राज्यात निवडणूक (Election) संपल्यानंतर आता पुन्हा एकदा पक्षांतराची लाट येण्याची शक्यता आहे. मात्र, या पक्षांतराचा मार्ग हा वन वे असणार आहे. सगळेजण सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महायुतीकडे जोरदार इनकमिंग चालू झालं आहे. याचा सर्वात मोठा धक्का बसत आहे उद्धव ठाकरेंना. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे माजी आमदार आणि पक्षाचे कोकणातील एक महत्वाचे नेते राजन साळवी (Rajan Salvi) हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसला आहे. मात्र,त्याही पलीकडे ठाकरे गट कोकणातून संपतो की काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राजन साळवी नेमके का पक्षांतर करत आहेत? हा ठाकरेंसाठी मोठा धक्का का असेल ? जाणून घेऊ. (Rajan Salvi)
राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील आनंदाश्रमात शक्तीप्रदर्शन करत राजन साळवी यांच्या पक्षप्रवेश सोहळा पार पडेल.
मविआ सरकार (MVA) पडल्यावर राजन साळवी आणि त्यांच्या पत्नीला Anti Corruption Bureau ने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. तरीही, राजन साळवी उद्धव ठाकरेंच्याच बाजूने उभे होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांनी त्यांना सहाय्य न केल्यामुळे राजन साळवी नाराज झाले होते. यामुळे ठाकरे गटात अंतर्गत तणाव निर्माण झाला होता. या तणावावर तोडगा काढण्यासाठी विनायक राऊत आणि राजन साळवी मातोश्रीवर गेले होते, त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विनायक राऊत यांचीच बाजू घेतल्यामुळे त्यांनी ठाकरे गटाला राम राम केला. असं बोललं जात आहे.
राजन साळवी यांची राजकीय कारकीर्द पाहिल्यास १९९३ -९४ च्या सुमारास राजन साळवी शिवसेनेत ऍक्टिव्ह झाले. इतकंच नाही,तर रत्नागिरी नगर परिषदेच्या इतिहासात ते पहिल्यांदाच शिवसेनेचे नगराध्यक्षही झाले. शिवसेनेचे तत्कालीन नेते माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या सहकार्याने त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पदही मिळवलं होतं. राजन साळवी यांची जिल्हाप्रमुख पदाची कारकीर्द यशस्वी ठरली होती. (Rajan Salvi)
आमदारकीचा विचार करायचा झाल्यास २००६ मध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा १६०० मतांनी पराभव झाला होता. मात्र, २००९ मध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघातून २५,००० मतांच्या आघाडीने ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. पुन्हा एकदा २०१४ मध्ये राजापूर विधानसभा मतदार संघातून ४०,००० मतांनी आमदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये सलग तिसऱ्यांदा शिवसेना पक्षातून आमदार झाले. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंपानंतर शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना ठाकरे गटाचे उपनेता केलं होत. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांनी पराभव केला.
त्यानंतर मात्र साळवी यांच्या पक्षांतराच्या बातम्यांनी जोर धरला. सुरवातीला सामंत बंधूंचं असलेलं वजन पाहता ते भाजपात प्रवेश करतील अशा वावड्या होत्या, मात्र अखेर त्यांनी शिंदेंची शिवसेनेचा निवडली. साळवींच्या पक्षप्रवेशाला सामंत बंधूनी विरोधही केला होता. मात्र, एकनाथ शिंदेनी सामंत बंधू आणि राजन साळवी यांची समेट घडवून आणत त्यांचा पक्षप्रवेश फिक्स केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने जिल्ह्यातीलच नव्हे तर कोकणातील एक महत्वाचा नेता गमावला आहे. (Rajan Salvi)
मात्र याही पलीकडे ठाकरेंचा कोकण हा गडही पुरता ढासळल्याचं चित्र आहे. मुबंईत असलेली ताकद आणि मराठी भूमिपुत्रांचा मुद्दा यामुळे सुरवातीपासूनच कोकणावर ठाकरेंची जादू होती. शिवसनेच्या एकूणच जडणघडणीत कोकणचा मोठा वाटा आहे. मात्र आता कोकणात ठाकरेंचा तेवढा दरारा राहिलेला नाही. मागील चार लोकसभा निवडणुकांप्रमाणे याही वेळी कोकणात मोठा विजय मिळविण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यशस्वी झाली नाही. यावेळी लोकसभा निवडणुकीत कोकणात पक्षाला एकही जागा मिळाली नाही, हाच मोठा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का आहे.
मात्र हा पराभव इथंच थांबला नाही. विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती झाली. ठाणे पालघरमध्ये तर एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंकडे नेताच ठेवलेला नाही. अशावेळी तळकोकणातून ठाकरेंच्या अपेक्षा होत्या. मात्र या निवडणूकीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमधून शिवसेना शिंदे गट ८, भाजप ४, राष्ट्रवादी काँग्रेस २, आणि शिवसेना ठाकरे गटाचा १ आमदार निवडून आला. रत्नागिरीत गुहागरची एकमेव जागा शिवसेना ठाकरे पक्ष अर्थात महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली. मात्र तिथेही भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचा वैयक्तिक करिष्मा आणि मतदारसंघावरील पकड त्यांच्यासाठी फायद्याची ठरली.
रत्नागिरीत सामंत बंधूंचा करिष्मा चालत असताना सिंधुदुर्गात राणेंनी कमबॅक केला आहे. राणेंची दोन्ही मुलं आमदार झाली, तर स्वतः राणे खासदार आहेत. आणि हे तिन्ही विजय ठाकरेंच्या उमेदवारांना पाडत मिळवण्यात आले आहेत. महत्वाचं म्हणजे सिंधुदुर्गात वैभव नाईक यांचा पराभव झाल्याने ठाकरे गटाची ताकद अजूनच कमकुवत झाली आहे. (Rajan Salvi)
थोडक्यात काय तर मतदारांवर प्रभाव पाडण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आलं. त्यामुळे उरले सुरले कार्यकर्तेही अस्वस्थ झाले आहेत. पक्षातील नेत्यांनी नव्या पर्यांयांचा शोध सुरू केला आहे. आणि याचा परिणाम असा झाला की, ठाकरेंच्या आधीच कमजोर झालेल्या पक्षाला गळती सुरु झाली.
============
हे देखील वाचा : Premanand : स्थानिकांच्या विरोधामुळे प्रेमानंद महाराजांची लोकप्रिय पदयात्रा बंद!
============
शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र झापडेकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. सोबतच महाड मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या स्नेहल जगताप यादेखील भाजपच्या संपर्कात असल्याचे समोरआलं होतं . भाजपचे प्रविण दरेकर हे स्नेहल जगताप यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातं. अलिबाग मतदारसंघातही शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे खात्रीशीर वृत्त असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटात अस्वस्थता वाढली असल्याचे दिसून येत आहे. महत्वाचं म्हणजे सत्तेसोबत राहण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे कोकणात ठाकरे गटाच्या अडचणीत आगामी काळात वाढतच राहणार यात काही शंका नाही. अशावेळी ना सत्ता ना नेतृत्वाची छाप अशावेळी उद्धव ठाकरे गट कसा सांभाळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.