सध्या देशाच्या राजकारणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. काल (ता. ७) रोजी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रीमंडळाचा अखेर विस्तार आणि खांदेपालट करण्यात आला. नवीन मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर नाशिक मधील महिलेला पाहिल्यांदाच मोदींच्या मंत्रीमंडळात संधी मिळाल्याने, सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.
मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या भारती पवार (Bharati Pawar) नक्की आहेत तरी कोण? हे आपणास माहीत आहे का? नाही ना? चला तर मग जाणून घेऊयात भारती पवार यांच्या वैयक्तिक आयुष्यासह त्यांचा राजकीय जीवन प्रवास कसा होता ते.
सध्याचे भारती पवार नाव असलेल्या मंत्री यांचे माहेरचे नाव डॉ. भारती किसन बागूल असे आहे. त्यांचा जन्म नाशिक जिल्यातील कळवण तालुक्यात नरुळ या गावी दि. १३ सप्टेंबर १९७८ रोजी झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत. तर माध्यमिक शिक्षण नाशिक मध्ये झाले. त्या पेशाने एक वकील असून, त्यांचे शिक्षण हे एम.बी.बी.एस पर्यंत झाले आहे. आपले पती प्रवीण अर्जुन पवार यांच्या भक्कम आधाराने त्यांनी राजकारणात येण्याचा विचार केला.
त्यासाठी त्यांनी माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या सहवासात राहून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या त्या सून. सर्वात पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादीची निवड केली. त्यावेळी त्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय होत्या असे बोलले जाते.
त्यांनी राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेच्या उमराणे, मानूर गटातून दोन वेळा निवडणूक लढवली व दोन्ही वेळा विजयीही झाल्या. नंतर २०१४ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मोदी लाट असतानाही भारती पवार यांना लाखांच्या घरात मते मिळाली होती. पण तेव्हा त्यांचा पराभव झाला होता.
पुढे २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारती पवार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या. पण, राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्या नाराज झाल्या.
याच दरम्यान २०१९ ला भारती पवार यांच्या जाऊबाई आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांना भाजपकडून लोकसभेच्या तिकिटाची ऑफर देण्यात आली होती. मात्र जयश्री पवार यांनी ते तिकीट नाकारले.
त्यामुळे भाजपकडून भारती पवार यांना विचारण्यात आले. त्यानंतर भारती पवार यांनी लगेचच राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी “भाजप हा महिलांचा योग्य सन्मान राखणारा पक्ष आहे.” असे वक्तव्य केले होते.
त्यानंतर भाजपने त्यांना २०१९ चे लोकसभेचे तिकीट दिले. तेव्हा भरती पवारांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार धनराज महाले यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत त्यांना पराभूत केले. व त्या नाशिक जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार बनल्या.
भाजपने आता भारती पवार यांना दिल्लीत बोलवून त्यांच्यावर मंत्री पदाची नवीन जबाबदारी सोपवल्याने भारती पवार आता ती जबाबदारी कशी पार पाडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
– निवास उद्धव गायकवाड