ब्रिटनची राजेशाही टिकवून ठेवण्याची जबाबदारी ब्रिटनच्या जनतेच्या खिशावर आली आहे. कारण या राजघराण्याचा अवाढव्य़ खर्च पूर्ण करण्यासाठी ब्रिटीश जनतेचा खिसा रिकामा होत आहे. दरवर्षी ब्रिटिश राजघराण्यावर जनतेच्या करातून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. 2024 मध्ये या राजघराण्यावर तब्बल 1015 कोटी रुपये खर्च झाले आहेत. सध्या ब्रिटनची अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असतांना ब्रिटनच्या राजघराण्यावर एवढा खर्च करणे हे केवळ मुर्खपणाचे लक्षण असल्याची जाहीर टीका आता ब्रिटनची जनता करीत आहेत. (Raja Charles)
ब्रिटनमधील अनेक मान्यवर अर्थतज्ञांनीही या खर्चात त्वरित कपात करुन ब्रिटनची अर्थव्यवस्था वाचवावी, अशी मागणी केली आहे. यामुळेच की काय, ब्रिटनच्या शाही परंपरेचे प्रतीक मानली जाणारी रॉयल ट्रेनही बंद कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राणी व्हिक्टोरियाच्या काळापासून धावणा-या या रॉयल ट्रेनचा देखभालीचा खर्च परवडत नसल्याचे कारण देत ही ट्रेन 2027 पर्यंत बंद करण्यात येणार आहे. जगातील सर्वात जुन्या राजघराण्यांचे नाव जेव्हा येते, तेव्हा ब्रिटनच्या शाही राजघराण्याचा पहिला नंबर लागतो. आत्ताही हे राजघराणे लोकप्रियता आणि संपत्तीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या या राजघराण्याची धुरा राजा चार्ल्स यांच्या खांद्यावर आहे. हा सर्व राजपरिवार अतिशय शाही महलांमध्ये वास्तव्याला आहे. बकिंगहॅम पॅलेस, केन्सिंग्टन पॅलेस, बालमोरल कॅसल, युनायटेड किंग्डम सह अनेक शाही महल या कुटुंबाच्या ताब्यात आहेत. यासोबतच मोजता येणार नाहीत, एवढ्या जमिनी, संग्रहालये या घराण्याच्या नावावर आहेत. (International News)
इंग्लंडमधील नॉरफोकमधील 50000 एकरच्या इस्टेटपासून ते बर्कशायरमधील एका छोट्या वेंडी घरापर्यंत, 32 शाही मालमत्ता या राज घराण्याकडे आहे. बरं एवढी सगळी संपत्ती असूनही हे राजघराणं अजूनही ब्रिटनच्या जनतेच्या करामधून मिळालेल्या पैशावर अवलंबून आहे, हे ऐकायला आश्चर्य वाटेल. पण परिस्थिती अशीच आहे. आजही या राजघराण्याचा जनतेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. कारण या राजघराण्याच्या दरवर्षीच्या खर्चासाठी जनतेकडून करोडोंनी कर वसूल करण्यात येतो. त्याचा सर्व बोजा ब्रिटनच्या सामान्य जनतेवर पडला आहे. सध्या ब्रिटन सरकार सर्वसामान्यांच्या सुविधांमध्ये पैशाअभावी कपात करत असतांना राजघराण्यावर मात्र करोडो रुपये खर्च करण्यात येत आहेत. आता या पैशांबाबत ब्रिटनमधील सामान्य जनता जाब विचारत असून राजघराण्याचे हे चोचले बंद करावे, अशी मागणी होत आहे. या संदर्भात ब्रिटनमध्ये एक अहवाल जाहीर करण्यात आला आहे. 2024 मध्ये ब्रिटिश राजघराण्यावर 1015 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दरवर्षी या रकमेत वाढ होत आहे. ब्रिटिश राजघराण्याला मिळणाऱ्या या निधीचे नाव ‘सॉवरेन ग्रँट’ आहे. (Raja Charles)
ब्रिटिश राजघराण्याच्या प्रमुखाच्या नावावर ही रक्कम त्यांच्या जबाबदारीसाठी दिली जाते. त्यात राजा किंवा राणी रहात असलेल्या राजवाड्याच्या देखभालीचा खर्च सामील आहे. सध्या राजा चार्ल्स यांना फक्त सॉवरेन ग्रँट सह डची ऑफ लँकेस्टर नावाच्या मालमत्तेतून देखील दरवर्षी सुमारे 236 कोटी रुपये मिळतात. राजघराण्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये कोट्यवधी किंमतीच्या मालमत्ता आहेत. त्यावरही हा पैसा खर्च होतो. राजघराणे हा सर्व पैसा शाही भेटींवर आणि प्रवासावर खर्च करते. 2023 मध्ये राजघराण्यानं शाही भेटींवर 55 कोटी रुपये खर्च केले. राजा चार्ल्स आणि राणी कॅमिला यांच्या फक्त एका विमान प्रवासासाठी 4.7 कोटी रुपये खर्च झाले आहेत. याशिवाय बकिंगहॅम पॅलेसच्या नूतनीकरण आणि देखभालीसाठी 485 कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर कर्मचाऱ्यांच्या पगारावर 352 कोटी रुपये खर्च झाले आहेत. राजघराण्याच्या सदस्यांच्या सुरक्षेसाठी जो पैसा खर्च होतो, तो यापेक्षाही दुप्पट आहे. (International News)
=============
हे ही वाचा : Farah Pahlavi : इराणची शेवटची सम्राज्ञी !
=============
अहवालातून राजघराण्याच्या खर्चाचा हा आकडा पुढे आल्यावर ब्रिटनमधील जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. ब्रिटनमधील सामान्य जनता आर्थिक संकट, महागडे वैद्यकीय खर्च, शैक्षणिक असुविधा या समस्यांबरोबर लढत असतांना अब्जावधींची मालमत्ता असलेले राजघराण्याला कराचा पैसा का दिला जातो, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. ब्रिटनमध्ये राजघराण्यावर खर्च होणा-या पैशामध्ये कपात करावी, यासाठी काही संघटना रस्त्यावरही उतरत आहेत. याबाबत टीका वाढल्यामुळे रॉयल ट्रेनसारखा पांढरा हत्ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षी कराच्या पैशामध्ये 1 दशलक्ष पौंडची बचत होईल अशी अपेक्षा आहे. (Raja Charles)
सई बने