Home » Paul Biya : पॉल बिया हे आठवेळा कॅमेरुनचे राष्ट्रपती होणार !

Paul Biya : पॉल बिया हे आठवेळा कॅमेरुनचे राष्ट्रपती होणार !

by Team Gajawaja
0 comment
Paul Biya
Share

कॅमेरून या मध्य आफ्रिकन देश आकारानं लहान असला तरी त्यातील नैसर्गिक संपत्तीमुळे या देशावर कायम युरोप, अमेरिका, आशिया आणि अफ्रिका खंडातील देशांचे लक्ष राहिले आहे. तेल आणि वायू, खनिज धातू आणि उच्च-मूल्य असलेल्या लाकडाच्या प्रजाती आणि कॉफी, कापूस, कोको यासारखी समृद्ध नैसर्गिक संसाधने या देशात आहेत. हा देश या नैसर्गिक संसाधनांसाठी जसा ओळखला जातो, तसाच या देशाचे सर्वोच्च नेते पॉल बिया यांच्यासाठीही ओळखला जातो. पॉल बिया हे कॅमेरुनच्या राष्ट्रपतीपदावर गेली 43 वर्ष विराजमान आहेत. पॉल हे सलग सातवेळा राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. (Paul Biya)

आता त्यांचे वय 92 वर्ष असून येत्या ऑक्टोबरमध्ये होणा-या कॅमेरुनच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी पुन्हा आपल्या नावाची घोषणा केली आहे. सध्या आफ्रिकेतील सर्वात जास्त काळ सत्तेवर राहिलेल्या नेत्यांपैकी एक म्हणून पॉल बिया यांचे नाव घेतले जाते. मात्र पॉल हे गेल्या अनेक महिन्यापासून जनतेसमोर आलेले नाहीत. ते आजारी असून देशाबाहेर असल्याचे सांगण्यात येते. त्यांचा मृत्यू झाल्याची अफवाही अनेकवेळा पसरते. मात्र या सर्व अफवांना उत्तर म्हणून पॉल यांनी पुन्हा निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. असे झाले तर पॉल बिया हे आठवेळा कॅमेरुनचे राष्ट्रपती होणार आहेत. (International News)

कॅमेरूनचे 92 वर्षीय राष्ट्रपती पॉल बिया यांनी 12 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत आठव्या कार्यकाळासाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केली, आणि अवघ्या जगाचे लक्ष कॅरेरुनमधील राजकीय घडामोडींकडे वेधले गेले. मध्य अफ्रिकन देश असलेला कॅमेरुन हा छोटासा देश आहे. मात्र या देशातून खनिज संपत्ती आणि कॉफी सर्वाधिक युरोप, आशिया, अमेरिका येथे निर्यात केली जाते. त्यामुळे कॅमेरुनमधील प्रत्येक हालचालीवर या खंडातील देशांचे लक्ष असते. याच कॅमेरुनचे राष्ट्रपती पॉल बिया हे त्यांच्या जीवनशैलीमुळे कायम प्रकाश झोतात राहिले आहेत. 1982 पासून कॅमेरुनवर पॉल यांचे राज्य आहे. आता काही महिन्यापासून ते कोणालाही दिसलेले नाहीत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत होती. (Paul Biya)

मात्र त्यांनी या सर्व शंका कुशंका बाजुला सारुन एक मेसेज शेअर केला आहे. त्यात, तुमची सेवा करण्यासाठी माझा निर्धार कायम आहे, तरुणांचे आणि महिलांचे कल्याण करणे हा माझा प्राधान्यक्रम असून आपण कोणत्याही आव्हानाला एकत्रपणे तोंड देऊ शकतो, असे सांगून 12 ऑक्टोबरच्या निवडणुकीला सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. या त्यांच्या पोस्टमुळे कॅरेरुनसह अफ्रिकन देशात खळबळ उडाली आहे. पॉल बिया यांचे सर्व आयुष्य शाही राहिले आहे. पॉल बिया यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1933 रोजी कॅमेरूनमधील मेवोक जिल्ह्यात झाला. त्यांनी फ्रान्समध्ये शिक्षण घेतले. 1960 च्या दशकात कॅमेरूनच्या स्वातंत्र्यानंतर राजकारणात प्रवेश केला. पॉल 1982 मध्ये देशाचे राष्ट्रपती झाले आणि तेव्हापासून ते सत्तेत आहेत. (International News)

पॉल यांचा पक्ष कॅमेरून पीपल्स डेमोक्रॅटिक मूव्हमेंट असून त्याची देशावर चांगली पकड आहे. यातच 2008 मध्ये, बिया यांनी राष्ट्रपतीपदाच्या मुदतीच्या मर्यादा राज्यघटनेतून काढून टाकल्या आणि ते कायमस्वरुपी कॅमेरुनच्या सत्तेत रहाणार हे स्पष्ट झाले. असे असले तरी पॉल यांची प्रकृती अलिकडील काही काळात ठिक नसते. गेल्या वर्षभरात ते फार क्वचित सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. पॉल बिया यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असते. पॉल यांच्या पहिल्या पत्नीचे, जीन-आयरीन यांचे निधन 1992 मध्ये झाले. त्यानंतर त्यांनी 1994 मध्ये 38 वर्षांनी लहान असलेल्या शांतल पुलचेरी यांच्याबरोबर लग्न केले. पॉल यांना पॉल बिया ज्युनियर आणि अनास्तासिया ब्रेंडा बिया आयेंगा ही दोन मुले आहेत. याशिवाय पॉल यांनी फ्रँक बिया यांना दत्तक घेतले आहे. पॉल बिया यांचा राजकीय वारसा फ्रॅंक बिया यांच्याकडे जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येते. (Paul Biya)

=============

हे ही वाचा : Dolgyal Practice : तिबेटमधील रक्षक देवतेची दोलग्याल साधना नक्की काय आहे?

==========

या सर्वात पॉल आणि शांतल यांच्या शाही जीवनशैलीवर कायम टीका होत आहे. 2018 च्या निवडणुकीतही पॉल यांनी हेराफेरी करुन विजय मिळवला असा आरोप होत आहे. याच निवडणुकीपासून पॉल यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा सुरु झाली. काहीवेळा त्यांच्या मृत्यूच्याही बातम्या आल्या. अशावेळी सरकारनं त्या बातम्यांचे खंडन केले आहे.
सध्या कॅमेरुनपुढे अनेक गंभीर समस्या आहेत. त्यापैकी सर्वात मोठी म्हणजे, बोको हराम या क्रूर दहशतवादी संघटनेची वाढती ताकद. सोबतच इंग्रजी भाषिक भागात फुटीरतावादी हिंसाचारही वाढला आहे. या सर्वात आठव्यांदा जर पुन्हा पॉल बिया कॅमेरुनच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाले तर तो एक विक्रम होईल, पण समस्यांमधून ते कॅमेरुनला कसे सावरणार या विरोधकांच्या प्रश्नाचे मात्र उत्तर त्यांच्याकडे अद्याप नाही. (Paul Biya)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.