पाकिस्तानमध्ये (Pakistan) भारताबद्दल कितीही वाईट मत असले तरी भारतीय कलाकारांबाबत विशेषतः हिंदी चित्रपटातील कलाकारांबद्दल प्रेमाची भावना आहे. याचे पहिले कारण म्हणजे अनेक कलाकार फाळणीपूर्वी पाकिस्तानमध्ये (Pakistan) राहत होते. भारताची फाळणी झाली आणि त्यानंतर हे कलाकार भारतात आले. पण त्यांच्या पाकिस्तानमधील मालमत्ता अजूनही त्यांच्या आठवणी म्हणून सुरक्षित राखल्या गेल्या आहेत. अशीच एक मालमत्ता आहे, दि लिजंड म्हणून ज्यांचा उल्लेख करण्यात येतो, अशा राज कपूर यांची. राज कपूर यांची पाकिस्तानमध्ये मोठी हवेली असून या हवेलीमुळे सध्या पाकिस्तानच्या (Pakistan) कोर्टात वाद सुरु आहे. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये राज कपूर यांची मोठी हवली आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या राजधानीतील प्रसिद्ध अभिनेता राज कपूर यांच्या हवेलीवर मालकी हक्क सांगणारी याचिका पाकिस्तानमधील न्यायालयात दाखल करण्यात आली होती. अर्थात न्यायालयानं ही याचिका फेटाळली आहे. राज कपूर यांची ही हवेली, त्यांची आठवण म्हणून राष्ट्रीय वारसा घोषित करण्यात आली आहे.

राज कपूर यांचे वडिलोपार्जित घर कपूर हवेली म्हणून ओळखले जाते. हे पेशावरच्या प्रसिद्ध किस्सा ख्वानी बाजारात आहे. राज कपूर यांचे आजोबा दिवाण बसेश्वरनाथ कपूर यांनी 1918 ते 1922 दरम्यान ही भव्य हवेली बांधली होती. ऋषी कपूर यांचे आजोबा पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म येथे झाला. 1990 च्या दशकात ऋषी कपूर आणि त्यांचा भाऊ रणधीर यांनी या जागेला भेट देऊन आपले येथे भावनिक नाते असल्याचे सांगितले होते. याच हवेली संदर्भात आता न्यायालयात वाद सुरु आहे. या हवेलीला पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा सरकारने 2016 मध्ये राष्ट्रीय वारसा घोषित केले होते. मात्र पेशावरच्या सईद मुहम्मद यांनी ही हवेली त्यांच्या वडिलांनी 1969 मध्ये लिलावाद्वारे विकत घेतल्याचा दावा न्यायालयात केला होता. शिवाय तेव्हापासून या हवेलीवर आपला मालकी हक्क असल्याचेही सईद यांनी याचिकेत म्हटले होते. या हवेलीची मालकी आपल्याकडे असून या मालमत्तेत फेरबदल करण्याचा हक्क आपला आहे, त्यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या (Pakistan) न्यायालयात दावा केला होता. याचिका दाखल करणारे सईदचे वकील खट्टक यांनी न्यायालयात दावा केला की, राज कपूर किंवा त्यांचे कुटुंबीय या हवेलीत कधी राहत होते, हे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानच्या कोणत्याही विभागाकडे ठोस असा पुरावच नाही. मात्र हा दावा फेटाळण्यात आला असून सईद यांना हे प्रकरण दिवाणी न्यायालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या हवेलीची आता बरीच पडझड झाली असून सईद यांना या जागेत व्यापारी संकुल उभारायचे आहे. त्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यासाठी ते गेल्यावर ही हवेली राष्ट्रीय संपत्ती असल्याचे सांगण्यात आले आणि त्यात कोणतेही बदल करण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर सईद यांनी या हवेलीवर मालकीचा दावा न्यायालयात दाखल केला होता. नवाझ शरीफ यांच्या सरकारने 2016 मध्ये या हवेलीला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले आहे.
राज कपूर यांची ही हवेली सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. एकेकाळी नक्षीकाम केले होते. पाच मजली असलेली ही हवेली कपूर कुटुंबियांच्या पेशावरमधील संपत्तीचे प्रतिक होती. मात्र सध्याच्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) ही हवेली पार धुळीला मिळाल्याच्या अवस्थेत आहे. 40 ते 50 खोल्या असलेल्या आलिशान पाच मजली इमारतीचा पाचवा आणि चौथा मजला कोसळला आहे. तसेच इतरही मजले पडण्याच्या बेतात आहेत. या हवेलीतील प्रत्येक खोली ही भव्य असून त्यामध्ये वेगवेगळी चित्रे काढली आहेत. तसेच त्याच्या खिडक्यांवरही नक्षीकाम केले आहे. पण आता देखभालीअभावी हे सर्व काम पडण्याच्या बेतात आहे. त्यामुळेच या हवेलीवर मालकी हक्क सांगणारे सईद यांनी ही संपूर्ण हवेली पाडण्याचा आग्रह धरला आहे. मात्र, पुरातत्व विभागाचा याला विरोध आहे. या हवेलीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन हा वारसा जपायला हवा, असे कारण त्यांनी पुढे केले आहे.
======
हे देखील वाचा : किंग चार्ल्सच्या सिंहासन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यावर
=====
ही हवेली मान्यवरांच्या लग्नासाठी अनेकवेळा वापरण्यात आली आहे. लग्नासाठी हवेली एवढी प्रसिद्ध होती की, या हवेलीत बुकींग न मिळाल्यामुळे लग्नाच्या तारखा 6-6 महिने पुढे गेल्याचे किस्से सांगण्यात येतात. मात्र पाकिस्तानमध्ये (Pakistan) आलेल्या भुकंपामुळे हवेलीला धक्का बसला आणि तिची देखभाल थांबली. 2016 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या हवेलीला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले परंतु त्यांचे जतन करण्यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद केली नाही. परिणामी आता हवेली जीर्ण अवस्थेत पोहचली आहे.
सई बने