ब्रिटनमध्ये सध्या शाही राज्याभिषेकाची तयारी चालू आहे. राजे चार्ल्स यांचा हा राज्याभिषेक बकिंमहॅम पॅलेसमध्ये 6 मे रोजी होणार आहे. या राज्याभिषेकसाठी अवघ्या ब्रिटनमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले असून त्यासाठी निमंत्रितांचीही मोठी जंत्री आहे. या राज्याभिषेक सोहळ्याचे थेट प्रक्षेपणही दाखवले जाणार आहे. यामुळे राज्याभिषेक सोहळा अगदी वेळेत होण्यासाठी पॅलेसतर्फे आतापासून योजना तयार करण्यात येत आहे. यात आता राजा चार्ल्स आणि राणी कॅमिला यांच्या राज्याभिषेकाची वेळ जाहीर करण्यात आली असून राजा चार्ल्स त्यासाठी सोन्याचा मुलामा दिलेल्या घोडागाडीतून पॅलेसमध्ये जाणार आहेत. हा सोहळा बघण्यासाठी यावेळी या परिसरात मोठी गर्दी असणार आहे. या सर्वांना राजा चार्ल्स यांना निट बघता यावे म्हणून ही खास घोडागाडी निवडण्यात आली आहे. सोन्याचा मुलामा दिलेली ही घोडागाडी शाही परिवाराच्या अत्यंत खास सोहळ्यात वापरली जाते.
ब्रिटनमध्ये 6 मे रोजी राजा चार्ल्स आणि राणी कॅमिला यांच्या राज्याभिषेकाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. चार्ल्स आणि कॅमिला बकिंगहॅम पॅलेसमधून खास सोन्याच्या रथासारख्या गाडीमधून वेस्टमिन्स्टर अॅबे येथे पोहोचतील. या सर्व मार्गावर राजांचे चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उभे राहणार आहेत. वेस्टमिन्स्टरला पोहोचण्यापूर्वी राजा आणि राणी सुमारे दोन किलोमिटरचा मार्ग आपल्या शाही रथातून पार करणार आहेत. सकाळी 11 वाजता राज्यभिषेक झाल्यावर राजा-राणी 260 वर्ष जुन्या गोल्ड स्टेट कोच रथ, अर्थात सोन्याचा मुलामा दिलेल्या रथातून राजवाड्याभोवती फेरी मारणार आहे.

ब्रिटनमध्ये 70 वर्षांनंतर होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी एक खास इमोजीही जारी करण्यात आला आहे. या इमोजीमध्ये सेंट एडवर्डच्या मुकुटापासून प्रेरित मुकुट वापरण्यात आला आहे. राजा चार्ल्स राज्याभिषेकाच्या वेळी हा मुकुट परिधान करतील. 1953 मध्ये झालेल्या राणी एलिझाबेथच्या सोहळ्यापेक्षा राजा चार्ल्स यांचा हा राज्याभिषेक सोहळा थोडा कमी कालावधीचा होणार आहे. तरीही यात राजघराण्याच्या सर्व परंपरा योग्य प्रकारे पाळण्यात येणार आहेत.
कँटरबरीचे मुख्य बिशप जस्टिन वेल्बी राजा चार्ल्स यांना त्यांच्या राजेपदाची जबाबदारी देतील. यादरम्यान, राजाला सेंट एडवर्डचा मुकुट घालण्यात येईल. या मुकुटाची फ्रेम 2.2 किलो सोन्याने बनवली आहे. त्यात नीलम, गार्नेट, पुष्कराज यांसह अनेक मौल्यवान रत्ने जडलेली आहेत. याशिवाय या मुकुटामध्ये जांभळ्या मखमली कापडाची टोपी आणि एक इर्माइन बँड आहे. राणी एलिझाबेथ यांनी 1953 मध्ये त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळीही हाच मुकुट परिधान केला होता. त्यानंतर ते टॉवर ऑफ लंडनमध्ये ठेवण्यात आले. करोडोंच्या घरात आता या मुकुटाची किंमत आहे. राज्याभिषेकाच्या निमित्तानं हा मुकुट पुन्हा जनतेसमोर येणार आहे. या सोहळ्यात अनेक राजेशाही प्रतीकांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये 5 प्रतीकात्मक तलवारी, 2 राजदंड, नीलमची सार्वभौम अंगठी आणि डायमंड्समधील रुबी क्रॉस सेट यांचा समावेश असेल. राज्याभिषेकादरम्यान राणी कॅमिलाला क्वीन मेरीचा मुकुट घातला जाईल. या मुकुटाला नुकतेच नवे रुप देण्यात आले आहे. वास्तविक राणीला कोहिनूर हिरा असलेला मुकूट देण्यात येतो. मात्र या हि-यावर भारतासह पाकिस्तान, साऊथ अफ्रिका या देशांनी आपला दावा केला आहे. राज्याभिषेक सोहळ्या दरम्यान कुठलाही वाद यायला नको, म्हणून राणी कॅमिला यांनी हा कोहिनूर असलेला मुकूट परिधार करण्यास नकार दिला आहे. या सोहळ्यात राजाच्या हातात हत्तीच्या दातांनी बनलेला विवादित राजदंड देण्यात येईल, यासंदर्भातही आता वाद होणार नाहीत, याची काळजी राजघराण्यातून घेण्यात येत आहे. कारण ब्रिटनमध्ये हस्तिदंताच्या व्यापारावर जवळजवळ संपूर्ण बंदी आहे. ब्रिटनच्या राजघराण्याचे भावी वारस म्हणून बघितले जाणारे प्रिन्स विल्यम यांनी प्राण्यांच्या अवयवांच्या बेकायदेशीर तस्करीविरूद्ध मोहीम चालवली आहे. त्यामुळे जुनी परंपरा पाळायची की नव्या पिढीची सोबत घ्यायची या बाबत सध्या राजघराण्यात विचार होत आहे.
=======
हे देखील वाचा : अमेरिका पाण्याखाली जाणार?
======
या शाही राज्याभिषेक सोहळ्यासाठी वेळापत्रक बनवण्यात आले असून त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. ब्रिटीश राजघराणे हे जगातील प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक आहे. 74 वर्षीय चार्ल्स यांना डची ऑफ कॉर्नवॉल या खासगी निधीतून सेवांसाठी 6,221 कोटी रुपये मिळत आहेत. राजा झाल्यानंतर त्यांना त्यांच्या खर्चासाठी वार्षिक 200 कोटी रुपये मिळतील. राणी म्हणून कॅमिलाला विल्टशायरमध्ये मोठे घर मिळाले आहे. उर्वरित सदस्यांना मिळालेल्या पैशांचा खुलासा करण्यात आलेला नाही. तसेच प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेघन यांना काय मिळणार याचाही खुलासा अद्याप राजघराण्यानं केलेला नाही. मात्र राज्यभिषेकाच्या सोहळ्यासाठी या दोघांना आमंत्रित करण्यात आले आहे. राजघराण्यावर टिका करणारा हा राजकुमार या समारंभाला आल्यावर त्याच्याबद्दल राजघराण्याची काय प्रतिक्रीया राहील हा सुद्धा उत्सुकतेचा विषय आहे.
सई बने