Home » स्वयंपाकी ते बंडखोरी पर्यतचा प्रिगोझिनचा प्रवास

स्वयंपाकी ते बंडखोरी पर्यतचा प्रिगोझिनचा प्रवास

by Team Gajawaja
0 comment
Prigogine Journey
Share

एकेकाळी ज्याच्या प्रेमात असावं आणि त्याला हवी तशी सूट द्यावी, त्यानंच हळूच येऊन पाठित खंजिर खुपसावं, अशी काहीशी गत रशियाचे राष्ट्रध्याक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत झाली आहे. पुतिन हे एकेकाळी येवगेनी प्रिगोझिन यांचे प्रचंड चाहते होते. कोण होता प्रिगोझिन? तर तो होता पुतिन यांचा खानसामा अर्थात स्वयंपाकी. पुतिन यांचा संरक्षण फेरा हा अतिशय कडक असतो. त्यात त्यांचे जेवण कोण बनवतो, यालाही महत्त्व असते. कारण जेवणातून विषबाधा होण्याची शक्यता पुतिन यांना नेहमी सतावत असते. त्यासाठी ते आपल्या खास विश्वासातील व्यक्तिला स्वयंपाकी करतात. असाच त्यांचा जवळचा माणूस म्हणून प्रिगोझिन परिचित होता. पुढे हाच प्रिगोझिन स्वतंत्र सैन्य ठेऊ लागला. ते भाड्यानं देऊ लागला. त्याच्या खाजगी सैन्यात थोडे थोडके नाही तर 20 हजाराहून अधिक सैनिक आहेत.  पुतिन प्रिगोझिनच्या या खाजगी सैन्याचा वापरही करुन घेत असत. आता तोच प्रिगोझिन पुतिन यांनाच आव्हान देण्याइतपत मोठा झाला आहे. एक स्वयंपाकी ते पुतिन यांना आव्हान देणारा बंडखोर नेता असा प्रिगोझिनचा प्रवास (Prigogine Journey) नक्कीच जाणून घेण्यासारखाच आहे.  

युक्रेन सारख्या छोट्या देशाबरोबर युद्ध सुरु करुन रशिया पश्चातावला आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा धाक एकेकाळी रशियन जनतेवर होता. पण युक्रेन युद्ध सुरु झाले, त्याचा काळ लांबला तशी पुतिन यांच्या प्रसिद्धीलाही ओहोटी लागली. परिस्थिती अशी आली आहे की, पुतिन आता भाडोत्री सैन्य घेऊन हे युद्ध लढत आहेत आणि आता तर त्या भाडोत्री सैन्याचा प्रमुखच पुतिन यांचा पक्का शत्रू झाला आहे. प्रिगोझिन येवगेनी यांना एकेकाळी पुतीनचे बटलर म्हटले जायचे.  पुतिन एकेकाळी प्रिगोझिन यांच्या पदार्थाचे चाहते होते. प्रिगोझिन यांनी पुतिन यांच्या पाठिंब्यानं आपलं स्वतःचं साम्राज्य उभारलं. त्यांची अनेक हॉटेल आहेत. शिवाय स्वतंत्र सैन्यही आहे. (Prigogine Journey)

1979 मध्ये, वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी, येवगेनी प्रिगोझिन पहिल्यांदा तुरुंगात गेला. त्याला 13 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. 9 वर्षानंतर सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर, प्रिगोझिन तुरुंगातून बाहेर आला. उपजिविकेसाठी त्यानं चक्क रस्त्यावर हॉट-डॉगचा स्टॉल लावला. त्याच्या हाताला इतकी चव की, प्रिगोझिन काही वर्षातच  सेंट पीटर्सबर्गमधील सर्वात महागड्या रेस्टॉरंटचा मालक झाला. प्रिगोझिनच्या हॉटेलमध्ये मान्यवर व्यक्ती येत असत. त्याच्या हॉटेलची आणि तेथील मेन्यूची किर्ती थेट राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यापर्यंत पोहचली. पुतिनही या प्रिगोझिनच्या हॉटेलमध्ये येऊ लागले. फार काय एप्रिल 2000 मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान योशिरो मोरी रशियाच्या दौ-यावर असतांना पुतिन त्यांना प्रीगोझिनच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले. यादरम्यान, प्रिगोझिनने स्वत: पाहुण्यांना जेवण वाढले. हा प्रिगोझिन पुतिन यांच्या इतका जवळ आला की, पुतिन आपला वाढदिवसही त्याच्या हॉटेलमध्ये साजरा करु लागले. काही वर्षातच प्रिगोझिनच्या कंपनीला क्रेमलिन म्हणजे रशियन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानमध्ये अन्नपुरवठा करण्याचे कंट्राट मिळाले. तसेच रशियान सैन्यालाही अन्नपुरवठा करण्याचे कंट्राट त्याच्या पदरात मिळाले. स्वतः प्रिगोझिन क्रेमलिनमध्ये पुतिन यांचा स्वयंपाकी झाला. त्यानं त्याबाहेर आपले व्याप वाढवले. पुतिन यांच्या आशीर्वादानं चक्क आपलं स्वतंत्र सैन्यदल उभारलं. याच सैन्यानं आफ्रिका, सिरीया, माली आदी ठिकाणी पुतिन यांच्यातर्फे युद्ध केलं. प्रिगोझिनचं सैन्य त्यांच्या क्रूरतेसाठी प्रसिद्ध होतं, आणि पुतिन यांचा त्याच्यावर फार विश्वास होता. (Prigogine Journey)  

