पृथ्वीराज चौहान आणि राजकुमारी संयोगिता यांच्या प्रेमकथेचे साक्षीदार असलेल्या शिवमंदिरात श्रावण महिन्यात भक्तांची अहोरात्र गर्दी असते. आग्रा शहरामध्ये चार प्रसिद्ध शिवमंदिरे आहेत. त्यापैकी एक म्हणजे पृथ्वीनाथ महादेव मंदिर. सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या नावावरुन असलेले हे शिवमंदिर ८०० वर्ष जुने असून याची उभारणी स्वतः पृथ्वीराज चौहान यांनी केल्याची माहिती आहे. या मंदिरात श्रावण महिन्यात मोठी गर्दी असते. श्रावण महिन्याच्या सोमवारी मंदिरात जत्रा भरते. शिवाय मंदिरात भस्म आरतीही केली जाते. (Prithvinath Mahadev Temple)
आग्रा येथील पृथ्वीनाथ शिवमंदिराचे सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याबरोबर अनोखे नाते आहे. ८०० वर्ष जुन्या असलेल्या या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू असल्याची माहिती आहे. तसेच हे शिवलिंग किती मोठे आहे, याचा शोध अद्यापही लागलेला नाही. हे मंदिर जागृत स्थान म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यात येथे पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होते. आग्रा शहरातील शहागंजमध्ये असलेल्या या मंदिरातील भस्म आरतीला भाविकांची मोठी गर्दी होते. मंदिर परिसरात छोटे महादेव आणि भगवान हनुमान यांचीही मंदिरे आहेत. श्रावण महिन्यात येथे भगवान शंकराला जल अर्पण करण्यासाठी देशभरातून भाविक येतात. हे मंदिर ८०० वर्षांहून अधिक जुने आहे. पूर्वी हा भाग घनदाट जंगलाचा होता. येथे मोठा तलावही होता. आग्राचा हा भाग राजस्थानचे प्रवेशद्वार होते. हे पृथ्वीनाथ मंदिर जिथे उभारले आहे त्या भागात, एक विहीर आणि धर्मशाळा होती. जंगलातून प्रवास करणारे प्रवासी येथे थांबून विश्रांती घ्यायचे आणि मग राजस्थानमध्ये प्रवेश करायचे. (Prithvinath Mahadev Temple)
या धर्मशाळेत एकाचवेळी शंभरहून अधिक यात्रेकरु रहात आणि जेवत असत. सम्राट पृथ्वीराज चौहानही याच धर्मशाळेत थांबले होते. कन्नौजचा राजा जयचंद यांनी आपली कन्या राजकुमारी संयोगिता हिचा स्वयंवर आयोजित केले होते. राजकुमारी संयोगिता हिने सम्राट पृथ्वीराज चौहान यांना आपले पती म्हणून निवडले. पण राजा जयचंद यांचा त्याला विरोध होता. म्हणून पृथ्वीराज चौहान यांनी स्वयंवरातून राजकुमारी संयोगिताचे अपहरण केले. यानंतर पृथ्वीराज चौहान आग्रा येथे पोहोचले. त्यांनी धर्मशाळेत सैन्यासह आपला तळ ठोकला. सैनिकांनी त्यांचे घोडे येथील एका भल्यामोठ्या झाडला बांधून ठेवले. मात्र काही वेळाने घोडे आपोआप मोकळे झाले. शिपायांनी पुन्हा घोडे बांधले. पण त्यावेळीही घोडे मोकळे झाले.
त्यामुळे घाबरलेल्या सैनिकांनी पृथ्वीराज चौहान यांना या प्रकाराची माहिती दिली. पृथ्वीराज चौहान यांनी ते मोठे झाडच मुळापासून उपटून काढले. तेव्हा त्या झाडाच्या मुळाशी शिवलिंगही वर आले. हे शिवलिंग वर आल्यावर पृथ्वीराज चौहान यांनी शिवलिंग काढण्यासाठी खोदकाम करून घेतले. सुमारे ४० फूट खोदल्यावरही शिवलिंगाचा शेवट सापडला नाही. त्याच रात्री प्रत्यक्ष भगवान शंकरांनी पृथ्वीराज चौहान यांना साक्षात्कार दिला आणि मी अनंत आहे, असा संदेश दिला. तेव्हा पृथ्वीराज चौहान यांनी भगवान शंकाराला नमस्कार करुन भव्य मंदिर बांधायला घेतले. जिथे पृथ्वीराज चौहान यांनी हे शिवलिंग मिळाले तिथेच हे मंदिर बांधण्यात आले. त्यामुळे या मंदिराचे नाव पृथ्वीनाथ महादेव पडले. या मंदिराचे नंतर या मार्गाचा वापर करणा-या व्यापा-यांनी वेळोवेळी नुतनीकरण केले. (Prithvinath Mahadev Temple)
====================
हे देखील वाचा : चमत्कारी नागवासुकी मंदिर
===================
पृथ्वीनात शिवमंदिराच्या एका मजल्यावर भगवान शंकर आपल्या सर्व कुटुंबासह विराजमान झाले आहेत. त्यामुळे या मंदिरात श्रावण महिन्यात संपूर्ण कुटूंबासह भाविक एकदा तरी येतात. भोलेनाथांच्या आशीर्वादाने कुटुंब सुखी राहते. तसेच भोलेनाथ आपल्या दारी येणाऱ्या सर्व भक्तांचे दुःख दूर करतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी प्राचीन पृथ्वीनाथ महादेव मंदिरात मोठी यात्रा भरते. ज्यामध्ये शिवभक्त दूरदूरवरून येतात. मंदिरात येणारी भाविकांची मोठी गर्दी पाहता मंदिर प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडून येथे चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या वर्षीही येथे भव्य आणि भव्य जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सम्राट पृथ्वीराज चौहान यांनी बांधलेल्या या मंदिरात आजही राजस्थानमधील शिवभक्त मोठ्या संख्येनं येतात. (Prithvinath Mahadev Temple)
सई बने.