राजू शेट्टी हे दूध दरवाढीसाठी 27 ऑगस्ट रोजी बारामतीत मोर्चा काढणार आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पवारांसोबत लंच डिप्लोमसीनंतर राजू शेट्टी हे पवारांना शह देणे थांबवतील असे वाटत असताना त्यांनी शरद पवारांच्या बारामतीतच मोर्चा काढून आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी हे वेगवेगळ्या जिल्ह्यात दूध दरवाढी साठी आंदोलन करत आहेत.
राज्यातील दुध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असून २५ रुपये प्रतिलिटरचा दर राज्यात शेतकऱ्यांच्या पोरांचे सरकार आल्यानंतरही १७ ते १८ रुपयांवर घसरला आहे. उत्पादन खर्चापेक्षा निम्म्या दराने दुध उत्पादकांना दर मिळत असून प्रतिलिटर ३० ते ३५ रुपये उत्पादन खर्च असलेल्या दुधाचा दर वाढवून द्यावा, दुधावरील जीएसटी रद्द करावी, केंद्र सरकारने दुधाच्या भुकटी आयातीचा निर्णय रद्द करावा अशा विविध मागण्या घेऊन स्वाभिमानीने दुध दर आंदोलन सुरू केले आहे.
येत्या २७ ऑगस्ट रोजी बारामतीतील प्रांत कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटना मोर्चा काढणार आहे. या मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.