Home » Prince Andrew : एक राजकुमार अखेर जमिनीवर आला !

Prince Andrew : एक राजकुमार अखेर जमिनीवर आला !

by Team Gajawaja
0 comment
Prince Andrew
Share

ब्रिटीश राजे चार्ल्स तिसरे यांचे धाकटे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांना अखेर जमिनीवर यावे लागले आहे. गेल्या काही वर्षापासून प्रिन्स अँड्र्यू यांचे नाव अमेरिकन गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी जोडले गेले. या जेफ्रीवर अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. प्रिन्स अँड्र्यू यांनी १७ वर्षीय व्हर्जिनिया गिफ्रे हिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्याबाबत व्हर्जिनिया हिनं आपल्या पुस्तकातही अँड्र्यू यांचा उल्लेख केला. यामुळे ब्रिटीश राजघराण्यात खळबळ उडाली. प्रिन्स अँड्र्यू यांच्यावरील आरोप एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी एका चिनी गुप्तहेराकडे राजघराणे आणि ब्रिटीश सरकारची माहिती दिल्याचाही आरोप आहे. यामुळे प्रिन्स अँड्र्यू यांची प्रतिमा डागाळलीच शिवाय राजघराण्यावर टिकेची झोड उठली होती. (Prince Andrew)

यामुळे काही दिवसापूर्वी प्रिन्स अँड्र्यू यांनी आपल्या शाही पदव्यांचा त्याग केल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांना राजघराण्याकडून सर्व फायदे मिळत होते. त्यातच त्यांचे निवासस्थानी शाही राजवाड्यात होते. ज्या राजकुमारामुळे देशाची बदनामी होत आहे, त्याच्या निवासाचा आणि अन्य खर्च जनतेच्या करातून का व्हावा, असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. त्यामुळे ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांनी प्रिन्स अँड्र्यूबाबत निर्णय घेतला आहे. प्रिन्स अँड्र्यू यांच्या शाही पदव्या काढून घेण्यात आल्या असून त्यांना विंडसर कॅसल कॉम्प्लेक्समधील रॉयल लॉजमधून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ६५ वर्षीय अँड्र्यू हे दिवंगत राणी एलिझाबेथ यांचे दुसरे पुत्र आहेत. अँड्र्यू यांचे नाव अमेरिकन गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी जोडले गेल्यापासून ब्रिटनमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. याबाबत आता राजघराण्यावरही टिका वाढल्यामुळे अँड्र्यू यांच्यावर अखेर निर्णय घेण्यात आला आहे. (International News)

त्यांची ‘ड्यूक ऑफ यॉर्क’ ही शाही पदवी आणि इतर सर्व शाही सन्मान काढून घेतल्याचा निर्णय बकिंगहॅम पॅलेसने जाहीर केला आहे. जेफ्री एपस्टाईन फाईल खुली झाल्यापासून अँड्र्यूचे नाव सतत वादात अडकले आहे. या प्रकरणामुळे ब्रिटनची बदनामी झाली आहे. अशा बदनाम राजकुमाराचा खर्च ब्रिटीश जनतेच्या खिशावर का, हा प्रश्नही विचारला जात होता. अँड्र्यू यांना शाही निवासस्थानात राहण्याचा हक्क नाही, असे अनेक मेसेज सोशल मिडियावर येऊ लागले. प्रिन्स अँड्र्यू २००३ पासून रॉयल लॉजमध्ये राहत होते. विंडसरच्या मैदानावर असलेले ही विस्तीर्ण ३० खोल्यांची हवेली पूर्वी त्यांची आई, राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निवासस्थान होते. अशा जागी बदनाम अँड्र्यू यांना रहाण्याचा अधिकार नाही, अशा त-हेने दबाव राजघराण्यावर आणण्यात आला. ब्रिटनच्या संसदेतही यावर चर्चा झाल्यामुळे राजे चार्ल्स यांनी अँड्र्यू यांच्या पदव्या काढून त्यांना शाही निवासस्थान सोडण्याचीही सूचना केली. आता अँड्र्यू पूर्व इंग्लंडमधील सँडरिंगहॅम इस्टेट या त्यांच्या खाजगी निवासस्थानात रहातील. (Prince Andrew)

अँड्र्यू आता ‘अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर’ म्हणून ओळखले जातील. याआधी टिकेचा सूर पहाता अँड्र्यूने आधीच “हिज रॉयल हायनेस” ही पदवी वापरणे थांबवले होते. गेल्या पाच वर्षांपासून ते सार्वजनिक जीवनातून दूर आहेत. अँड्र्यू यांनी १९१७ मध्ये राजा जॉर्ज पाचव्याने जारी केलेल्या आणि २०१२ मध्ये एलिझाबेथ द्वितीय यांच्या हुकुमानुसार ‘प्रिन्स’ ही पदवी धारण केली होती. माउंटबॅटन-विंडसर हे नाव १९६० मध्ये तयार करण्यात आले होते. यातून ब्रिटनच्या दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय आणि त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या कुटुंबातील नावांना एकत्र करण्यात आले. (International News)

