प्रयागराज महाकुंभ 2025 साठी प्रयागराजच्या पवित्र भूमिमध्ये साधू संताचे आणि हजारो भाविकांचे आगमन सुरु झाले आहे. सनातन धर्मामध्ये असलेल्या 14 आखाड्यातील साधूंनी आपल्या आखाड्याच्या भव्य मंडपाची स्थापना या प्रयागराजमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी या सर्व आखाड्याच्या प्रमुखांनी ध्वजपूजा करुन मोठी मिरवणूकही काढली आहे. या सर्व आखाड्यांचे वेगवेगळे वैशिष्ट आहे. या सर्वात आदी शंकराचार्यांनी ज्या आखाड्याची स्थापना केली त्या वाराणसी येथील पंच दशनाम आवाहन आखाड्यातील हजारो साधू संतांचाही समावेश आहे. काशीच्या दशाश्वमेध घाटावर प्रमुख आश्रम असलेल्या श्री शंभू पंच दशनम आवाहन आखाडा सहाव्या शतकात आदि शंकराचार्यांनी स्थापन केला. या आखाड्यातील हजारो साधू संत देशाच्या कानाकोप-यात सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. महाकुंभमेळ्याच्या निमित्तानं या सर्व साधू संतांचे प्रयागराजच्या भूमिवर आगमन होत आहे. पंच दशनाम आवाहन आखाड्याचे मुख्य वैशिष्ट म्हणजे, त्यातील नागा साधू आणि त्यांचे शस्त्रसामर्थ्य. (Prayagraj Mahakumbh)
प्रयागराजच्या संगमस्थानी महाकुंभमेळ्यासाठी सर्वच आखाड्यांनी आपापले भव्य मंडप उभारले आहेत. या सर्व मंडपात सर्व आखाड्यांच्या परंपरानुसार त्यांच्या अराध्य देवतांचे मंदिर उभारण्यात आले आहे. या सर्वात पंच दशनाम आवाहन आखाड्याचे संस्थापक असलेल्या आदी शंकराचार्य यांची मोठी प्रतिमा पंच दशनाम आवाहन आखाड्याच्या मंडपात लावण्यात आली आहे. धर्मग्रंथांचे आणि शास्त्रांचे संरक्षण कऱण्यासाठी आदी शंकराचार्य यांनी स्थापन केलेला या आखाड्याची अनेक वैशिष्टे आहेत. हा आखाडा म्हणजे, धर्मग्रंथांच्या ज्ञानात पारंगत असलेल्या साधूंचा समूह म्हणूनही ओळखला जातो. काशीच्या दशाश्वमेध घाटावर असलेला श्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाडा सर्वात जुन्या आखाड्यांपैकी एक आहे. सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि लोकांनाक धार्मिक मार्गावर चालण्यासाठी हा आखाडा वचनबद्ध असल्याचे सांगितले जाते. या आखाड्याला अन्यही नावांनी ओळखले जाते. पंच दशनाम आवाहन आखाडा पूर्वी “आवाहन सरकार” म्हणून ओळखला जात होता. (Social News)
या आखाड्याचे नियम हे आदि शंकराचार्यांनी घालून दिले होते. अतिशय कडक नियम असलेल्या या आखाड्यात आता काळानुसार काही बदलही झाले आहेत. मात्र धर्माचे रक्षण करण्यासाठी आखाड्याचे जे नियम आहेत, ते आजही पूर्वीसारखेच आहेत. त्याच नियमानुसार आखाड्यातील नागा साधू हे काम करतात. या आखाड्यात सामील होण्यासाठीही अनेक परीक्षा पार कराव्या लागतात. साधकांनी ज्याला गुरु म्हणून स्विकारले आहे, त्यांनी सांगितलेली ध्यान धारणा करावी लागते. शिवाय ऐहिक सुखांचा त्याग करून भगवंताच्या भक्तीत पूर्णपणे लीन व्हावे लागते. पंच दशनाम आवाहन आखाड्याचे नागा साधू होण्यासाठीची प्रक्रिया अतिशय कठिण आहे. या सर्व कठिण प्रक्रिया करुन पार पडलेले नागा साधू हे पुढच्या आणखी एका कठिण प्रशिक्षणासाठी तयार केले जातात. या टप्प्यात नागा साधूंन शस्त्रांस्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते. पंच दशनाम आवाहन आखाड्यातील साधूंना भिक्षा मागता येत नाहीत. (Prayagraj Mahakumbh)
========
हे देखील वाचा : श्री निर्वाणी अनी आखाडा
======
समोरच्यांनी स्वतःहून दिलेले अल्प अन्न सेवन करुन ही मंडळी जिथे जास्त गर्दी नसते तिथे राहतात आणि आपली ध्यानधारणा करतात. हे साधू क्वचित एकमेकांना भेटतात. मात्र 12 वर्षानंतर होणा-या महाकुंभमेळ्यात सर्व साधू एकत्र येतात. परस्परांना भेटतात आणि त्यांनी केलेल्या आध्यात्मिक ज्ञानाचे आदान प्रदान करतात. शिवाय या आखाड्यातील सर्वच साधू हे शस्त्रनिपुण असतात. महाकुंभमेळ्यात हे साधू आपल्या शस्त्रांचे जाहीर प्रदर्शन करतात. शस्त्र चालवण्यासोबत या आखाड्यातील साधू हे कुस्ती खेळण्यात तरबेज समजले जातात. या आखाड्याच्या प्रमुखाला ठाणेपती म्हटले जाते. अंगावर भगवे वस्त्र घातलेले या आखाड्याचे साधू धर्मग्रंथाच्या अध्ययनातही आघाडीवर असतात. त्यासाठी आखाड्यातील विविध आश्रमांत या साधू संतांसाठी धर्मग्रंथांचे शिक्षण दिले जाते. आखाड्यातील वरिष्ठ साधू हे नवोदितांना धर्मग्रंथांचे शिक्षण देतात. मग ही मंडळी आपल्या धर्मग्रंथांचा प्रसार करण्यासाठी पायी भ्रमण करतात. भारताच्या कानाकोप-यात फिरणारे हे साधू बरोबर 12 वर्षानी आपल्या आखाड्याच्या मंडपात एकत्र येतात आणि आपल्या गुरुंसोबत चर्चा, वादविवाद करुन आपल्या ज्ञानात भर घालून घेतात. वर्षानुवर्ष पंच दशनाम आवाहन आखाड्यातर्फे असेच धर्मग्रंथाचे रक्षण करण्यात येत आहे. (Social News)
सई बने