दसरा मेळावे अपेक्षेप्रमाणे पार पडले. त्यातल्या त्यात मुंबईतल्या दसरा मेळाव्यांत पुन्हा एकदा वार प्रतिवार पाहायला मिळाला. शिवसनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाचे नेत्यांनी एकमेकांविरोधात तुफान फटकेबाजी केली. आता या मेळाव्यातील वक्तव्यांचा कोणाला किती फायदा होणार याची चर्चा चालू होत असतानाच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. महत्वाचं म्हणजे दसऱ्याच्या मेळाव्यांच्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेली मोठी घडामोड ठरली म्हणजे माजी आमदार राजन तेली यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश. (Rajan Teli)
ठाकरेंचे एकनिष्ठ समजले जाणारे माजी आमदार राजन तेली यांनी एकनाथ शिंदेंची साथ देण्याचा निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. नेस्को येथे शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यातच त्यांनी प्रवेश केला. राजन तेली हे विधानसभा निवडणूकपूर्वी भाजपमधून ठाकरे यांच्या शिवसेनेत आले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांचा दीपक केसरकर यांच्या विरोधात पराभव झाला होता. आता मात्र त्यांनी शिंदे गटातच प्रवेश केला आहे. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणातून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता ठाकरे कोकणात केवळ नाममात्र उरलेत का ? यावर चर्चा घडू लागल्यात.
राजन तेलींनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने सिंधुदुर्गात विविध चर्चांनाही उधाण आले आहे. माजी आमदार राजन तेली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज व्यवहारातील फसवणूक प्रकरणी यांच्यासह आठ जणांविरोधात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने गंभीर दखल घेतली होती. त्यामुळेच मग जिल्हा बँकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी शिंदे सेनेत प्रवेश केल्याची चर्चा रंगली आहे.(Rajan Teli)
मात्र राजन तेली यांचा पक्षप्रवेश हा याही पलीकडे जाऊन पाहिला जात आहे. राजन तेली हे कोकणाच्या राजकारणातील एक महत्वाचं नाव म्हणून पाहिलं जातं. एक शिवसेना शाखाप्रमुख म्हणून राजकारणाची सुरुवात करत राजन तेली सेनेतर्फे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले होते. सोबतच सेनेचे जिल्हाध्यक्षही होते. मात्र 2005 साली नारायण राणेंसमवेत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत तर राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये जाऊन ते विधानपरिषदेचे आमदार झाले, जिल्हा बँकही त्यांच्या ताब्यात आली. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. या काळात राजन तेली सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकारांना कडवी झुंज देत होते. २०१४ आणि २०१९ मध्ये पराभव झाला असला तरी त्यांनी ५० हजारांपेक्षा जास्त मतं घेतली होती. (Political News)
२०२४ मध्ये मग एक पूर्ण सर्कल करत राजन तेली पुन्हा शिवसेनेच्या ठाकरे गटात परतले होते. महत्वाचं म्हणजे दिपक केसरकर यांना कडवी झुंज देण्यासाठी ठाकरेंना एक मोहरा सापडला होता. राजन तेली यांनीहि त्यासाठी भाजपचा त्याग केला होता. अगदी नारायण राणे यांच्यावर टीका करत ते भाजपातून बाहेर पडले होते. मात्र याही वेळी पुन्हा एकदा 2014 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक दीपक केसरकर यांनी शिवसेनेकडून लढवली होती. त्यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार राजन तेली यांचा पराभव केला होता. दीपक केसरकर यांना 70902 मते मिळाली, तर राजन तेली यांना 29710 मते मिळाली. 41 हजारांहून अधिक मताधिक्याने केसरकर विधानसभेवर सलग दुसऱ्यांदा निवडून गेले होते.(Rajan Teli)
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपा व शिवसेनेची युती होती. युतीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाल्याने दीपक केसरकर हे शिवसेनेचे उमेदवार होते. यावेळी राजन तेली यांनी अपक्ष निवडणूक लढवली. केसकरांना 69784 मते मिळाली, तर तेली यांना 56556 मते मिळाली. केसरकर यांना 13 हजार मतांची आघाडी मिळाली. सावंतवाडीतून ते सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले. गेली अनेक वर्षे तेलींनी केसरकरांना कडवी झुंज दिली होती. मात्र राज्यात महायुतीचा जो दारुण पराभव झाला त्याला राजन तेलीही अपवाद ठरले नाहीत आणि पुन्हा एकदा पराभवाची नामुष्की ओढवली.
==============
हे देखील वाचा : Donald Trump : नोबेल शांतता पुरस्कारासाठी तब्बल 338 दावेदार !
==============
मात्र तरीही केसरकरांना एक मजबूत विरोध करत तेलींनी आपली जमिनीवरची ताकद राखली होती.सोबतच सावंतवाडीमध्ये राजन तेली, महाडमध्ये स्नेहल जगताप अशा नेत्यांना घेऊन उद्धव ठाकरेंनी कोकणात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला होता. शिंदे गटाच्या नेत्यांविरोधात तुल्यबळ उमेदवार दिले होते. त्यासाठी असे उमेदवार आयात करण्यात आले होते. मात्र अशा आयात उमेदवारांनी पुन्हा दुसऱ्या पक्षांचा रस्ता धरला आहे. त्यामुळे आता ठाकरेंकडे स्वपक्षाचे नेते नाहीतच मात्र आता बाहेरचे आलेले नेतेही नाहीयेत. त्यामुळे भास्कर जाधव आणि इतर काही स्थानिक छोटे नेते यांच्यावरच पुन्हा एकदा ठाकरेंना अवलंबून राहावं लागणार आहे.(Rajan Teli)
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंधुदुर्गात राणेंची वाढलेली ताकद. दोन आमदार आणि खासदार यांच्या जीवावर सिंधुदुर्गात राणेंची एकहाती ताकद निर्माण होत आहे. त्यातच राणे घराण्याशी जुळवून घेऊन तेली यांनी शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने हा प्रवेश केल्याचाही बातम्या येत आहे. अशावेळी आता सिंधुदुर्गात राणेंची ताकद अजूनच वाढेल. सध्या ठाकरेंकडे माजी आमदार वैभव नाईक यांच्या रूपाने एकच नाव जिल्ह्यात आहे. त्यामुळे सेनेचा बालेकिल्ला उद्धव ठाकरेंच्या पूर्णपणे हातातून गेल्याच चित्र आहे.