अँड्र्यू यांच्या शाही पदव्या काढून घेण्यात आल्यामुळे अँड्र्यूची माजी पत्नी सारा फर्ग्युसन यापुढे ‘डचेस ऑफ यॉर्क’ ही पदवी वापरणार नाही. तथापि, त्यांच्या मुली, राजकुमारी बीट्रिस आणि राजकुमारी युजेनी यांच्या शाही पदव्या कायम रहाणार आहेत. प्रिन्स अँड्र्यूवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या व्हर्जिनिया गिफ्रे यांचे एप्रिलमध्ये निधन झाले. तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. ४१ वर्षीय व्हर्जिनियाने २०११ मध्ये अमेरिकेतील एका हाय-प्रोफाइल वेश्याव्यवसाय नेटवर्कचा पर्दाफाश करून जगाला धक्का दिला. व्हर्जिनियाने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि तस्करीचा खुलासा केला. तिने सांगितले की, ती फक्त १५ वर्षांची असताना एपस्टाईनच्या नेटवर्कमध्ये अडकली. तिला अनेक प्रभावशाली आणि हाय-प्रोफाइल व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले गेले. यात प्रिन्स अँड्र्यू यांचाही समावेश होता. यासर्वावर व्हर्जिनिया हिने , “नो बॉडीज गर्ल”, नावाचे आत्मचरिरत्र लिहिले. प्रकाशित झाले. २०२१ मध्ये तिने अँड्र्यूवर लैंगिक शोषणाचा खटला दाखल केला. (Prince Andrew)

पुस्तक लिहिल्यावर व्हर्जिनियानं आत्महत्या केली. मात्र तिच्या पुस्तकाचे प्रकाशन २१ ऑक्टोबर रोजी झाले आणि त्यातून मोठा वाद निर्माण झाला. व्हर्जिनियाने केलेले आरोप अँड्र्यू यांनी कायम नाकारले आहेत. अँड्र्यू हा ब्रिटिश नौदलातील माजी अधिकारी होता. १९८० च्या दशकात त्यांनी अर्जेंटिनाविरुद्धच्या युद्धात काम केले. राजघराण्यातील तत्पर सदस्य म्हणून त्याचा उल्लेख होत असे. मात्र व्हर्जिनियाशी असलेल्या त्यांच्या संबंधांमुळे त्याची बदनामी झाल्यावर २०१९ मध्ये, त्यांनी सर्व शाही कर्तव्ये सोडली. त्यानंतर व्हर्जिनियाने २०२१ मध्ये अँड्र्यूविरुद्ध खटला दाखल केला. यात अँड्र्यूने ती १७ वर्षाची असतांना तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. यानंतर, अँड्र्यूने अंदाजे १२ दशलक्ष पौंड म्हणजेच १२५ कोटी व्हर्जिनियाला देऊन या प्रकऱणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र यासर्वात त्याला अखेर त्याच्या राजपदव्यांना सोडावे लागले आहे. ब्रिटिश राजघराण्याच्या इतिहासातील ही दुर्मिळ घटना आहे. (International News)

=======

हे देखील वाचा : Uttarakhand : येथे दिवाळी नंतर साजरी होते, बुधी दिवाळी !

=======

१९१९ मध्ये हॅनोव्हरचे प्रिन्स अर्नेस्ट ऑगस्टस यांनी पहिल्या महायुद्धात जर्मनीला पाठिंबा दिल्यामुळे त्यांची ब्रिटिश शाही पदवी काढून घेण्यात आली होती. आता, १०६ वर्षानंतर, राजा चार्ल्स यांनी इतके कठोर पाऊल उचलले आहे. अर्थात या घोषणेनंतरही, अँड्र्यू ब्रिटिश राजपुत्राच्या उत्तराधिकारी रांगेत आठव्या क्रमांकावर आहेत. हा दर्जा कायद्याद्वारे राजघराण्याला काढून टाकता येतो. परंतु यासाठी जगभरातील राष्ट्रकुल देशांची संमती आवश्यक असते. दरम्यान या सर्व प्रकरणावर व्हर्जिनिया ग्रिफीच्या कुटुंबाने एक निवेदन जाहीर केले आहे, त्यात, एका सामान्य अमेरिकन कुटुंबातील एका सामान्य अमेरिकन मुलीने तिच्या असाधारण धैर्याने एका ब्रिटिश राजपुत्राचा पराभव केला असल्याचे म्हटले आहे. (Prince Andrew)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.