कुत्रा आणि माणसातील नात्याबाबत हिंदीमध्ये अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. त्याच मालिकेत गेल्या आठवड्यात ‘777 चार्ली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. रक्षित शेट्टीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात माणूस आणि कुत्रा यांच्यातील नाते दाखवण्यात आले आहे. (777 Charlie)
मुळ कन्नड भाषेमध्ये असलेला ‘777 चार्ली’, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाला कमल हसनच्या विक्रमचा सामना करावा लागला. एकीकडे ‘विक्रम’ सुपरहिट होत असतानाही ‘777 चार्ली’ही बॉक्स ऑफीसवर यशस्वी होत आहे. आता दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटानं यशाची घोडदौड चालू ठेवली असून 50 करोडच्या वर गल्ला जमा केला आहे.
खुद्द कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे आपल्या कुटुंबासह ‘777 चार्ली’ बघायला गेले होते. त्यांच्या लाडक्या कुत्र्याचे काही दिवसापूर्वी निधन झाले. त्यामुळे हा चित्रपट बघितल्यावर मुख्यमंत्री बोम्मई भावूक झाले. अर्थात मुख्यमंत्र्यांनी कौतुक केल्यामुळे ‘777 चार्ली’ बघायला प्राणीप्रेमींनी अधिक गर्दी केली आहे. माऊथ पब्लीसिटीचा चांगला फायदा चित्रपटाला झाला आहे. (777 Charlie)
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्यांची कथा हाच यशाचा फॉर्मुला असतो. ‘777 चार्ली’मध्येही असेच आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी 25 करोड रुपये खर्च झाल्याचे दिग्दर्शकांनी एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले आहे. आता दुसऱ्या आठवड्यात 50 करोडच्या पार जात ‘777 चार्ली’नं डबल कमाई करुन दिली आहे. या चित्रपटामध्ये रक्षित शेट्टी प्रमुख भूमिकेत असून त्यानेच हिंदीमध्ये डबिंग केले आहे. चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत किरणराज के, तर संगीता श्रृंगेरी, राज बी शेट्टी, दानिश सेठ, बॉबी सिन्हा यांच्या भूमिका आहेत.(777 Charlie)
‘777 चार्ली’ची कथा अत्यंत भावनिक आहे. धर्मा नावाच्या एका तरुणाची ही कथा आहे. अत्यंत बुद्धीमान असलेला धर्मा नावाचा तरुण एका कारखान्यात काम करतो. घरातून कारखान्यात जायचे, तिथून आल्यावर इडली खायची आणि सोबत सिगरेट, बीयर येवढ्यापुरतेच त्याचे आयुष्य मर्यादीत आहे. टिव्हीवरील ‘चार्ली चॅपलीन’ हा शो मात्र तो नेहमी बघतो.
एक दिवस त्याच्या घराजवळ एका गाडीच्या धक्क्यानं लॅब्रोडोर कुत्रा जखमी होतो. धर्मा त्या कुत्र्याला डॉक्टरांकडे नेतो आणि त्याच्यावर उपचार करतो. मात्र हा कुत्रा कोणाचा आहे, हे माहित नसल्यामुळे धर्मा नाईलाजानं त्याला आपल्याजवळ ठेवतो आणि त्याचे मुळ कुटुंब अर्थात मालक शोधण्याचा प्रयत्न करतो. यात धर्माला त्या कुत्र्याचा लळा लागतो. तो त्याचे नाव चार्ली ठेवतो. (777 Charlie)
====
हे देखील वाचा – सौगंध फेम शांतीप्रिया करणार मोठ्या पडद्यावर पुनरागमन साकारणार सरोजिनी नायडूंची व्यक्तिरेखा
====
दरम्यान धर्माला चार्लीबाबत एक अशी घटना कळते की धर्मा आणि चार्ली या दोघांचेही आयुष्य बदलून जाते. धर्मा चार्लीला घेऊन हिमाचल प्रदेशच्या यात्रेवर जातो. हे सर्व प्रसंग चित्रपटात पहाण्यासारखे आहेत. कारण चित्रपटातील अप्रतिम दृश्य आणि धर्मा आणि चार्लीचं बॉन्डींग.
आत्तापर्यंत हिंदिमध्ये तेरी मेहरबानियां, चिल्लर पार्टी, एंटरटेनमेंट सारखे चित्रपट झाले आहे. पण या सर्वात ‘777 चार्ली’ वेगळा म्हणावा असा आहे. त्यामुळेच फारशी प्रसिद्धी न करताही चित्रपट यशस्वी ठरला आहे. प्राणीप्रेमींनी नक्की पाहण्यासारखा असाच ‘777 चार्ली’ आहे. (777 Charlie)
– सई बने