रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 3 सप्टेंबर, 2024 रोजी मंगोलियाच्या दौ-यावर गेले होते. पुतिन यांची ही भेट वादाची ठरली. कारण युक्रेनवरील रशियन आक्रमणामुळे पुतिन यांच्यावर युद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासाठी पुतिन यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयानं वॉरंट जाहीर केलं होतं. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा यजमान देश म्हणून मंगोलियाचा समावेश आहे. अशात पुतिन मंगोलियाला गेल्यावर त्यांना अटक करण्यात येईल, अशी अटकळ होती. पुतिन यांचा हा मंगोलियाचा दौरा जाहीर झाल्यावर युक्रेनने मंगोलियाला पुतीनना अटक करुन हेग कोर्टात सोपवण्याचे आवाहनही केले होते. मात्र या सर्वात व्लादिमीर पुतिन निर्धास्त होते. त्यांनी मंगोलियाला भेट दिली आणि ते परत आले. (Vladimir Putin)
पण आता या दौ-याला काही दिवस झाल्यावर पुतिन मंगोलियाला का गेले होते, हे उघड झाले आहे. वास्तविक पुतिन हे मंगोलियाला एका तांत्रिकाला भेटण्यासाठी गेले होते. जगभरातील तांत्रिकांचा गढ म्हणून मंगोलियाचा उल्लेख केला जातो. याच मंगोलियातील एका प्रख्यात तांत्रिकाला भेटण्यासाठी पुतिन गेले होते. या तांत्रिकाबरोबर पुतिन यांनी युक्रेन युद्ध, दीर्घायुष्य, पुनर्जन्म याविषयावर चर्चा केलीच, शिवाय अणुहल्ल्याबाबतही तांत्रिकाचे मत घेतल्याची बातमी आली आहे. ही बातमी आल्यावर जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. (Vladimir Putin)
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मंगोलियाला भेट दिली. ही भेट खूपच गाजली. आता या दौ-यात पुतिन यांनी मंगोलिया आणि सायबेरियातील तांत्रिकांची भेट घेतली हे स्पष्ट झाले आहे. युक्रेन युद्धाबाबत पुतिन यांची भविष्यातील भूमिका काय असावी, याबाबत पुतिन यांनी या तांत्रिकांचा सल्ला घेतल्याचे सांगण्यात येते. यासोबत पुतिन हे आपल्या शारीरिक समस्यांनी सध्या त्रस्त आहेत. मध्यंतरी त्यांचा एक हात काम करत नसल्याचीही बातमी आली होती. त्यामुळे आरोग्याच्या समस्यांसह आपला पुनर्जन्म कसा असेल याबाबतही पुतिन तांत्रिकांसोबत बोलल्याचे सांगण्यात आले आहे. (Vladimir Putin)
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा जादूगार आणि तांत्रिकांवर प्रचंड विश्वास असल्याचे त्यांना ओळखणारे सांगतात. पुतिन जादूटोणा आणि तंत्र मंत्रावर विश्वास ठेवतात, असेही सांगण्यात येते. त्यासाठी ते वेळोवेळी या तांत्रिकांचा सल्ला घेतात. रशियातही काही तांत्रिक आहेत, ज्यांच्यावर पुतिन यांचा विश्वास आहे. सोबत मंगोलियातील तांत्रिकांबरोबरही पुतिन सल्लामसलत करतात, असे सांगण्यात येते. याच तांत्रिकांची भेट घेण्याची गरज होती. सोशल मिडियाच्या माध्यमातून हे काम शक्य नव्हते. या तांत्रिकाला प्रत्यक्ष भेटण्याची गरज होती. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अटक वॉरंटकडे दुर्लक्ष करीत पुतिन थेट मंगोलियाला पोहचले होते. (Vladimir Putin)
मंगोलियाच्या या भेटीत पुतिन यांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी काहीधार्मिक विधीही केल्याची माहिती पुढे आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, युक्रेन युद्धाचा अंत कसा होईल, हे पुतिन यांनाही जाणायचे होते. युक्रेन युद्ध सुरु झाल्यावर काही महिन्यात युक्रेन रशियाच्या अंकीत होईल, अशी जगाची अपेक्षा होती. अर्थात पुतिन यांनाही हिच अपेक्षा होती. मात्र आता तोच युक्रेन रशियावर भारी पडत आहे. युक्रेननं रशियाचा काही भागही ताब्यात घेतला आहे. यामुळे पुतिन यांची जगभरात चांगलीच नाचक्की झाली. यामुळे त्रस्त झालेल्या पुतिन यांनी युक्रेनवर अणुहल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी पुढे आली होती. पण युक्रेनवर पुतिन अणुहल्याचा विचार करत होते, हे त्यांच्या मंगोलियाच्या दौ-यानंतर स्पष्ट झाले आहे. कारण या भेटीत पुतिन यांनी त्या तात्रिंकासमोर आपला हा अणुयुद्धाचा इरादा स्पष्ट केल्याचेही उघड झाले आहे. (Vladimir Putin)
==============
हे देखील वाचा : पुतीन यांना मंगोलियात अटक होणार
===============
या मंगोलियाच्या तांत्रिकासह पुतिन यांनी सायबेरियाच्या जादुगाराचाही सल्ला घेतला आहे. सायबेरियाला जात असताना पुतिन हे तुवा येथे थांबले आणि एका जादुगाराला भेटल्याची माहिती पुढे आली आहे. पुतिन यांची ही भेट त्यांचे एक प्रमुख सहकारी मिखाईल कोवलचुक यांनी आयोजित केली होती. यावेळी पुतिन यांनी अण्वस्त्रांच्या वापरासाठी सल्लाही घेतला आहे. या भेटीत रशियाचा मुख्य जादूगार ओल उपस्थित असल्याची माहितीही पुढे आली आहे. पुतिन यांच्या या तांत्रिक भेटीचा तपशील पुढे आल्यामुळे सर्वत्र त्याची चर्चा सुरु झाली आहे, सोबत पुतिन ज्या तांत्रिकांना भेटले, त्यांनी पुतिन यांनी अणुयुद्धाबाबत काय सल्ला दिला, या बद्दलही चिंता व्यक्त होत आहे. (Vladimir Putin)
सई बने