सामान्य ब्रिटीश कुटुंबातील कीर स्टारमर यांच्या हाती आता अवघ्या ब्रिटनची धुरा आली आहे. कीर स्टारमर यांच्या नेतृत्वाखाली, १४ वर्षांनंतर मजूर पक्षांने कंझर्व्हेटिव्ह पक्षाला सत्तेतून बाहेर काढले आहे. ब्रिटनच्या ६५० सदस्यांच्या कनिष्ठ सभागृहात बहुमत मिळवण्यासाठी ३२६ जागा गरजेच्या असतांना मजूर पक्षानं ४०० जागांचा टप्पा पार करत, सहज विजय संपादन केला आहे. हा विजय सर्वार्थांनं वेगळा आहे. त्याचे जागतिक परिणाम काय होणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र भारत आणि ब्रिटनच्या मैत्रीपूर्ण संबंधावर काय परिणाम होणार हेही स्पष्ट होणार आहे. कारण आता सत्तेत आलेल्या मजूर पक्षान काश्मिरमधील कलम ३७० हटवल्यावर नाराजी व्यक्त करणारा प्रस्ताव मजूर पक्षाच्या वार्षिक बैठकीत मंजूर केला होता. त्याच मजूर पक्षाचे राज्य आता ब्रिटनवर येणार असल्यामुळे भारताबाबतची त्यंची भूमिका काय राहिल, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. या सर्वात कीर स्टरमर यांची चर्चा सोशल मिडियावर होत आहे. एका नर्सच्या मुलाची पंतप्रधानपदापर्यंतची झेप आणि राणीनं सर ही पदवी देऊ गौरविलेल्या कीर स्टारमर यांच्या जीवनप्रवासातील अनेक घटनांची उजळणी होत आहे.
मजूर पक्षाचे नेते कीर स्टारमर ब्रिटनच्या पंतप्रधानपदी लवकरच विराजमान होणार आहेत. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा त्यांनी पराभव केला आहे. ब्रिटनमध्ये ४ जुलै रोजी मतदान सुरु झाले, ते रात्री 10 पर्यंत चालले. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का बसला, मात्र याची कल्पना सुनक यांना होती. कारण गेल्या काही वर्षापासून कंझर्व्हेटिव्ह पक्षात असंतोषाचे वातावरण होते. सुनक यांना अनेक सदस्यांचा विरोध होता. या पक्षात राजीनामा सत्र मोठ्या प्रमाणात होते. शिवाय सुनक यांची राजेशाही रहाणीही या पराभवास कारणीभूत ठरली आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या पराभवानंतर मजूर पक्षाचे नेते कीर स्टारमर पंतप्रधान होणार हे निश्चित मानले जात आहे. (Keir Starmer)
कीर स्टारमर यांचा जन्म १९६३ मध्ये लंडनमधील ऑक्स्टेड येथे झाला. ६१ वर्षाचे कीर स्टारमर यांचा जन्म कामगार वर्गाच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील टूलमेकर होते. स्टाररची यांची आई एका आजाराशी झुंज देत होती. त्यांच्या आईनं काही काळ नर्स म्हणून काम केले आहे. आईच्या आजारपणात या कुटुंबाला अतिशय खडतर जीवन जगावे लागले. कारण त्यांच्या आईला बोलता किंवा चालता येत नसे. अशा कुटुंबात समाजवादी विचारांचे मुळ होते. एका समाजावादी नेत्याच्या नावावरुनच त्यांचे नाव कीर असे ठेवण्यात आले. त्यामुळेच कीर स्टारमर स्वतःला कामगार नेते म्हणवून घेतात. कीर स्टारमर यांनी ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण घेतले. शाळेचे शुक्ल भरण्याचीही त्यांची परिस्थिती नव्हती. १६ वर्षाचे होईपर्यंत कीर यांचे शालेय शुल्क हे स्थानिक परिषदेने भरले. (Keir Starmer)
शाळा संपल्यानंतर, लीड्स आणि नंतर ऑक्सफर्ड येथे कायद्याचा अभ्यास करून विद्यापीठात जाणारे कीर स्टारमर हे त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती होते. बीबीसीच्या अहवालात. १९८७ मध्ये, ते बॅरिस्टर झाले आणि मानवाधिकार कायद्यात विशेष प्राविण्य प्राप्त केले. यातूनच समाजसेवा करण्यासाठी ते कॅरिबियन आणि आफ्रिकेत काही वर्ष गेले. जिथे त्यानी मृत्यूदंडाचा सामना करणाऱ्या कैद्यांचे रक्षण केले. ९० च्या दशकात कीर स्टारमर यांचे नाव लंडनमध्ये गाजले. कारण मॅकलिबेल कामगारांबरोबर ते उभे राहिले. फास्ट फूड व्यवसायात दिग्गज असलेल्या मॅकडोनाल्डच्या विरोधातही त्यांनी कॅम्पेन चालवले होते. यामुळे त्यांच्याकडे न्यायासाठी झगडणारा व्यक्ती म्हणून पाहिले जाऊ लागले. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनी गुन्हेगारी न्यायासाठी केलेल्या योगदानाबद्दल कीर स्टारमर यांनी गौरविले आहे. पण एवढा मोठा सन्मान कीर स्टारमर क्वचित आपल्या नावासमोर वापरतात. (Keir Starmer)
==================
हे देखील वाचा: जो बिडेन यांना निवृत्तीचा सल्ला…
==================
२००८ मध्ये, त्यांना इंग्लंड आणि वेल्समधील सार्वजनिक अभियोग संचालक, वरिष्ठ फौजदारी अभियोक्ता म्हणून नियुक्त करण्यात आले. कीर स्टारमर यांचा राजकीय प्रवास वयाच्या पन्नाशीनंतर सुरु झाला. २०१५ मध्ये, ते उत्तर लंडनमधील हॉलबॉर्न आणि सेंट पॅनक्रससाठी खासदार झाले. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाच्या मोठ्या पराभवानंतर, कीर स्टारमर यांची परीक्षा सुरु झाली. यावेळी एका सभेत त्यांनी ‘आत्मविश्वासाने आणि आशेने नवीन युगात घेऊन जाईन’ असे वचन पक्षाला आणि समर्थकांना दिले आहे. आज १४ वर्षानंतर कीर स्टारमर यांनी हे वचन पूर्ण केले आहे. एकेकाळी ज्या देशाचे जगावर साम्राज्य होते, तो ब्रिटन आता आर्थिक मंदिचा सामना करत आहे. ब्रिटनला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान कीर स्टारमर यांच्यापुढे आहे. ते यात किती आणि कसे यशस्वी होतील, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. (Keir Starmer)
सई बने