दिल्ली मधील पुराना किल्ला (Purana Fort) हा मुघलकालीन किल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र ही ओळख चुकीची असल्याची माहिती आता उघड होत आहे. गेल्या काही वर्षापासून भारतीय पुरातत्व खात्यातर्फे या पुराना किल्ल्यामध्ये सर्वेक्षण चालू आहे. यातून अनेक धक्कादायक खुलासे होऊ पाहत आहेत. हा पुराना किल्ला नसून अनेक पांडवकालीन ग्रंथांमध्ये उल्लेख असलेला पुराण किल्ली असल्याचे स्पष्ट होत आहे. यमुनाकाठी वसलेले दिल्ली शहर पांडवाची राजधानी इंद्रप्रस्थ म्हणूनही ओळखले जाते. तेव्हा यमुना नदीच्या काठावर संस्कृतीचा विकास झाला. पांडवांची राजधानी अतिशय समृद्ध होती. त्याच काळातील हा पुराण किल्ला असल्याची शंका अनेकवेळा व्यक्त होत होती. यमुना नदिचा नंतर प्रवाह बदलला. शिवाय नदिला येणारे पूर यामुळे याभागातील वस्ती कमी होत गेली. राजकीय सत्ता बदलल्या, त्याचा परिणाम म्हणून या भागातील संस्कृती लोप पावली. त्यानंतर या किल्ल्यावर प्रत्येक शासकानं आपला हक्क सांगितला. त्यातून पुराण किल्ला हा पुराना किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र या किल्ल्यामध्ये आता मोठ्याप्रमाणात खोदकाम चालू आहे. त्या उत्खननात सापडलेल्या वस्तू महाभारत काळाशी संबंधित असू शकतात असा अंदाज भारतीय पुरातत्व खात्यानं व्यक्त केला आहे. या उत्खननातून अनेक प्राचीन शिल्पे बाहेर येत आहेत. काही मूर्ती 2500 वर्षे जुन्या असून मौर्य वंशाच्या वस्तूही या पुराण किल्ल्याच्या खोदकामात सापडल्यानं किल्ला मुघलकालीन नसल्याचे स्पष्ट होत आहे.(Purana Fort)

गेल्या काही वर्षापासून दिल्लीच्या पुराना किल्ल्याची (Purana Fort) नेमकी निर्मिती कोणी केली हा प्रश्न विचारला जात आहे. हा किल्लाही मुघलांनी आपल्या ताब्यात घेतला होता. त्यामुळे मुघलानींच या किल्ल्याची निर्मिती केली असा उल्लेखही काही ठिकाणी करण्यात आला. मात्र आता या किल्ल्याची निर्मिती मुघलांनी नाही तर त्याआधी अनेक वर्षापूर्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय पुरातत्व खात्यातर्फे या किल्ल्यात उत्खनन चालू असून यामध्ये भगवान विष्णू, देवी लक्ष्मी, गणपती या देवतांच्या मुर्ती आणि हिंदू देवांचे चित्र असलेली नाणीही सापडली आहेत. पुरातत्व खात्याच्या म्हणण्यानुसार किल्ल्याच्या उत्खननात सापडत असलेल्या वस्तू कोणत्याही एका काळातील नाहीत. त्यामुळेच या किल्ल्लावर अनेक शासकांनी राज्य केले असे स्पष्ट होत आहे. या किल्ल्यात सापडलेल्या भांड्याचे अवशेष हे अती पुरातन असून हे अवशेष पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थमधील आहेत का, याबाबत तपास तज्ञ करीत आहेत. (Purana Fort)
या किल्ल्यात आता तिस-या टप्प्यातील खोदकाम सुरु आहे. याआधी 1969 मध्ये प्रथम उत्खनन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील उत्खनन 2013-14 आणि 2017-18 मध्ये झाले. सध्या जेथे उत्खनन सुरू आहे त्या जागेला ‘इंद्रप्रस्थ उत्खनन स्थळ’ असे नाव देण्यात आले आहे. एएसआयचे संचालक वसंत स्वर्णकर यांच्या नेतृत्वाखाली या टप्प्याचे खोदकाम सुरू आहे.(Purana Fort)
========
हे देखील वाचा : प्रत्येक 12 वर्षांनी वीज पडून दुभंगलेले शिवलिंग पुन्हा कसे जोडले जाते? वाचा रहस्यमय कथा
========
आता तिस-या टप्प्यातील खोदकामात अनेक मुर्ती आणि भांडी सापडली आहेत. किल्ल्यातील एका टेकडीवर उत्खननात रंगीत भांडी सापडली आहेत. हे तुकडे महाभारत काळाशी संबंधित असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात तज्ञ अभ्यास करत असून या संपूर्ण परिसराचे उत्खनन करण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी लागेल असा अंदाज आहे, त्यानंतरच या किल्ला नेमका कुणी आणि कधी बांधला गेला, हे सांगता येईल, असे पुरातत्व विभागानं स्पष्ट केलं आहे. या किल्ल्यात मौर्य काळातील विहिरीचे अवशेषही सापडले आहेत. याशिवाय मौर्य काळातील कलावस्तूंच्या थराखाली साधे राखाडी भांडे आणि साधे लाल भांडे सापडले आहे. दिल्लीचे वर्णन अनेक ग्रंथांमध्ये ऐतिहासिक शहर म्हणून केले आहे. अनेकवेळा येथे खोदकामात जुन्या वास्तुशिल्पांचे अवशेष सापडले आहेत. मात्र पुराना किल्ल्यात चालू असलेल्या उत्खननामुळे सर्वच दिशा बदलली आहे. दिल्लीही अनेक वर्षापूर्वी संपन्न राजधानी असल्याचे स्पष्ट होत आहे. (Purana Fort)
दिल्ली विद्यापीठाजवळ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ काही दिवसापूर्वी झालेल्या उत्खननात अशीच भांडी सापडली आहेत. पुराण किल्ल्यातूनही मोठ्या प्रमाणात भांड्यांचे अवशेष मिळत आहेत. या भांड्यांसाठी वापरण्यात आलेल्या मातीच्या थरातून आता तज्ञ त्या भांड्याचे वय किती आहे, याचा माहिती गोळा करत आहेत. हे भांड्याचे तुकडे रंगीत असून काही तुकड्यांवर नक्षीकामही आहे. त्यामुळे अतिशय संपन्न संस्कृती काळाच्या ओघात जमीनीखाली गेली. त्यावर किल्ला बांधला गेला आहे का, याचाही शोध घेण्यात येत आहे. मात्र या सर्वामुळे दिल्ली येथेच पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ होती आणि पुराना किल्ली हा पांडवांचाच पुराण किल्ला असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
सई बने