महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांचा ५ जूनचा बहुचर्चित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. स्वतः श्री राज ठाकरे यांनीच एक ट्विट करून माहिती दिली आहे. यासंदर्भात आपण पुण्यात २२ मे रोजी होणाऱ्या सभेत आपली भूमिका अधिक स्पष्ट करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज ठाकरे याप्रकरणात काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. त्यांच्या अयोध्या दौऱ्याला सातत्याने विरोध करणारे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध राज ठाकरे आक्रमक भूमिका घेतात की, नरमाईची भूमिका घेतात ते पाहावे लागणार आहे. (Raj Thackeray Ayodhya visit)
उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध केल्यामुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. श्री राज ठाकरे यांनी मध्यंतरी औरंगाबादच्या ऐतिहासिक सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्रात ‘वादळ’ निर्माण झाले होते. ते शमण्याच्या आतच राज ठाकरे यांनी पाच जूनच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. मात्र लगेचच राज यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचेच खासदार बृजभूषण यांनी तीव्र विरोध केल्यामुळे तो केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशात सर्वत्र चर्चेचा विषय झाला.
भाजपकडून ‘सुपारी’ घेऊनच राज ठाकरे यांनी ‘भोंग्या’चा’ प्रश्न उकरून काढला असा सर्वत्र मतप्रवाह वाहत असताना त्यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्याच खासदाराकडून तीव्र विरोध होत असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. महाराष्ट्रातील भाजपचे नेतेही बृजभूषण यांच्या विरोधामुळे तोंडघशी पडले होते. त्यामुळे हा दौरा स्वतः राज ठाकरे यांनीच स्थगित केल्यामुळे त्यांना आता हायसे वाटले असेल.

भाजपचे खासदार बृजभूषण सिंह हे उत्तरप्रदेशातील एक ‘बाहुबली’ नेते म्हणून समजले जातात. त्यांची काम करण्याची, बोलण्याची ‘स्टाईल’ सर्वपरिचित असल्यामुळे त्यांच्या ‘वाट्याला’ सहसा कोणी जात नाही. राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर करताच बृजभूषण सिंह यांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या दौऱ्याला विरोध केला एवढेच नव्हे, तर राज ठाकरे यांनी उत्तरप्रदेशातील जनतेची आधी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊलही टाकू दिले जाणार नाही, अशी घोषणाही केली. त्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही ‘तयार’ राहण्यास सांगितले होते .
आपल्या या अटीवर अजूनही ते ठाम आहेत. एवढेच नव्हे तर राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी त्यांनी आता भाजपमधील इतर नेत्यांची ‘जमवाजमव’ही करायला सुरुवात केली. बृजभूषण यांच्या मागणीला पाठिंबा देत गिरीराज किशोर सिंग आणि मनोज तिवारी यांनी राज ठाकरे यांनी उत्तरप्रदेशच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केली होती.
राज ठाकरे अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार आहेत मात्र काही वर्षापूर्वी मनसे कार्यकर्त्यांकडून उत्तर प्रदेशातील तरुणांना जी मारहाण झाली त्यासंदर्भात बृजभूषण यांनी, राज ठाकरे यांना ‘रावणा’ची उपमा दिली आहे. थोडक्यात खा. बृजभूषण यांनी यांनी राज ठाकरे यांच्या विरोधाचा आपला हेका अजूनही कायम ठेवला आहे.
यासंदर्भात कांचन गिरी या साध्वीजींनी राज ठाकरे यांच्यावतीने बृजभूषण यांच्याजवळ रदबदली करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र बृजभूषण यांनी त्यांनाही जुमानले नाही. राज यांच्या माफीनाम्याबत ते अजूनही ठाम आहेत. कांचन गिरी यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही पाठविले असून बृजभूषण यांना समज देण्याची विनंती केली, मात्र नरेंद्र मोदी यांची याबाबतची भूमिका अदयाप तरी समजू शकलेली नाही.
थोडक्यात हे प्रकरण आता पंतप्रधानांपर्यंत पोहोंचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बृजभूषण यांची कानउघाडणी करतील का, हा प्रश्नच आहे. मात्र तूर्तास तरी राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौराच स्थगित केल्यामुळे बृजभूषण यांचा ‘विजय’ झाला आहे असेच म्हणावे लागेल.
====
हे देखील वाचा: चुकूनसुद्धा वाचू नका ही ३ रहस्यमयी पुस्तके, वाचाल जाल सैतानाच्या ताब्यात!
====
आपल्या नियोजित अयोध्या दौऱ्याला भाजपकडूनच अनपेक्षितपणे विरोध होत असल्यामुळे मनातून अस्वस्थ झालेले राज ठाकरे यांनी आत्तापर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नव्हती. नुकताच त्यांनी पुण्याचा घाईघाईने दौराही केला आणि २२ मे रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंदिरात एक सभाही घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र मुंबईला जाताच त्यांनी आपल्या नियोजित अयोध्या दौऱ्याच्या स्थगितीची अचानक घोषणा केली. त्यामुळे पुण्याच्या सभेत राज ठाकरे, आपल्या अयोध्या दौऱ्याच्या स्थगितीमागचे खरे ‘राझ’ जाहीर करणार की, त्यांची तोफ नेहमीप्रमाणे शरद पवार आणि आघाडी सरकारविरूद्ध धडाडणार यावरच मनसेच्या भावी वाटचालीचे दिशादर्शन होणार आहे.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.