Home » पंजाबमधील ‘आप’ चा विजय ही बदलत्या राजकारणाची नांदी ?  

पंजाबमधील ‘आप’ चा विजय ही बदलत्या राजकारणाची नांदी ?  

by Team Gajawaja
0 comment
Punjab Election Results 2022
Share

उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानोत्तर चाचणीनुसार सर्व निकाल लागत आहेत. यापैकी पंजाब राज्यात ‘आम आदमी पार्टी’ला बहुमत मिळून तो पक्ष सत्तेवर येऊ शकतो, असे भाकीत वर्तविण्यात आले होते. त्यानुसार पंजाबमध्ये ‘आप’ ने मुसंडी मारली असून सत्तारूढ काँग्रेससह, अकाली दल, भाजप या प्रमुख पक्षांचा दारुण पराभव झाला आहे. (Punjab Election Results 2022)

दिल्लीनंतर प्रथमच ‘आप’ ने उत्तर भारतातील पंजाबसारख्या प्रमुख राज्यात सत्ता हस्तगत केली आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाचे खरोखरच कौतुक करण्यासारखे आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत राज्यशकट हाकताना जो पॅटर्न राबविला होता तोच पंजाबमध्ये राबविण्याचे जाहीर केले होते. शिवाय भगवंत मान यांच्यासारख्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे केले होते. (Punjab Election Results 2022)

पंजाबच्या जनतेने ‘आप’ चा हा निर्णय स्वीकारून त्यांच्या ‘झाडू’ ला सर्वाधिक पसंती दिली. पंजाब विधानसभेतील ११७ जागांपैकी तब्बल ९० जागा जिंकून ‘आप’ने दोन तृतीयांश बहुमत मिळविले आहे. पंजाबमधील ‘आप’ चा विजय म्हणजे अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीला देशात हळूहळू मान्यता मिळत असल्याचे द्योतक आहे. 

यापूर्वीही देशात सर्वत्र मोदी-लाटेत प्रमुख विरोधी पक्षांची धूळधाण होत असताना अरविंद केजरीवाल यांनी एकट्या दिल्लीत फक्त ‘आप’ ची सत्ता कायम टिकविली होती. अरविंद केजरीवाल यांच्या प्रामाणिक आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आखलेल्या धोरणांचा तो परिपाक होता.

विशेष म्हणजे गेले दहा वर्षे पंजाबमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेसचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. मुख्यमंत्री चरणजित चेन्नी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह बहुतेक सर्व मंत्र्यांना पराभव स्वीकारावा लागला. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसश्रेष्टींनीं पंजाबच्या नेतृत्वाच्या प्रश्नावरून आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतल्यामुळे  काँग्रेसचा हा दारुण पराभव झाला असेच म्हणावे लागेल. (Punjab Election Results 2022)

नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासारख्या अहंकारी, अपरिपक्व आणि अति उत्साही नेत्याला अवास्तव महत्व देण्यात आले. त्यांच्यामुळे  कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासारख्या नेत्याला काँग्रेस सोडणे भाग पडले. अर्थात त्यांनाही जनतेने नाकारले ही गोष्ट खरी असली तरी काँग्रेस सोडून जाताना कॅप्टन सिंग यांनी काँग्रेसला सुरुंग लावण्याचे काम व्यवस्थितपणे केले होते. 

====

हे देखील वाचा: दोन ‘सरदारां’मधील संघर्ष – पंजाबमधील काँग्रेस ‘तरणार’ की बुडणार ?

====

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याजागी मुख्यमंत्री म्हणून आलेल्या चरणजितसिंह चेन्नी यांचाच चेहरा पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी घोषित करण्यात आला. त्यालाही नवज्योतसिंग सिद्धू यांनी आतून विरोध केला त्यामुळेच अंतर्गत कलह काँग्रेसला नडला आणि या पक्षाला अवघ्या १८ जागांवर समाधान मानावे लागले. 

काहीही झाले की ‘ठोको ताली’ असे म्हणणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू यांना जनतेने ‘ठोको ताली’ नेच प्रत्युत्तर देऊन चांगला धडा शिकविला. उत्तर भारतात राजस्थान वगळता पंजाबसारख्या एकमेव राज्यात काँग्रेसला सत्ता होती. तेही राज्य हातातून गेल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने खरोखरच चिंताजनक बाब म्हणावी लागेल. काँग्रेसच्या विद्यमान नेतृत्वाने त्याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

पंजाबमधील या निवडणुकीत जनतेने शिरोमणी अकाली दल या प्रमुख पक्षालाही नाकारले आहे. दहा वर्षांपूर्वी भाजपने शिरोमणी अकाली दलाशी युती करून पंजाबची सत्ता मिळविली होती. शिरोमणी अकाली दल हा भाजपचा फार जुना मित्र पक्ष होता. परंतु अलीकडेच शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नावरून मतभेद झाल्यामुळे उभय पक्षातील युती संपुष्टात आली आणि पंजाबच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष आमने-सामने उभे राहिले. मात्र शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनाही या निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. 

====
हे देखील वाचा: पंजाबमध्ये ‘अर्थपूर्ण’ सत्ताबदल

====

पंजाबमध्ये अनेक वर्षे  सत्तेवर असलेल्या या पक्षाला या निवडणुकीत अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर भाजपने त्यांना चुचकारले आणि त्यांच्या नव्या पक्षाबरोबर युती करून ही निवडणूक लढविली होती मात्र जनतेने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह भाजपलाही नाकारले. भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. (Punjab Election Results 2022)

थोडक्यात सांगायचे तर, पंजाबमध्ये ‘आप’ च्या ‘झाडू’ने सर्वच प्रमुख राष्ट्रीय पक्षांना ‘साफ’ केले आहे. दिल्लीनंतर आता पंजाबमधील जनतेनेही केजरीवाल यांच्या  नेतृत्वावर शिक्कामोर्तब  केले आहे. त्यामुळे ‘आम आदमी पार्टी’ हळूहळू काँग्रेसला पर्याय ठरत चालली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तसे झाल्यास ती देशातील बदलत्या राजकारणाची नांदीच म्हणावी लागेल.  

– श्रीकांत नारायण

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.