पण पुतिन यांच्या सैन्यातील अधिका-यांना म्हणजेच रशियाच्या सैन्य अधिका-यांना प्रिगोझिनचे हे वाढते वर्चस्व खपू लागले. प्रिगोझिन रशियन सैन्याच्या अधिकारात हस्तक्षेप करत होता. त्यामुळे प्रिगोझिनच्या वॅगनर ग्रुपला परवानगी देण्यासाठी रशियात नाराजी होती. पण त्याला पुतिन यांचा पाठिंबा कायम राहिला. युक्रेन युद्धानं तर सगळं चित्रच पलटलं. प्रिगोझिन युक्रेनमध्ये घूसून युद्ध करीत होता. पण तरीही त्याच्यात आणि रशियान सैन्य अधिका-यांमध्ये चकमकी होत असत. प्रिगोझिनला या युद्धासाठी आणखी हत्यारांची गरज होती.  तो तशी मागणी वारंवार करीत होता.  त्याच्यामते युक्रेन युद्ध हे फार मोठे युद्ध नाही. ते उगाच लांबवण्यात आलंय आणि यामागे प्रमुख आहे, तो रशियन सैन्यातील भ्रष्टाचार.  रशियन सैन्यात प्रचंड मोठ्याप्रमाणात भ्रष्ट्राचार आहे. सैनिकांना देण्यात येणारी शस्त्रे विकत घेतांना आर्थिक हेराफेरी होत असल्याचा त्याचा आरोप आहे. या सर्वांमुळे प्रिगोझिननं मागणी केल्याबरोबर त्याला कधीही पुरेसा शस्त्र पुरवठा रशियन सैन्यानं केला नाही.  याचा राग त्याच्या मनात होता. त्यातच युक्रेनमधील प्रिगोझिन लष्कराच्या छावणीवर रशियन सैन्यानं क्षेपणास्त्रानं हल्ला केला आणि पुतिन यांचा खास माणूस अशी ओळख मिळवलेला प्रिगोझिन पुतिन यांच्याच विरोधात उभा ठाकला. रोस्तोव्ह आणि व्होरोनेझ या रशियन शहरांवर त्यानं ताबाही मिळवला.  हे जाहीर करतांना प्रिगोझिन यांनी रशियन सैन्याला विदूषकाची उपमा दिली. परिस्थिती बिघडत होती. इतकी की, ब्लादेमिर पुतिन यांनी मास्को शहर सोडले, अशा बातम्या येऊ लागल्या.  प्रिगोझिन  नवा रशियाचा राष्ट्राध्यक्ष असणार अशी चर्चा सुरु झाली असतांनाच या बंडखोरीमध्ये बेलारुसनं एन्ट्री घेतली.  बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी प्रिगोझिन आणि रशियातील हा तणाव कमी केला.  त्यानंतर प्रिगोझिननं आपलं बंड मागे घेण्याची सूचना दिली आणि त्याचे सैन्य रशियन शहरांमधून माघारी परतले. (Prigogine Journey)  

========

हे देखील वाचा : समुद्र तळाशी टायटॅनिक बघायला गेलेल्या पाणबुडीच्या दुर्घटनेचे काय असेल कारण?

========

पण हे सर्व करतांना प्रिगोझिनयांनी आपल्या काही अटी मान्य करवून घेतल्या आहेत. त्यामध्ये, त्याच्यावरील आणि त्याच्या सैन्यावरील सर्व गुन्हे मागे घ्यायला लावले आहेत. प्रिगोझिनच्या या बंडाची इतकी धास्ती रशियाला पडली होती की, रशियाच्या सर्व शाळा 1 जुलै पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. सर्व सामूहिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे रोस्तोव्ह शहरातील नागरिकांनी प्रिगोझिनच्या सैन्याचे स्वागत केले. गेल्या 15 महिन्याहून अधिक काळ प्रिगोझिन चे सैन्य युक्रेनबरोबर लढत आहे. आता त्याच सैन्याला रशियाच्या नागरिकांनी पसंती दिली आहे. (Prigogine Journey)

रशियाने युक्रेनचे बाखमुट शहर ताब्यात घेतांना प्रिगोझिनच्या संघटनेची मदत घेतली होती, त्यात त्याचे अनेक सैन्य मारले गेले. त्यावरही प्रिगोझिनची नापसंती होती. त्याच्या मते, त्याच्या सैन्यातील प्रत्येक सैनिक हा परिपूर्ण सैनिकी शिक्षण घेतलेला आहे. पण रशियाचे सैन्य हे कुचकामी आहे. आता प्रिगोझिननं त्याच्या बंडाचे झेंडा खाली केला असला तो पुन्हा कधी रशियावर हल्ला करेल याचा नेम नाही.  याची जाणीवही पुतिन यांना आहे. मात्र पुतिन हे या घटनेनं कमालीचे हैराण झाल्याची माहिती आहे. जिथे युक्रेनसारख्या देशावर त्यांना विजय मिळवता येत नाही, तिथेच आता प्रिगोझिनसारखा (Prigogine Journey) अंतर्गत शत्रू निर्माण झाल्यामुळे त्यांची लोकप्रियता घटतेय, रशियात सत्तांतर व्हायला हवं, अशी मागणी होत आहे. यावर पुतिन पुन्हा आपली पकड मिळवण्यासाठी अण्वस्त्रांचा वापर करणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. एकूण पुढचा महिना हा युक्रेनसाठी आणि जागतिक शांतीसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.