Home » सर्वपक्षीय हितसंबंध असलेले अविनाश भोसले आणि येस बँक – डीएचएफएल घोटाळा

सर्वपक्षीय हितसंबंध असलेले अविनाश भोसले आणि येस बँक – डीएचएफएल घोटाळा

by Team Gajawaja
0 comment
Avinash Bhosle
Share

नेमेचि येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे दर काही काळानंतर अविनाश भोसले (Avinash Bhosle) नावाच्या पुणेकराबद्दल नवी कोणती तरी चर्चा ऐकायला मिळते. एखाद्या सुरस अरबी कहाणीप्रमाणे अविनाश भोसले यांच्याबद्दलचे किस्से, कहाण्या, दंतकथा प्रसिद्ध आहेत. येस बँक घोटाळ्याप्रकरणी (Yes bank loan case) त्यांना झालेल्या अटकेनंतर या किश्श्यांची नव्यानं उजळणी पुण्यात होत आहे.

तुम्ही बाणेर- पाषाण भागात राहात असाल, तर दर काही दिवसांनी आकाशात काळं हेलिकॉप्टर अगदी जवळून उडताना पाहिल्यावर ‘अविनाश भोसले (Avinash Bhosle) निघाले असतील ऑफिसला’ असं उगाच म्हणायची- ऐकायची सवय नक्कीच असेल. किंबहुना घरी येणाऱ्या बाहेरगावच्या पाहुण्यांसाठीच्या स्थळदर्शनामध्ये बाणेरमधला भोसले यांचा आलिशान बंगलासुद्धा अर्थात दुरून दाखवत असाल आणि बंगल्यातच कसं हेलिपॅड बांधलंय हे सांगायलाही विसरत नसाल!

एरवी भोसले मीडियाच्या प्रकाशझोतात फारसे दिसत नसले, तरी त्यांची चर्चा सामान्यांपासून पत्रकारांपर्यंत सगळीकडे असते. कधी पुण्याजवळ शूटिंगसाठी आलेल्या ब्रॅड पिट- अँजेलिना जोलीच्या पाहुणचारासाठी, कधी त्यांच्याकडे असलेल्या एकापेक्षा एक महागड्या गाड्यांसाठी, कधी स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्याशी असलेल्या जवळकीसाठी, तर कधी महाबळेश्वरच्या बंगल्यात ठाकरे पिता- पुत्रांसह घालवलेल्या सुट्टीमुळे ते चर्चेत येतात. फक्त बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या अविनाश भोसले यांची कहाणी खरंतर अतिशय सामान्यापासून असामान्यापर्यंत पोहोचलेल्या माणसाची असली, तरी दुर्देवाने प्रेरणादायी नाही. हां… अचंबित करणारी नक्कीच आहे.

रिक्षापासून हेलिकॉप्टरपर्यंत

अविनाश भोसले (Avinash Bhosle) इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड- एबीआयएल (ABIL Group) नावाची मोठी कंपनी, भव्य बंगला आणि आलिशान गाड्यांचे मालक असलेले अविनाश भोसले यांच्याकडे चार दशकांपूर्वी केवळ एक रिक्षा होती. बारावी नापास झाल्यानंतर भोसले पैसे कमावण्याच्या उद्देशाने आपल्या गावातून – संगमनेरमधून पुण्यात आले. त्यांनी कर्ज काढून रिक्षा विकत घेतली आणि ती भाड्यावर दिली. त्यातून मिळालेल्या पैशांतून त्यांनी आणखी दोन रिक्षा दिल्या आणि काहीच काळात आपल्या ओळखीच्या एका बिल्डरवरून प्रेरणा घेत रिअल इस्टेट क्षेत्रात येण्यासाठी पुरेसं भांडवल जमवलं.

काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनीच सांगितल्याप्रमाणे भाजपाच्या अनिल शिरोळे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याशी ओळख करून दिल्यानंतर त्यांचं करियर खऱ्या अर्थाने बहरलं. मुंडे यांनी भोसलेंना मोठं कर्ज दिल्याचं आणि भोसले यांनीही ते कर्ज व्याजासह फेडल्याचं सांगितलं जातं. त्याहीपेक्षा सरकारी कंत्राटाचं क्षेत्र मुंडे यांनी भोसलेंना खुलं करून दिलं असं म्हणतात. १९९५ मध्ये सेना- भाजप (Shivsena-BJP) सत्तेत असताना भोसले यांना जलसिंचन क्षेत्रातली बरीच कंत्राटं मिळाली आणि त्यानंतर त्यांना मागे वळून पाहायची गरज उरली नाही. भरपूर काम आणि पैसे तर मिळालेच, पण सोबत राजकीय वरदहस्तही त्यांना मिळाला.

राजकीय संबंध

भोसले सुरुवातीपासूनच सर्वपक्षीय संबंधांसाठी चर्चेत राहिले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांची सर्वात जास्त जवळीक होती असं म्हणतात. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबरोबरही त्यांचे घनिष्ट संबंध होते. २००७ मध्ये ठाकरे पित- पुत्र भोसले यांच्या महाबळेश्वर इथल्या फोर ओक्स बंगल्यात सुट्टीसाठी येऊन राहिले होते. किंबहुना बाळासाहेब कधीही पुण्यात असले, तरी अविनाश भोसले स्वतः त्यांचं सारथ्य करायचे असं सांगतात. पुण्यातला जिजाई नावाचा आपला बंगला अजित पवार (Ajit Pawar) यांना विकल्यानंतर त्यांचे पवारांशी असलेले संबंध स्पष्ट झाले होते. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे बहुतेकांशी जवळचे संबंध आहेत. आता ते काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांचे सासरे असल्यामुळे या अटकेनंतर पक्षात चर्चा असल्याचं सूत्रांनी सांगितलं. खरंतर आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकरणात भोसले यांचं नाव आलेलं आहे, मात्र प्रत्येकवेळेस त्यांची त्यातून सुटका झालेली आहे.

२००७ मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयानं (डीआरआय) लंडनमधून परतत असलेल्या भोसलेंना (Avinash Bhosle) ५० लाख रुपयांचं सीमाशुल्क चुकवल्याच्या आरोपावरून अटक केली होती, पण त्या प्रकरणी त्यांना जामीन देण्यात आला. पुढे काही वर्षांनी आदर्श घोटाळ्यातही त्यांचं नाव आलं होतं. गेल्या वर्षीही त्यांची आणि त्यांच्या मुलाची अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी- ED) चौकशी केली होती.

=============

हे देखील वाचा – पैगंबरांसंदर्भातील विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या नुपूर शर्मांचा शैक्षणिक ते राजकीय प्रवास

=============

२३ जूनची प्रतीक्षा

येस बँक – डीएचएफएल घोटाळा प्रकरणात (DHFL-Yes bank loan case) २६ मे रोजी अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांना अटक झाली असली, तरी सीबीआयच्या म्हणण्यानुसार ते गेल्या दोन वर्षांपासून या सगळ्याचा तपास करत आहेत. काल अविनाश भोसले यांनी उच्च न्यायालयात आपली अटक बेकायदा असल्याचा दावा करत सीबीआयला आव्हान दिले आहे. न्यायालयाने सीबीआयला २३ जून रोजी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआय काय भूमिका मांडणार, या सगळ्या घोटाळ्यात भोसले यांची भूमिका आहे, ती स्पष्ट होणार का, की ते यातून सहीसलामत बाहेर पडणार हे सगळे प्रश्न आहेत. निष्कर्ष काहीही असला, तरी त्यांच्याबदद्ल प्रसिद्ध असलेल्या कथा- किश्श्यांत आणखी एकाची भर पडण्याची शक्यता जास्त आहे. 

– कीर्ती परचुरे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.