भगवान श्रीकृष्णाची मंदिरे सर्वत्र आहेत. वृंदावन आणि मथुरा भागातील भगवान श्रीकृष्णाची मंदिरे तर जगप्रसिद्ध आहेत. येथे रोज लाखो भक्त लाडक्या श्रीकृष्णाच्या चरणी लीन होण्यासाठी येतात. मात्र देवी राधा यांचे मथुरेतील मंदिरही तेवढेच प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशातील मथुरेपासून 43 किलोमीटर अंतरावर असलेल्या बरसाना धाममध्ये हे मंदिर आहे. देवी राधा यांना स्थानिक भाषेत श्रीजी म्हणण्यात येते. भानुगड शिखरावर श्रीजी म्हणजेच राधाराणी यांचे भव्य मंदिर आहे. या मंदिरात राधा कृष्ण यांची पूजा केली जाते. हे मंदिर सुमारे 343 वर्षे जुने असून याची मुळ निर्मिती ही भगवान श्रीकृष्णाच्या नातवानं केली होती. मात्र त्यानंतर काही काळानं या मंदिराची दुर्दशा झाली. नंतर स्थानिक राजांनी हे भव्य मंदिर पुन्हा बांधले. अतिशय भव्य आणि तेवढेच देखणे असलेल्या या मंदिरात राधाराणींच्या भक्तांची अहोरात्र गर्दी असते. तसेच येथे श्रीजींच्या नावानं अखंड जप केला जातो. (Radha Rani Mandir)
श्रीजी हे राधा राणींचे (Radha Rani Mandir) स्थानिक नाव आहे. राधा राणी मंदिराची स्थापना 5000 वर्षांपूर्वी श्रीकृष्णाचा नातू राजा वज्रनाभ यांनी केली असे मानले जाते. त्याकाळी अत्यंत वैभवात असलेल्या या मंदिराची नंतर प्रचंड प्रमाणात लुटमार झाली. काहीकाळ मंदिर भग्नावस्थेत गेलं. या मंदिराला नंतर चैतन्य महाप्रभूंचे शिष्य नारायण भट्ट यांनी शोधून काढले. नारायण भट्ट यांनी राधाराणींची हरवलेली मूर्ती शोधली. या मुर्तीला त्यांनी पुन्हा येथे स्थापित केले. त्यांनी मंदिराची डागडूजी करण्यास सुरुवात केली.
ही माहिती मिळाल्यावर 1675 मध्ये राजा बीर सिंग देव यांनी मंदिर बांधण्यास मोठे सहकार्य केले. मंदिराला त्याचे भव्य स्वरुप पुन्हा मिळाले. अकबराच्या दरबारातील राजा तोडरमल यांनीही या मंदिरासाठी लाखो रुपये खर्च केल्याची माहिती आहे. लाडली म्हणजे लाडकी मुलगी आणि लाल म्हणजे लाडका मुलगा, अशा प्रकारे श्रीकृष्णाचे नातू राजा वज्रनाभ यांनी हजारो वर्षापूर्वी बांधलेल्या या मंदिराची नव्यानं उभारणी करण्यात आली. भगवान कृष्ण आणि राधाराणी यांना स्थानिक भाषेत लाडानं लाडली लाल म्हणण्यात येतं. (Radha Rani Mandir)
त्यामुळे हे मंदिरही लाडलीलाल मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. शिवाय या मंदिराला बरसाने की लाडली जी का मंदिर आणि राधारानी महल असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षाच्या अष्टमीला या मंदिरात राधा राणींची विशेष पूजा केली जाते. हा दिवस या भागात राधाष्टमी म्हणून साजरा केला जातो. स्कंद पुराण आणि गर्ग संहितेनुसार, श्री राधाजींचा जन्म याच दिवशी झाला. त्यामुळे या दिवशी संपूर्ण बरसाणा राधामय होऊन जातो. राधाष्टमीच्या दिवशी राधाजींचे मंदिर फुलांनी आणि फळांनी सजवले जाते. राधाजीला लाडू आणि छप्पन प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात आणि तो नैवेद्य प्रथम मोराला दिला जातो. मोर हे राधा-कृष्णाचे रूप मानले जाते. त्यानंतर हा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो. मोठ्या प्रमाणात साज-या होणा-या या उत्सवासाठी परदेशातील भक्तही मोठ्या संख्येनं उपस्थित असतात. (Radha Rani Mandir)
