राज्याच्या विधानसभेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. कुस्तीची लढत प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी पहिलवान ज्याप्रमाणे दंड थोपटून-थोपटून प्रतिस्पर्ध्याला आव्हान देतात त्याप्रमाणे प्रत्येक पक्ष दावे-प्रतिदावे करून समोरच्याला आव्हाने देत आहे. फरक एवढाच की पहिलवान आपल्या प्रतिस्पर्ध्याला लढतीचे आव्हान देतो. इथे मात्र प्रत्येक पक्ष आपल्या विरोधी पक्षालाच नव्हे तर मित्र पक्षालाही एक प्रकारे आव्हान देत आहे. विश्वास बसत नसेल तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेनेतील (उबाठा) वादावादी पहा. इकडे महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातही सारं काही आलबेल नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या दोन नेत्यांनी काढलेल्या यात्रा लक्ष वेधून घेतात. दोन्ही नेते तसे मातब्बर आणि स्वकर्तृत्वावर राजकीय यश मिळविण्याची धमक असणारी नेते. कालपर्यंत तरुण-तडफदार म्हणून गणले जाणारे हे नेते आज पोक्त झाले आहेत, परंतु अजूनही धडपडच करत आहेत. नियतीच्या फेऱ्यात आणि राजकारणाच्या रामरगाड्यात दोघेही जण आज विचित्र कात्रीत सापडले आहेत.
दोघांनाही घडविले काकाने आणि त्यांचे राजकारण बिघडले तेही त्यांच्या काकांमुळेच. या दोन्ही पुतण्यांकडे तमाम महाराष्ट्र काही वर्षांपूर्वी भावी नेतृत्व म्हणून पहात होता आणि आज दोघेही आपले अस्तित्व राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आपण राज ठाकरे आणि अजित पवार यांच्याबाबत बोलत आहोत हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेलच. या विधानसभा निवडणुकीसाठी जे तरुण मतदार पहिल्यांदा मतदान करतील त्यांना कदाचित हे जाणवणार नाही. परंतु अवघ्या दहा वर्षांपूर्वी हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या राजकारणात अव्वल स्थानी होते. त्यावेळी शरद पवार हे केंद्रात कृषिमंत्री होते. काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार होते. तसेच त्या पक्षाकडे तरुण व धडाडीच्या नेत्यांची फौज होती. काँग्रेस तशी नेतृत्वहीन आणि गटबाजीने जर्जर झालेली होती. (Raj Thackeray VS Ajit Pawar)
अजित पवार हे शरद पवार यांचे राजकीय वारस असल्याबाबत कोणाच्याही मनात किंचितही शंका नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळाली तर ते मुख्यमंत्री होणार हे सर्व जण गृहीत धरून चालले होते. तेव्हा सुप्रिया सुळे या खासदार होत्या. शरद पवार यांचा केंद्रातील वारसा त्या पुढे नेतील तर राज्याची धुरा अजित पवार यांच्या खांद्यावर असेल असेच सर्वांना वाटत होते. दुसरीकडे आपले काका बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यामुळे राज ठाकरे यांनी सवतासुभा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष काढला होता. राज्याच्या विधानसभेसाठी 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचे 13 आमदार निवडून आले होते तर पाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये त्यांनी जबरदस्त यश मिळवले होते. नाशिक महापालिका मनसेने हस्तगत केली होती तर कल्याण डोंबिवलीतील सत्ता अगदी थोडक्यात हुकली होती. पुणे पालिकेत त्यांचे 27 नगरसेवक निवडून आले होते.
त्यावेळी शिवसेनेची जागा घेणारा पक्ष म्हणून मनसे पुढे आला होता. मनसेची एवढी दहशत होती की शिवसेनेला त्यामुळे आपले अस्तित्व संकटात आल्यासारखे वाटत होते. त्यावेळेस विधानसभा व पालिका निवडणुकीतील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा संपूर्ण प्रचार हा मनसेवर केंद्रित होता. एवढेच नाही तर 2014 च्या निवडणुकीपूर्वी नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन मनसे-भाजप युती करण्याची चाचणी केली होती. शिवसेनेला सोडून मनसेसोबत जाण्याची भाजपची योजना असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. त्यामुळे महाराष्ट्रातील एक जबरदस्त राजकीय शक्ती म्हणून मनसे व पर्यायाने राज ठाकरे यांच्याकडे पाहिले जात होते. या चित्राला पहिला तडा गेला तो 2014 मध्ये. मनसेसोबतची भाजपची अपेक्षित युती झाली नाही. अर्थात त्यालाही कारण तशा युतीला शिवसेनेचा असलेला प्रचंड विरोध हे होते. त्यामुळे ऐन वेळेस आपली रणनीती ठरविण्याबाबत राज ठाकरे यांची पंचाईत झाली. मग लोकसभा निवडणुकीत त्यांनी एक अफलातून पवित्रा घेतला. (Raj Thackeray VS Ajit Pawar)
जिथे भाजपचे उमेदवार असतील तिथे भाजपला पाठिंबा आणि जिथे शिवसेनेचे उमेदवार असतील तिथे आपले उमेदवार उभे करू, असे त्यांनी जाहीर केले. अर्थात त्यावेळी मोदी लाट एवढी प्रचंड होती की राज ठाकरे यांच्या पाठिंब्याची भाजपला काही गरज उरली नव्हती. भाजपला तेव्हा मोठे यश मिळाले आणि पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याची सत्ता भाजपच्या हाती आली. तोपर्यंत शिवसेना व भाजपमध्ये वितुष्ट आले होते व दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. इकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येसुद्धा बेबनाव झाला होता आणि तेही वेगळे लढले. त्या पंचरंगी लढतीत मनसेचा सुपडा साफ झाला. त्यानंतर राज ठाकरे यांचे राजकारण वेगवेगळे हेलकावे घेऊ लागले. मनसेचे इंजिन या रूळावरून त्या रूळावर घरंगळत जात राहिले. अखेर आज नगण्य राजकीय शक्ती म्हणून त्यांचे अस्तित्व उरले आहे.
