Home » युद्धानंतर येथे केले पांडवांनी पिंडदान….

युद्धानंतर येथे केले पांडवांनी पिंडदान….

by Team Gajawaja
0 comment
Pehowa
Share

हिंदू धर्मात श्राद्ध करण्याला खूप महत्त्व आहे. पितृ पक्षात पितरांना तर्पण, श्राद्ध आणि आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान केले जाते. हे पिंडदान विशिष्ट तीर्थक्षेत्रावर केल्यास श्राद्धाचे फळ अधिक पुण्यकारक आणि  कल्याणकारी मानण्यात येते. सहसा श्राद्ध घरी केले जाते, परंतु काही लोक या दिवसात आपल्या पूर्वजांचे श्राद्ध विशिष्ट मंदिरात करतात. हरियाणातील कुरुक्षेत्र शहरापासून काही अंतरावर पिहोवा (Pehowa) येथे असेच खास मंदिर आहे.   

महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले. या युदधात आपल्या आप्तेष्टांना मारल्यामुळे धर्मराज युधिष्ठीर दुःखी झाला होता. तेव्हा पांडवांनी भगवान श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार युद्धात मारलेल्या आपल्या आप्तेष्टांचे पिंड दान केले. ते हेच स्थळ असल्याचे सांगण्यात येते. 

हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील पिहोवा (Pehowa) एक शहर आहे. याला स्थानिक भाषेत पेहोवा असेही म्हणतात. येथे श्रद्धादेवाचे मंदिर आहे. याला पृथुदक तीर्थ असेही नाव आहे. श्रद्धादेवाची म्हणजेच यमराजाची मूर्ती येथे आहे. स्थानिकांच्या मतानुसार या मुर्तीची स्थापना महाभारत काळातच, श्रीकृष्णाच्या हस्ते झाली आहे.    

पिहोवाचे जुने नाव ‘पृथुदक’ होते. हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून अनेक पुराण ग्रंथात पृथुदकचा उल्लेख आहे.  शतकानुशतके पृथुदक तीर्थावर ऋषीमुनींनी तपश्चर्या केली. त्यामुळे तीर्थयात्रेचे महत्त्व अधिक आहे. अशा तीर्थावर श्राद्ध कर्म केल्यास त्याचे विशेष फळ प्राप्त होते अशी धारणा हिंदु धर्मात आहे. महाभारत,  वामन पुराण,  स्कंद पुराण,  मार्कंडेय पुराण आदी पुराणे आणि धर्मग्रंथामध्ये या तीर्थयात्रेचे महत्त्व सांगण्यात आले आहे.   

पौराणिक कथांनुसार ब्रह्मदेवाने पृथ्वी, जल, वायू आणि आकाश मिळून या तीर्थाची निर्मिती केली. पृथुदक या शब्दाचा उगम महाराजा पृथुशी संबंधित आहे. याच ठिकाणी राजा पृथूने वडिलांच्या निधनानंतर अंत्यसंस्कार आणि श्राद्ध केले. अर्थात जिथे पृथुने उदक म्हणजेच पाणी वडिलांना दिले ते पृथुदक. पृथु आणि उदक यांच्या मिलनामुळे या तीर्थाला पृथुदक म्हणतात.  (Pehowa)

वामन पुराणातही या तिर्थक्षेत्राचं महात्म्य सांगण्यात आलं आहे. गंगेच्या तीरावर राहणाऱ्या ऋशंगु नावाच्या ऋषींनी आपल्या पुत्रांना गंगेचा काठ सोडून मोक्षाच्या इच्छेने पृथुदक येथे जाण्याची विनंती केली होती, तर  पद्म पुराणानुसार, जो व्यक्ती सरस्वतीच्या उत्तरेकडील पृथुदकामध्ये नामजप करताना शरीराचा त्याग करतो, त्याला निःसंशयपणे अमरत्व प्राप्त होते, असे सांगितल्याचे येथील पंडित सांगतात. 

हा पृथुतक म्हणजे पिहोवा हे गुर्जरा-प्रतिहार राजघराण्यातील महान राजांचे अश्वकेंद्र होते. येथे घोड्यांचा व्यापार होत असे. गुर्जर शासक मिहिर भोज याच्या शिलालेखावरुन ही माहिती मिळते. याशिवाय भगवान कृष्ण, युधिष्ठिर आणि इतर पांडवांनी त्यांच्या नातेवाईकांसाठी महाभारताच्या युद्धानंतर पिहोवा (Pehowa) मंदिरात श्राद्ध आणि पिंडदान केले होते असे मानले जाते. आजही श्राद्ध पक्षाच्या काळात आपल्या पितरांच्या पूर्तीसाठी हजारो भाविक या तीर्थक्षेत्री येतात. 

========

हे देखील वाचा :अबब! नदीकाठावर हजारो शिवलिंग!  काय आहे यामागचं रहस्य? 

=========

युद्धात पांडवांनी आपल्याच नातेवाईकांना मारले होते. याचे शल्य धर्मराज युधिष्ठिराला त्रस्त करत होते. आपल्या आप्तांनी मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त व्हावा अशी इच्छा युधिष्ठिरांनी भगवान कृष्णाकडे व्यक्त केली.  तेव्हा कृष्णांनी पाच पांडवांसह येथे पिंडदान केल्याची कथा सांगितली जाते. तेव्हापासून अपघाती किंवा ज्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला आहे, त्यांचे येथे पिंडदान केले जाते. त्यामुळे पितृपक्षात आणि विशेष करुन अमावस्येला येथे  मोठी  गर्दी होते.  

या मंदिरात सुमारे 250 पुजारी आहेत, ज्यांचा वंश सुमारे 200 वर्षे जुना आहे. अनेक महान व्यक्ती आपल्या पूर्वजांच्या पिंड दानासाठी पिहोवा (Pehowa)तीर्थावर गेल्या आहेत. यामध्ये गुरू नानक देव जी यांचे वंशज, गुरु गोविंद सिंग जी यांचे वंशज, गुरू अमरदास जी यांचे वंशज, गुरु तेग बहादूर, गुरु हरगोविंद, महाराजा रणजित सिंग, पटियालाच्या महाराजांचे वंशज, महाराजांचे वंशज यांचा समावेश आहे.  

पेहोवा तीर्थावर जो आपल्या पितरांचे श्राद्ध करतो, त्याचे पितृदोष दूर होण्याबरोबरच त्याच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात, असे येथील पुजारी सांगतात. अमावस्येच्या दिवशी, पिहावामध्ये आपल्या सर्व पितरांचे एकत्र श्राद्ध करण्यासाठी मोठी गर्दी जमते. ज्या व्यक्तीला आपल्या पूर्वजांच्या श्राद्धाची तिथी माहित नाही ते येथे अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे सध्या या भागात भाविकांची मोठी गर्दी आहे.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.