अमेरिकेचे नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मंत्रीमंडळाच्या नियुक्त्या चालूच ठेवल्या आहेत. या नियुक्तीमधील आणखी एक लक्षवेधी नाव म्हणजे, पीट हेगसेथ. पीट हेगसेथ हे फॉक्स न्यूज चॅनेलचे होस्ट आहेत. शिवाय ते सैनिक आहेत. या व्यतिरिक्तही पीट हेगसेथ यांची ओळख आहे. पीट यांची अनेक वक्तव्ये वादग्रस्त ठरली आहेत. हेगसेथ यांनी 2016 च्या मुलाखतीत इस्रायलचा उल्लेख “देवाने निवडलेले लोक” असा केला आहे, त्यावरुन इस्रायलला असणारा त्यांचा पाठिंबा उघड झाला आहे. शिवाय, इस्लाम “शांतीचा धर्म नाही आणि तो कधीच नव्हता” असा दावा पीट यांनी भर सभेत केला होता, त्यावरुन बराच गदारोळ झाला आहे. एका बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक असणारे पीट आता अमेरिकेच्या पेंटागॉनचे प्रमुख असणार आहेत. अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री म्हणून पीट हेगसेथ शपथ घेणार आहेत. या नियुक्तीमुळे ट्रम्प सरकारची दृष्टी कशी असेल हे आधीच स्पष्ट झाल्यासारखे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आवडत्या टिव्ही होस्टची नियुक्ती सरळ अमेरिकेच्या संरक्षणमंत्रीपदी केली आहे. फॉक्स चॅनलचे लोकप्रिय होस्ट असलेल्या पीट हेगसेथ यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानं अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. पीट हेगसेथ हे डोनाल्ड ट्रम्प यांचे पाठिराखे आहेत. (Pete Hegseth)
अभ्यासू लेखक म्हणून ते ओळखले जातात. अमेरिका फर्स्ट, या डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोहिमेमागे पीट हेगसेथ असल्याची माहिती आहे. पीट यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन सैन्य जगात पुन्हा महान होईल, अशी प्रतिक्रीया या नियुक्तीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. पीट हेगसेथ यांची दहशतवादावर आणि दहशतवाद पसरवणा-या देशांबद्दल रोखठोक भूमिका आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीनं भारतीय सरकारनं समाधान व्यक्त केलं असलं तरी पाकिस्तान, इराण, चीन सारख्या देशामध्ये त्यांचे नाव ऐकूनच धडकी भरली आहे. पीट हेगसेथ हे प्रिन्स्टन विद्यापीठाचे पदवीधर आहेत. त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशनची पदवीही घेतली आहे. लष्करातील कामाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. ग्वांतानामो बे, इराक आणि अफगाणिस्तान सारख्या भागात त्यांनी लष्करासोबत काम केले आहे. त्यानंतर पीट यांनी फॉक्स न्यूजमध्ये होस्ट म्हणून कामकाज पाहिले आहे. ‘द वॉर ऑन वॉरियर्स’ या पुस्तकाचे ते लेखक आहेत. ‘द वॉर ऑन वॉरियर्स’ हे पुस्तक पीट यांच्या युद्धभूमितील अनुभवावरील पुस्तक आहे. हे पुस्तक नऊ आठवडे न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट-सेलर यादीत होते. (International News)
त्यातील दोन आठवडे पुस्तक पहिल्या क्रमांकावर होते. युद्धभूमीतील अनुभवातून शिकलेल्या गुजगोष्टी पीट यांनी या पुस्तकात मांडल्या आहेत. याशिवाय पीट हे वकिल संघटनांचे नेतृत्वही करतात. 2016 पासून पीट हे डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. यांच्या अध्यक्षीय उमेदवारीमध्ये आणि नंतर प्रचार मोहिमेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पीट यांचे वडिल, पेनी हेगसेथ हे प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू होते. त्यांच्याप्रमाण पीटही शालेय़ जीवनात फुटबॉल खेळाडू म्हणून ओळखले जात होते. मोठे झाल्यावर पीट खेळातच आपले करिअर करतील असे त्यांच्या मित्रमंडळाला वाटत होते. मात्र पीट यांनी प्रिन्सटन विद्यापीठात प्रवेश केला आणि त्यांना राजकारणात रस वाढू लागला. पुढे त्यांनी हार्वर्ड महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि आपल्या राजकीय प्रवेशाबद्दल सुतोवाच केले होते. विशेष म्हणजे, जो बिडेन सरकारमध्येही पीट यांची नियुक्ती करण्यात आली होती. 20 जानेवारी 2021 रोजी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या सुरक्षेसाठी पेंटागॉनने अधिकृत केलेल्या 25,000 नॅशनल गार्ड सैन्यांपैकी एक म्हणून पीट यांची नियुक्ती करण्यात आली होती. (Pete Hegseth)
=======
हे देखील वाचा : ट्रम्पची सेना
=======
परंतु या दलातून पेंटागॉनने 12 सैनिकांना काढून टाकले. त्यातील एक सैनिक म्हणजे, पीट हेगसेथ. आता त्याच पीट हेगसेथ यांच्या हाती पेंटागॉनच्या चाव्या आल्या आहेत. पीट हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यानं अनेकवेळा वादात सापडले आहेत. त्यामुळेच त्यांची जो बिडेन सरकारनं हाकालपट्टी केली होती. अमेरिका हे लोकशाही नसून घटनात्मक प्रजासत्ताक राष्ट्र असल्याचे मत हेगसेथ यांनी व्यक्त केले आहे. तरुण मुलांना हवामान बदलाचे परिणाम शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांना इस्लामिक अतिरेकासारख्या वास्तविक धोका काय आहे, याची जाणीव करुन द्या, म्हणून त्यांनी विद्यापिठांना आवाहन केले होते. इस्रायलला आपला मित्रदेश मानणा-या पीट यांनी इराण सरकारला दुष्ट शासन म्हटले आहे. इस्लामवादी सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या युरोप आणि अमेरिकेवर वर्चस्व प्राप्त करण्याची योजना आखत आहेत, त्यांचा वेळीच बंदोबस्त व्हायला हवा, हे अजून एक पीट यांचे विधान वादग्रस्त ठरले होते. सतत वादामध्ये रहाणा-या या पीट हेगसेथ हे आता अमेरिकेच्या संरक्षणमंत्रीपदी आले आहेत. त्यामुळे अमेरिकेचे संरक्षण धोरण पुढच्या वर्षात कसे बदलणार आहे, याची धास्ती काही देशांनी घेतली आहे. (International News)
सई बने