श्रीकांत नारायण
पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे नवे सरकार सत्तेवर येऊन आठ-पंधरा दिवसही झाले नसतील तोच पंजाबचे नवे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी नाराज होऊन आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने पंजाब काँग्रेसमध्ये धर्मसंकट निर्माण झाले आहे. वास्तविक सिद्धू यांची अलीकडेच प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यामुळेच पंजाब काँग्रेसचे वजनदार नेते आणि मुख्यमंत्री असलेले कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास सांगण्यात आले होते. मात्र चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे नवे सरकार स्थापन करताना आपणास विश्वासात घेण्यात आले नाही आणि पंजाबसाठी मी कोणतीही तडजोड करू इच्छित नाही असे कारण सांगून सिद्धू यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये ‘सिद्धूची फिरली लहर आणि झाला कहर’ अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
नवज्योतसिंग सिद्धू हे भाजप सोडून काँग्रेसमध्ये आल्यापासून त्यांच्यात आणि तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिग (Amarinder Singh) यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते. सिद्धू हे ‘बोल बच्चन’ असल्यामुळे त्याच्या जोरावर ते पंजाबमध्ये लोकप्रिय झाले. त्यांना पंजाबचे नेतृत्व करण्याची स्वप्ने पडू लागली. त्यातच काँग्रेसमध्ये राहून दीर्घकाळ राजकारण करणारे कॅप्टन अमरिंदरसिंग हे सोनिया गांधी यांचे नेतृत्व मानणारे तर नवज्योतसिंग सिद्धू हे राहुल गांधींचे नेतृत्व मानणारे.
सिद्धू यांनी राहुल गांधी यांच्यावर असा काही प्रभाव पाडला की त्यांनाही पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतृत्व बदल करावासा वाटला. त्यानुसार सिद्धू यांना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष करण्यात आले आणि अमरिंदरसिंग यांनाही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली. एका अर्थाने सिद्धू यांचा दुहेरी विजय झाला होता. त्यामुळे कदाचित त्यांची महत्वाकांक्षाही वाढली असेल.
प्रदेशाध्यक्षपदापेक्षा मुख्यमंत्रीपद केंव्हाही महत्वाचे असे वाटल्यामुळे त्यांची सुप्त इच्छा जागी झाली असेल. मात्र काँग्रेस श्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाचा विचार न करता ‘दलित कार्ड’ वापरण्याचे निश्चित केले आणि मुख्यमंत्रीपदाची माळ चरणजितसिंह चन्नी यांच्या गळ्यात पडली तर त्यांच्याबरोबर मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत अग्रेसर असलेले रणजितसिंग रंधवा आणि ओमप्रकाश सोनी या दोघांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.
वास्तविक विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी चरणजितसिंह चन्नी यांच्या निवडीची घोषणा करताना पंजाबचे प्रभारी हरिसिंग रावत यांनी पंजाबच्या आगामी निवडणुका सिद्धू यांच्या लोकप्रिय नेतृत्वाखाली लढविल्या जातील असे जाहीरही केले होते आणि त्यावरून वादंगही माजले होते. तरी देखील सिद्धू नाराजच झाले. कदाचित मुख्यमंत्रीपदाचे त्यांचे स्वप्न भंगले असावे म्हणूनच त्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असावा. आता त्यांची मनधरणी करण्यात येत असल्याच्या बातम्या येत आहेत मात्र ‘विक्षिप्त’ सिद्धू त्याला कितपत मान देतात हे सांगणे अवघड आहे.
त्यांच्या राजीनाम्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये मात्र नाहक अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि त्यावर लवकर तोडगा काढण्यात आला नाही तर त्याचे पक्षावर गंभीर परिणाम होण्याचीही शक्यता आहे. कारण काँग्रेसमधील ‘जी-२३’ विचारवंत बंडखोरांनी यानिमित्ताने पुन्हा उचल खाल्ली आहे. श्री कपिल सिब्बल यांनी तर सिद्धूप्रकरणी ”असे निर्णय घेतात तरी कोण ?” अशा शब्दात काँग्रेस श्रेष्ठींना फटकारले आहे. पक्षात ‘हुजरेगिरी’ करून असे निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्यांना सिब्बल यांनी चांगली चपराक लगावली आहे.
सिद्धू यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींची — विशेषतः राहुल गांधी यांची — कशी जिरली या आनंदात असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लगेच दिल्ली गाठली आणि भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन गुफ्तगू केले. अमरिंदर सिंग यांच्यासाठी भाजपने केंव्हाच पायघड्या घातल्या आहेत. ते केंद्रीय कृषी मंत्री होण्याच्या शक्यतेचीही चर्चा चालू आहे. त्यामुळे जर अमरिंदरसिंग भाजपमध्ये गेले तर काँग्रेसचे पंजाबमध्ये खूप मोठे नुकसान होणार आहे.
याशिवाय काँग्रेसमधील सध्याच्या अस्वस्थतेचा ‘आम आदमी पार्टी’ ही लाभ घेण्याची शक्यता आहे. ‘आप’ चे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लगेच पंजाबचा दौरा करून तेथील परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. आगामी निवडणुकीत काँग्रेसला ‘आप’ हाच चांगला पर्याय ठरू शकतो असे पंजाबमधील सध्याचे वातावरण आहे. त्यामुळे पंजाबसारख्या राज्यात आपली सत्ता टिकवायची असेल तर काँग्रेसला फार महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील तूर्त तरी या ‘सिद्धू –पुराणाचा’ शेवट काँग्रेस श्रेष्ठी कसा करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.