राधाजींचे हे मंदिर लाल आणि पिवळ्या दगडांनी बनलेले आहे. मंदिर सुमारे 250 मीटर उंच डोंगरावर आहे. देवी राधा यांना श्रीकृष्णाची अहलादिनी शक्ती आणि निकुंजेश्वरी मानली जाते. त्यामुळे राधाकिशोरीच्या उपासकांसाठी हे मंदिर पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या तळाशी वृषभान महाराजांचा वाडा आहे. यात वृषभान महाराज, किर्तीदा, श्रीदामा, म्हणजेच देवी राधा यांचा भाऊ आणि श्री राधिका यांच्या मूर्ती आहेत. या महालाजवळ ब्रह्मदेवाचेही मंदिर आहे. जवळ आणखी एक मंदिर असून त्यात राधाराणींच्या लाडक्या मैत्रिणींच्या मुर्ती आहेत. त्य़ांचीही नियमीत पूजा केली जाते. अत्यंत सुंदर असलेल्या या मंदिराच्या परिसरातून संपूर्ण बरसानाचा परिसर बघायला मिळतो. भगवान श्रीकृष्णाचे वडील नंद महाराज यांचे घर नांदगाव येथे होते. ते बरसानापासून चार मैलांवर आहे. बरसाणा-नांदगाव रस्त्यावर संकेत नावाची जागा आहे. जेथे पौराणिक कथेनुसार कृष्ण आणि राधा यांची पहिली भेट झाली होती. (Radha Rani Mandir)
==========
हे देखील वाचा : यशोदा मातेच्या मंदिराची परदेशातही ख्याती…
=========
मंदिराबाबत एक कथा स्थानिक सांगतात. कृष्णाचे वडील नंद महाराज आणि देवी राधा यांचे वडील वृषभान हे जवळचे मित्र होते. नंद महाराज हे गोकुळचे प्रमुख होते. वृषभान हे रावलचे प्रमुख होते. मथुरेचा राजा कंसाच्या अत्याचाराला कंटाळून या दोघांनीही आपल्या संपूर्ण गावासह नांदगाव आणि बरसाना येथे स्थलांतर केले. नंद महाराजांनी नंदीश्वर टेकडीवर निवासस्थान केले. तर वृषभान यांनी भानुगड टेकडीवर निवासस्थान केले. श्रीकृष्ण मथुरेला गेल्यावर त्यांच्या आठवणीत राधाराणी यांनी येथूनच त्यांची आराधना केली. आता नंदीश्वर आणि भानुगड डोंगरावर राधा आणि कृष्णाला समर्पित मंदिरे आहेत. नांदगाव मंदिराला नंद भवन म्हणतात, तर राधा राणी मंदिराला श्रीजी मंदिर म्हणतात. लाल दगडांनी बांधलेले श्रीजी मंदिर मुघलकालीन संरचनेसारखे वाटते. राजपूत वास्तुकलेचे उदाहरण म्हणूनही या मंदिराकडे बघितले जाते. मंदिर लाल वाळूच्या दगडाने बनवलेल्या भव्य राजवाड्यासारखे आहे. मंदिराच्या भिंती आणि छतावर कोरीवकाम आहे. मंदिराच्या कमानी, घुमट यांना चित्रांनी सजवलेले आहे. राधाष्टमी आणि होळीच्यावेळी होणारी लाठमार यावेळी हे राधाराणी मंदिर भक्तांनी फुलून जाते. सध्या हेच राधाराणी मंदिर सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही लोकप्रिय होत आहे. त्यामुळे या मंदिराला रोज हजारो भक्त भेट देऊन राधाराणीच्या चरणी लीन होत आहेत.
सई बने