Home » हळदीची लढाई लढणाऱ्या विज्ञानजगतातील महाराणाची कहाणी

हळदीची लढाई लढणाऱ्या विज्ञानजगतातील महाराणाची कहाणी

by Team Gajawaja
0 comment
रघुनाथ माशेलकर Raghunath Mashelkar
Share

इतिहासातील हळदीघाटीचे युद्ध म्हटले की, डोळ्यांसमोर उभी राहते ती हातात भाला घेतलेली आणि चेतक घोड्यावर स्वार होऊन लढणाऱ्या चिलखतधारी ‘महाराणा प्रताप’ यांची मूर्ती. स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या महाराणा प्रतापाचे ते रूप आजही प्रेरणादायी आहे. बलाढ्य सत्तेला शरण न जाता स्वतःचं अस्तित्व स्वाभिमानाने टिकवून ठेवणाऱ्या महाराणा प्रताप यांचे चरित्र आजही दीपस्तंभासारखे प्रकाशमान आहे.

आधुनिक काळात स्वातंत्र्योत्तर भारतात आणखी एका भारतीयाने अशीच एक यशोगाथा लिहिली. ती देखील ‘हळदीची लढाई’ म्हणून विख्यात आहे. पण ही लढाई हत्ती – घोड्यांची अथवा संपत्तीसाठी लढलेली लढाई नव्हती, तर ही लढाई होती बौद्धिक संपदेची!! आणि ही लढाई लढणाऱ्या विज्ञानजगतातील योध्याचे नाव होते….. रघुनाथ अनंत माशेलकर!

आज रघुनाथ अनंत माशेलकर (Raghunath Anant Mashelkar) यांचा जन्मदिवस. १९४३ साली गोव्यामधील ‘माशेल’ या गावी त्यांचा जन्म झाला. 

11 2nd bharatiya Chhatra Sansad ideas | bharatiya, highway signs, isp

एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी अशा प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अकरावीला बोर्डात मेरिटमध्ये आल्यानंतर पुढे शिक्षण घ्यावे की न घ्यावे, अशी बिकट आर्थिक परिस्थिती असताना, त्यांनी आईच्या इच्छेला मान देत ‘बी.केम’ला प्रवेश घेतला. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी ‘पीएचडी’ प्राप्त करत घरच्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ केला. 

एवढ्यावरच न थांबता युरोपात जाऊन डॉक्टरेट केल्यानंतर संशोधन देखील केले. फ्लूड मॅकेनिक्स, पॉलिमर रिएक्शन इत्यादी बाबीत संशोधन करत असतानाच मधल्या काळात एक विचित्र अशी घटना घडली. या घटनेने केवळ त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली असं नाही, तर एकंदरच सगळ्या भारतीय विज्ञानजगताला खडबडून जागे केले.

सन १९९६ च्या सुमारास अमेरीकेतल्या ‘जॅक्सन’ शहरात स्थित असलेल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मेडिकल सेंटर’ने हळदीच्या औषधी गुणधर्माचे पेटंट घेतल्याची बातमी रघुनाथ माशेलकर (Raghunath Mashelkar) यांच्या वाचनात आली. वरकरणी साधी वाटणारी ही बातमी खरंतर खूपच महत्वाची होती. कारण हळदीचा जंतुनाशक म्हणून भारतात पूर्वापार वापर केला जात होता. 

एखादी निरक्षर भारतीय गृहिणीसुद्धा मुलाबाळांना जखम झाल्यास प्रथमोपचार म्हणून हळद लावत असे. ही गोष्ट परंपरेने इतकी रूढ झालेली होती की, त्यावर स्वामीत्वहक्क गाजवावा हेदेखील कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते. पण अशा पेटंटचे  काय दुष्परिणाम होऊ शकतात याची जाणीव माशेलकरांना झाली.

Sabinsa files patent infringement lawsuit against curcumin suppliers,  distributors

ज्या संस्थेला पेटंट मिळेल तिच्या अनुमतीशिवाय इतर कोणासही हळदीच्या जंतुनाशक गुणधर्माचा वापर करणे ही बाब बौद्धिक संपदेच्या हक्काचे उल्लंघन करणारी ठरली असती. या गोष्टीला अनेक आर्थिक व औद्योगिक कंगोरे देखील होते. 

परंपरेने चालत आलेल्या भारतीय ज्ञानावर पाश्चिमात्यांनी केलेले हे एकप्रकारचे आक्रमणच होते. आपल्याच मालकीच्या गोष्टीच्या वापरासाठी परक्याची परवानगी घेण्यासारखी ही गोष्ट होती. माशेलकरांनी ती बातमी गांभीर्याने घेतली. 

पाली आणि संस्कृतसारख्या भाषांमधील असंख्य श्लोक व उताऱ्यांच अध्ययन करून हळदीचे पेटंट मिळविण्यासाठी न्यायालयीन लढाई लढली. अखेर १५ महिन्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षानंतर २३ ऑगस्ट १९९७ ला अमेरिकेतील पेटंट कार्यालयाने ते पेटंट रद्द केले. 

एवढ्यावरच न थांबता बासमती तांदुळाच्या बाबतीत देखील याच लढाईची पुनरावृत्ती झाली. वर्षानुवर्षे चालत आलेल्या भारतीयांच्या ज्ञानावर डल्ला मारण्याचे बलाढ्य विकसित राष्ट्रांचे प्रयत्न धुळीस मिळाले. माशेलकरांच्या या लढ्यामुळे भारतात पेटंट अर्थात स्वामीत्वहक्क, बौद्धिक संपदा, कॉपीराईट, इत्यादी बाबींबद्दल जागरूकता वाढली. 

India faces tricky new EU 'authenticity protocol' for Basmati rice - The  Hindu BusinessLine

आपल्या पूर्वजांचे अनुभवसिद्ध संचित ज्ञान केवळ अनास्थेमुळे परकीयांच्या ताब्यात जाण्याला मोठ्या प्रमाणावर पायबंद बसला. पुढील काळात प्राचिन भारतिय ऋषीमुनींच्या काळापासून चालत आलेले वैद्यक तथा कृषि विषयक मौलिक ज्ञान भारतीयांच्याच नावावर कायम राहिले. 

रघुनाथ माशेलकर (Raghunath Mashelkar) यांचे कार्य एवढ्यावरच सीमित नव्हते. तर CSIR सारख्या मातब्बर संस्थेचे अध्यक्षपद भूषवित असताना त्यांनी देशभरात विखुरलेल्या अनेक प्रयोगशाळांमध्ये सुसूत्रता देखील आणली. भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण हे मानाचे पुरस्कारही त्यांना दिले. 

हे ही वाचा: तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण पेरू खाण्याचे ‘एवढे’ आहेत फायदे!

या महत्वाच्या कारणांसाठी आवर्जून बघा ‘शार्क टॅंक इंडिया'(Shark Tank India)

त्यांच्या नावे असलेल्या शोधनिबंध, पेटंट, पुस्तके तथा डॉक्टरेट ह्यांची संख्या जितकी अवाक करणारी आहे तितकीच त्यांनी पदे भूषवलेल्या संस्थांची संख्या आहे. 

महासत्तांच्या दबावाला आणि त्यांच्या बायो – पायरसीला दाद न देता भारतीयांना स्वातंत्र्य आणि स्वावलंबनाचे भान देणाऱ्या या विज्ञानजगतातील महाराणा प्रतापाला आज वाढदिवसानिमित हार्दिक शुभेच्छा !!!! 

सौरभ रत्नपारखी


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.