनिया म्हणतात. काही रुग्णांना यामुळे डायरियाचा त्रास होण्याची शक्यता असते. मेंदूमध्ये देखील या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते”.

 Rajiv  Satav was almost same for Rahul Gandhi like Ahmed Patel for Sonia
Rajiv Satav was almost same for Rahul Gandhi like Ahmed Patel for Sonia

आपल्या वीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सातव यांनी देश पातळीवर छाप पाडली. राजीव सातव यांना युवा पिढीसमोर राजकारणाच्या क्षेत्रात आदर्श निर्माण केल्याबद्दल एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नन्स, पुणे यांच्यातर्फे ‘भारत अस्मिता जनप्रतिनिधि श्रेष्ठ पुरस्कार’ने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ते राहुल गांधीच्या जवळ गेले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे असे अनेक राजकीय नेते मंडळी मानतात.

सध्या संकट कोणतेही असो राजकीय, सामाजीक किंवा आर्थिक मग ते देशपातळीवर असो अथवा राज्यपातळीवर… सत्तेमधले आणि विरोधातले एकमेकांवर कायमच कुरघोडी करताना आपल्याला पहायला मिळतात. कित्येकदा परिस्थिती नसतानादेखील अत्यंत खालच्या पातळीचं कुरघोडीचं राजकारण सामान्यांना बघायला मिळतं. मात्र पराकोटीचे राजकीय मतभेद असूनदेखील सध्या सातव यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होताना पहायला मिळाली.

राजीव सातव नावाचे उमदे व्यक्तिमत्त्व आपल्यात नाही याचे दु:ख सर्वपक्षीय नेत्यांना आहे असे निदान ट्विटरवरूनतरी स्पष्ट झाले. राजकीय मतभेद आपल्या ठिकाणी आणि माणूस म्हणून एक चांगला राजकीय सहकारी गमावल्याची जाणीव आपल्या ठिकाणी, असं समीकरण सध्या राजकीय वर्तुळात दिसून येतय.

शब्दांकन- शामल भंडारे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.