दुसरीकडे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी युग सुरू झाले. आता पुन्हा केंद्रात सत्ता मिळणे अवघड आहे, हे चाणाक्ष शरद पवारांनी हेरले व त्यांनी आपले लक्ष महाराष्ट्रावर केंद्रित केले. त्यातून त्यांनी सुप्रिया सुळे यांना आपली राजकीय वारस तसेच भावी मुख्यमंत्री म्हणून पुढे आणायला सुरुवात केली. त्यामुळे आतापर्यंत काकाचे आज्ञाधारक पुतणे असणाऱ्या अजित पवार यांच्या मनात चलबिचल सुरू झाली आणि त्यातून त्यांचीही राजकीय पावले वेगवेगळ्या दिशेने पडत गेले. त्याची परिणती अखेर जुलै 2023 मध्ये त्यांनी आपल्या काकांविरोधात बंड पुकारून देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करण्यात आली. (Raj Thackeray VS Ajit Pawar)
वेगवेगळ्या मार्गावरून वाटचाल करत असणारे हे दोन्ही नेते आज एका तिठ्यावर उभे आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी सपाटून मार खाल्ला आहे तर भाजपला पाठिंबा दिलेल्या राज ठाकरे यांच्या पदरात अपयश पडले आहे. दोघांचेही नेतृत्व आपापल्या काकांच्या आश्रयाने व मार्गदर्शनाने घडले आहे. दोघांच्याही अंगी कर्तृत्व आणि क्षमता आहे. परंतु दोघांनाही दिशा सापडत नाहीये. क्रिकेटच्या सामन्यात ज्याप्रमाणे एखादा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतो, ज्याला लाईन अँड लेंथ म्हणतात ती बरोबर राखतो परंतु त्याला बळी मिळत नाही, त्याच्या गोलंदाजीवर चकून फलंदाज बाद होत नाही, संपूर्ण दिवस गेला तरी त्याला एक ब्रेकथ्रू मिळत नाही, तशीच अवस्था आज अजित पवार आणि राज ठाकरे यांची झालेली आहे. दोघांनाही गरज आहे ती एका ब्रेकथ्रूची. (Raj Thackeray VS Ajit Pawar)
या एका ब्रेकथ्रूसाठी आज हे दोन्ही नेते राज्यात फिरत आहेत. दोघांनीही राज्याचा दौरा काढला आहे. अजित पवार यांनी या दौऱ्याला जनसन्मान यात्रा असे नाव दिले आहे, तर राज ठाकरे या दौऱ्याला कोणतेही नाव न देता वेगवेगळ्या शहरांना भेटी देत आहेत. वास्तविक राज ठाकरे यांच्या दृष्टीने असा दौरा नवीन नाही. मनसेची स्थापना करण्यापूर्वी सुमारे वर्ष- दीड वर्षे त्यांना शिवसेनेत अडगळीत टाकण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी असेच वेगवेगळ्या शहरांना भेटी देऊन तेथील स्थानिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन पक्षाची बांधणी केली होती. त्यानंतरही ते जमेल तसे अनेकदा राज्यात प्रवास करून आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी संपर्क साधत असतात. त्यामध्ये सातत्य नसते ही त्यांची खरी समस्या आहे. त्या उलट अजित पवारांना कधी असे दौरे काढून पक्षाच्या पातळीवर कार्यकर्त्यांशी किंवा लोकांशी संपर्क साधण्याचा अनुभव नाही. मुळातच त्यांची जवळजवळ संपूर्ण कारकीर्द सत्तेत गेली असल्यामुळे असे प्रयत्न करण्याची त्यांना कधी गरजच भासली नाही. शिवाय हे काम करायला त्यांच्याकडे शरद पवार यांच्यासारखे भक्कम नेतृत्व होते.
==============
हे देखील वाचा : शरद पवार अजितदादांना जागा देतील ?
===============
मात्र आता बदललेल्या परिस्थितीत दोघांनाही स्वतःची तसेच पक्षाची जबाबदारी स्वतः उचलणे भाग आहे. शिवाय आता दोघांच्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे. ‘काका, मला वाचवा’ ही आरोळी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. या दोघांकडेही आज ती सोय नाही. एकाचे काका दिवंगत झालेले आणि ते हयात असतानाच त्यांनी पुतण्याला बाहेर काढलेले. दुसऱ्याने काकाच्या विरोधात नुकतेच बंड करून हाती पराजय आलेला ! पुतण्याला नामोहरम केलेले काका ऐकायच्या मन:स्थितीत नाहीत, अशी ही स्थिती ! त्यामुळे परत दोघांच्या यात्रा वेगवेगळ्या मार्गांनी निघाल्या असल्या तरी त्यांची दिशा एकच आहे. दोघांनाही आता चिंता आहे ती आत्मसन्मानाचीच नाही, तर अस्तित्वाचीही! (Raj Thackeray VS Ajit Pawar)