भारतातील खाद्यसंस्कृती विविधतेनं संपन्न आहे. जशी पावलापावलावर भाषा बदलते, तशीच खाद्यसंस्कृतीही बदलते. प्रत्येक भागात तेथील हवामानानुसार पदार्थ केले जातात आणि या पदार्थांची चव अर्थातच न्यारी असते. काही भाज्या या त्या प्रांताची ओळख होतात. मिसळ म्हटलं की महाराष्ट्राचं नाव येतं तसंच गट्टे की सब्जी म्हटलं की, राजस्थान या राज्याचं नाव पुढे येतं. राजस्थानमध्ये गट्टे की सब्जी ही सर्व घरात होणारी भाजी आहे. पण याबरोबरच राजस्थानमध्ये आणखी एक भाजी बनवली जाते. ही भाजी आरोग्यदायी आहे. या भाजीचा महिमा एवढा आहे की, तिला आता परदेशातही मोठी मागणी आहे. या भाजीला सांगरीची भाजी (Sangri vegetables) म्हणतात. मुळ्याच्या भाजीच्या जशा लांब शेंगा असतात, तशाच लांब, बारीक शेंगा या सांगरीच्या भाजीच्या असतात. ही भाजी जेवढी लोकप्रिय आहे, तेवढीच ती महाग आहे. जवळपास 1200 रुपये किलोपर्यंत ही सांगरीची भाजी (Sangri vegetables) मिळते. अनेकवेळा त्यापेक्षाही या भाजीची किंमत जास्त असते. पण ही महागडी भाजी वर्षातून किमान एकदा तरी खावी असा आग्रह प्रत्येक राजस्थानी नागरिकाचा असतो. कारण या भाजीमुळे अनेक रोगांवर मात करता येते. अगदी कॉलोस्ट्रोल ते रक्तातील साखरेवर या भाजीमुळे नियंत्रण ठेवता येते. भारतात मिळणा-या महागड्या भाज्यांमध्ये सांगरीच्या भाजीचा उल्लेख होतो. अर्थात ती कितीही महाग असली तरी राजस्थानी घरात वर्षातून किमान एकदा तरी ही भाजी केली जाते आणि एखाद्या उत्सवासारखे त्यावेळी सर्व वातावरण असते.

राजस्थानची ओळख असणारी सांगरी ही भाजी (Sangri vegetables) भारतातील सर्वात महागडी भाजी आहे. या भाजीच्या एका किलोसाठी 1200 रुपये मोजावे लागतात. काजू, बदाम आणि पिस्त्यापेक्षाही महाग असलेल्या या भाजीमध्ये त्यापेक्षाही अधिक गुण आहेत. राजस्थानच्या चुरू आणि शेखावती भागात ही भाजी सर्वाधिक आढळते. सध्या राजस्थानमध्ये या भाजीची किंमत 1200 रुपये किलोपेक्षा जास्त आहे. मात्र, जेव्हा त्याचे उत्पादन जास्त असते तेव्हा ते 700 ते 800 रुपये किलो दराने विकले जाते. या भाजीचे उत्पादन गिल्डू नावाच्या रोगामुळे कमी झाले आहे. जवळपास निम्म्यावर हे उत्पादन आले आहे. त्यामुळे बाजारात या भाजीची किंमत वाढली आहे. आणखी एक कारण सांगितले जाते, ते म्हणजे, सांगरी भाजी मोठ्याप्रमाणात परदेशात पाठवली जाते. त्यामुळे ही भाजी खूपच चढ्या दरात विकली जाते. यात औषधी गुणधर्म अधिक असल्यानं त्याची इतर राज्यातही मागणी आहे, परिणामी या भाजीची किंमत प्रत्येक वर्षी वाढती आहे. सांगरीची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली मानली जाते. या भाजीचा इम्युनिटी बूस्टर म्हणूनही वापर केला जातो. या भाजीमध्ये लोह, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रथिने, फायबर आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळून येतात. राजस्थानमध्ये जिथे काही भागात भाज्या मिळत नाहीत. तिथे ही भाजी अगदी लोणच्यासारखी खाल्ली जाते. तसेच अनेक दिवसांचा प्रवास असेल तर या भाजीला प्राधान्य दिले जाते.
आठवड्यातून एकदा ही भाजी खाल्ल्यास अनेक रोगांवर मात करता येते असे तज्ञ सांगतात. सांगरीची भाजी चवीलाही खूप स्वादिष्ट असते. स्थानिक राजस्थानी या भाजीचे अनेक प्रकार करतात. साठवणुकीच्या पदार्थातही या भाजीचा समावेश असतो. विशेषतः जी मंडळी शाकाहरी आहेत, त्यांची पहिली पसंती या सांगरीच्या भाजीला असते. उष्ण हवामान असलेल्या राजस्थानमध्ये शांगरीची भाजी शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. या भाजीच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. शिवाय सांगरीची भाजी पचायला खूप सोपी असते. यामध्ये भरपूर मॅग्नेशियम असते, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. सांगरीमळे हाडेही मजबूत होतात. सांगरीमुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही कमी होते. याबरोबर सांगरीची भाजी हृदय गती आणि उच्च रक्तदाब देखील संतुलित करते. यामध्ये आढळणारे सिरेनिन सी हे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते.
पोटाच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी सांगरी हा उत्तम पर्याय असल्याचे सांगितले जाते. सांगरीमध्ये प्रथिने (Sangri vegetables) तसेच फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. सांगरीची भाजीमध्ये प्रथिने भरपूर असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजनही नियंत्रणात येते.
=======
हे देखील वाचा : लालचुटक लिचीचे फायदे…
======
सांगरीमध्ये आढळणारे मॅग्नेशियम हाडांची घनता वाढवते तसेच ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी करते. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम तसेच झिंक आणि कॅल्शियम आढळते. त्याचाही फायदा होतो. ही भाजी जेवढी उपयोगी आहे, तेवढीच ती करण्यासही सोप्पी आहे. तसेच राजस्थानमध्ये ती लोणच्यासारखी तयार केली जाते. त्यामुळे सांगरीची भाजी अनेक दिवस टिकतेही. या सर्व गुणांमुळे सांगरीच्या भाजीची किंमत अधिक आहे. गेल्या काही वर्षात ही सांगरीची भाजी चढ्या दरानं विक्री होत आहे. यावेळी तर तिची किंमत 1200 रुपयांपर्यंत गेली आहे. अर्थात सांगरीची भाजी कितीही महाग झाली तरी राजस्थानच्या प्रत्येक घरात ती वर्षातून एकदा तरी करुन खाल्ली जाते.
सई बने
