Home » दोन ‘सरदारां’मधील संघर्ष – पंजाबमधील काँग्रेस ‘तरणार’ की बुडणार ?

दोन ‘सरदारां’मधील संघर्ष – पंजाबमधील काँग्रेस ‘तरणार’ की बुडणार ?

by Correspondent
0 comment
Navjot Singh Sidhu | K Facts
Share

श्रीकांत नारायण

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा तीव्र विरोध असताना देखील काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पंजाब प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांचे कट्टर विरोधक नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची निवड केली. त्यामुळेदोन ‘सरदारा’ मधील संघर्ष येत्या काही दिवसात पंजाब काँग्रेसमध्ये ‘रणकंदन’ माजणार की मुख्यमंत्री अमरिंदरसिंग हे नवज्योतसिंग सिद्धू यांचे नेतृत्व स्वीकारणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ज्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणूक झाल्या त्यापैकी बोटावर मोजता येणाऱ्या राज्यात काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली. त्यामध्ये पंजाब हे एक प्रमुख राज्य होते. कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पंजाबमध्ये भाजप-अकालीदल युतीचा दणदणीत पराभव करून सत्ता हस्तगत केली. त्यामुळे काँग्रेसला उत्तर भारतात एक प्रमुख राज्य काबीज करता आले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वावर तेथील जनतेने शिक्कामोर्तब केले.

 Navjot Singh  Sidhu

पतियाळाचे महाराजा असलेले कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे काँग्रेसमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून वर्चस्व आहे. त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार पाच वर्षे अगदी सुखनैवपणे सत्ता सांभाळेल असे वाटत होते. परंतु थोड्याच दिवसात पंजाब काँग्रेस मध्ये कुरुबुरी सुरु झाल्या आणि त्याला कारण होते पक्षाचे आणखी एक नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाला दिलेले आव्हान. त्यामुळे पंजाबमध्ये सत्ता हाती आल्यापासून काँग्रेसच्या या दोन नेत्यांमध्ये पक्षांतर्गत शह-काटशहाचे प्रयत्न सुरु झाले.

पंजाबमधील काँग्रेसच्या विजयात नवज्योतसिंग सिद्धू यांचाही थोडा फार वाटा आहे. कारण सिद्धू पहिल्यापासूनच ‘बोलबच्चन’ म्हणून प्रसिद्ध आहेत. जाहीर सभेत दणकेबाज भाषण करून सभा जिंकण्यात त्यांचा हातखंडा आहे. याच जोरावर ते राजकारणात पुढे आले. सुरुवातीला नवज्योतसिंग सिद्धू हे क्रिकेटपटू म्हणून लोकप्रिय होते. त्यांच्या फटकेबाजीने क्रिकेट-रसिकांनी त्यांना डोक्यावर घेतले. मात्र त्यांची क्रिकेटची कारकीर्द थोड्याच काळापुरती यशस्वी ठरली. त्यानंतर त्यांनी कधी ‘लाफ्टर चॅलेंन्ज’ तर कधी ‘कपिल शर्मा शो’ सारख्या रिऍलिटी शो मध्ये प्रमुख पाहुण्यांच्या भूमिकेत जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. त्यामुळे ते घराघरांत पोहोंचले. त्याचाच फायदा घेऊन ते राजकारणात आले.

सुरुवातीला सिद्धू भाजपमध्ये होते. २०१४ साली भाजपच्या तिकिटावर ते पंजाबमधून लोकसभेवर निवडूनही आले. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांना भाजपतर्फे तिकिटच देण्यात आले नाही त्यामुळे सिद्धू भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये आले आणि अल्पावधीतच ते पंजाब काँग्रेसचे एक प्रमुख नेते बनले. पंजाब विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसतर्फे निवडून आले आणि कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही झाले.

अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांना उपमुख्यंमत्रीपद हवे होते मात्र अमरिंदरसिंग यांनी त्यांची साध्या मंत्रिपदावर बोळवण केली तीही पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून. त्यामुळे नाराज झालेल्या सिद्धू यांनी अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाला शह देण्याचे सुरुवातीपासून प्रयत्न केले. अमरिंदरसिंग यांच्या मते सिद्धू हे ‘परिपक्व’ नेते नाहीत त्यामुळे दोघांतील वितुष्ट वाढत गेले. आणि एक दिवस सिद्धू यांना त्यांच्या मंत्रीमंडळातूनही बाहेर पडावे लागले. त्यानंतर पंजाब काँग्रेसमध्ये अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू असे सरळसरळ दोन गट झाले. दोन्ही गटांनी एकमेकांविरूद्ध पक्षश्रेष्ठींविरुद्ध तक्रारी चालूच ठेवल्या.

 Capt Amarinder  Singh

पक्षश्रेष्ठींनी दोन्ही गटांत समझोता घडवून आणण्याचा प्रयन्त केला मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. अमरिंदरसिंग यांना त्यांच्या गटाचा प्रदेशाध्यक्ष हवा आहे. यापूर्वीचे प्रदेशाध्यक्ष बावजा यांच्याशीही त्यांनी जमवून घेतले नाही. त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर त्यांच्या जागी पक्षश्रेष्ठींनी नवज्योतसिंग सिद्धू यांचीच निवड करून अमरिंदरसिंग गटाला धक्काच दिला. त्याच्या आधी पक्षातंर्गत कुरबुरीचे नाट्य बरेच दिवस पाहायला मिळाले. सिद्धू प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत म्हणून अमरिंदरसिंग यांनीही जोरदार प्रयत्न केले मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही.

अर्थात सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष करताना काँग्रेस श्रेष्ठींनी अमरिंदर सिंग यांचे मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवले आहे. कारण पुढील वर्षीच म्हणजे २०२२ साली पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अमरिंदरसिंग आणि सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवून पंजाबमध्ये पुन्हा सत्ता हस्तगत करायची असा काँग्रेस श्रेष्ठीचा विचार दिसतोय.

कृषी विधेयकावरून अकाली दल आणि भाजपमधील युती यापूर्वीच तुटली आहे. त्यामुळे पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची पुन्हा युती होईल की नाही याबाबत संभ्रम आहे. हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले तर काँग्रेसला विजयाची चांगली संधी आहे.  मात्र त्यासाठी प्रथम या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन आवश्यक आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी यापूर्वी आपल्यावर केलेल्या वैयक्तिक टिकेबद्दल जाहीर माफी मागावी अशी अमरिंदर सिग गटाची मागणी आहे. मात्र त्याला सिद्धू यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही एवढेच नव्हे तर प्रदेशाध्यपदी निवड झाल्यानंतर पंजाबमध्ये परतून तीन दिवस झाले तरी सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांची साधी भेटही घेतली नाही. दिल्लीहून परतल्यानंतर नवज्योतसिंग सिंद्धू यांचे अमृतसरमध्ये प्रचंड जल्लोषात स्वागत झाले.

तीन मंत्र्यांसह काँग्रेसच्या ८० आमदारांपैकी ६२ आमदार सिद्धू यांना ‘मिळाले’ असल्याचे समजते. त्यामुळे सिद्धू गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन झाले हे मात्र खरे. सिद्धू गटाच्या या शक्तिप्रदर्शनावर अमरिंदर सिंग यांचा गट कशी प्रतिक्रिया व्यक्त करतो तेच आता पाहावे लागले. सिद्धू आणि अमरिंदरसिंग या दोन ‘सरदारां’मध्ये दिलजमाई झाली तर ती पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने चांगलीच गोष्ट ठरणार आहे. नाही तर उभय नेत्यांमधील संघर्ष असाच चालू राहिल्यास पंजाब मधील काँग्रेस ‘तरणार’ की ‘बुडणार’  हे प्रश्नचिन्ह कायम राहणार आहे.

– श्रीकांत नारायण
 (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.