आज ५ जानेवारी… आजच्या दिवशी १९६८ साली पूर्व युरोपमधल्या ‘चेक प्रजासत्ताक’ या देशात लोकशाही मूल्यांसाठी उठाव करण्यात आला, चळवळ उभी करण्यात आली. इतिहासात हा दिवस ‘प्राग स्प्रिंग (Prague spring)’ या नावाने ओळखला जातो.
आताचा चेक प्रजासत्ताक हा देश म्हणजे पूर्वीचा ‘चेकोस्लोव्हाकीया’. तसा हा देश स्वतंत्र झाला तो १९१८ साली. आताच्या चेक प्रजासत्ताकचे पूर्वी म्हणजे १९१८ पूर्वी दोन भाग होते. एक होता चेक, हा भाग ऑस्ट्रियाच्या नियंत्रणाखाली होता, तर दूसरा भाग स्लोवाक हा हंगेरीच्या नियंत्रणाखाली होता. पुढे हा भाग दुसर्या महायुद्धा दरम्यान म्हणजे १९३९ ला हिटलरने स्वत:कडे घेतला. नंतर म्हणजे सोव्हिएट रशियाने जर्मनीशी लढून हा भूभाग जर्मनीच्या तावडीतून सोडवून घेतला. पण पुढे या चेकोस्लोव्हाकियामध्ये रशियाने आपला अंकुश ठेवण्यासाठी स्वत:च्या मर्जीतले साम्यवादी सरकार तयार केले.
तिथे निवडणुका झाल्या. ग्रोटवल हे १९४७ साली पंतप्रधान झाले, त्यांनी १९५३ पर्यंत राज्यकारभार केला. ग्रोटवल यांच्या मृत्यूनंतर ‘नोवोटनी’ चेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान झाले. आतापर्यंत जी सरकार चेक प्रजासत्ताक मध्ये आली ती सगळी सरकार रशियाच्या आशीर्वादानेच आपला राज्यकारभार करत होती.
साम्यवादी सरकार १९६८ पर्यन्त हा कारभार कसातरी हाकत होती, पण चेक प्रजासत्ताकमधल्या साम्यवादी सरकारातल्या तरुण वर्गालाच आता या साम्यवादाचा कंटाळा आला होता. तरुण वर्गाला आता बदल हवा होता.
अपेक्षेप्रमाणे ५ जानेवारी १९६८ साली विद्यार्थ्यानी उठाव केला आणि मानवी चेहरा असलेला प्राध्यापक निवडला जाईल या हेतूने सुधारणावादी म्हणून ओळखले जाणारे ‘आलेक्झंडर ड्युब्चेक’ हे चेक प्रजासत्ताकचे साम्यवादी पक्षाचे नवीन सरचिटणीस म्हणून निवडले गेले.
१९६८ पासूनच आल्या आल्या, ड्युब्चेक यांनी देशात सुधारणा घडवून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. अर्थव्यवस्थेचं विकेंद्रीकरण केलं. लोकशाही मूल्यांची जोपासना करण्यासाठी पावले उचलली. माध्यमं, दळणवळण आणि एकूणच मुक्त वातावरण तयार होण्यासाठी पुढाकार घेतला.
हे सगळं जरी देश सुधारण्यासाठी, व्यवस्था सुधारण्यासाठी चालू असलं तरीसुद्धा सोव्हिएट रशियाच्या नेत्यांना हे मान्य झालं नाही. सोव्हिएतमधल्या साम्यवादी नेत्यांना आता याची विपरीत भीती वाटू लागली… त्यांना वाटलं की, अशाच सुधारणा जर सुरू झाल्या, तर चेकोस्लोव्हकियात लोकशाही नांदेल.
लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, लोकशाही म्हणजे पाश्चिमात्यिकरण अशी धारणा सोव्हिएट रशियामधल्या साम्यवादी नेत्यांची झाली. इकडे ड्युब्चेक तर चेकोस्लोव्हाकीयाचं विभाजन करण्याची योजना आखत होते, पण खरं स्वातंत्र्य जर नागरिकांना मिळालं, तर त्याचे परिणाम काही चांगले झाले नसते याची भीती घेऊन ‘वॉर्सा करार’ केलेल्या देशांनी २१ ऑगस्ट १९६८ ला प्रागमध्ये अंदाजे पाच लाखाच्या आसपास सैन्य घुसवलं, तसंच दोन हजार रणगाडे पण तैनात केले.
लोकांनी प्रागच्या रस्त्यांवर येऊन उस्फूर्तपणे कडाडून विरोध केला, पण ड्युब्चेक यांना सरचिटणीस पदावरून काढून त्यांच्याजगी हुसाक या नवीन व्यक्तिला सरचिटणीस म्हणून नियुक्त केलं. सोव्हिएट महासंघाने संपूर्ण चळवळ दडपून टाकली. हे असं जरी सगळं लोकशाही विरोधी घडत असलं तरीसुद्धा चेक प्रजासत्ताकमध्ये संगीत आणि साहित्य या क्षेत्रात याचा खूप मोठा परिणाम झाला.
वाकलाव हावेल सारखे लेखक आणि पुढे जाऊन जे राष्ट्राध्यक्ष बनले त्यांचं योगदान मोठं होतं. मिलन कुंदेरासारखे लेखक तयार झाले. पूर्व युरोप मधील देशांना चळवळीचा इतिहास खूप मोठा आहे.
शीतयुद्धा दरम्यान अमेरिका आणि सोव्हिएट महासंघ अशा द्वीध्रुवीय जगामध्ये महासत्तांची विभागणी झाली. जे देश अमेरिकेच्या बाजूने होते आणि जिथे पाश्चिमात्य मूल्ये जोपासली जात होती त्या देशांनी प्रगती केली, जे देश सोव्हिएट महासंघाच्या अधिपत्याखाली होते. त्यांची तुलना करता फारशी आर्थिक प्रगती झाली नाही हे खरं तर सत्य आहे.
हे ही वाचा: ऐतिहासिक वारसा लाभलेलं फर्ग्युसन कॉलेज
‘हे’ आहेत २०२१ मध्ये भारतीयांनी गुगलला विचारलेले टॉप १० प्रश्न (Top 10 Asked Questions)
प्राग वसंत ही चळवळ जरी मूर्त रूप घेऊ शकली नाही किंवा सत्तांतर घडवू शकली नाही तरीसुद्धा ती इतिहासात खूप गाजली. यालाच इंग्रजीमध्ये ‘प्राग स्प्रिंग ( Prague spring)’ असं संबोधण्यात आलं. एका आश्वासक युरोपच्या पायाभरणीत प्राग स्प्रिंगचं स्थान आहे हे निश्चित.
– निखिल कासखेडीकर