Home » छ. शिवाजी महाराजांचा ‘हा’ गड आजही अजिंक्य आहे! मावळ्यांचे वंशज आजही इथे वास्तव्यास आहेत; वाचा गडाचा इतिहास

छ. शिवाजी महाराजांचा ‘हा’ गड आजही अजिंक्य आहे! मावळ्यांचे वंशज आजही इथे वास्तव्यास आहेत; वाचा गडाचा इतिहास

by Correspondent
0 comment
Pargad Fort | K Facts
Share

भारताच्या इतिहासात आवर्जून नाव घ्यावे लागते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आणि या स्वराज्याच्या माध्यमातून त्यांनी आदिलशाही, निजामशाही सारख्या मोगल सत्तेला शह दिला.

स्वराज्यातील जनतेला स्वतःचे स्वातंत्र्य मिळवून दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एकमेव असे महापुरुष आहेत, की ज्यांनी आपल्या सोबत स्वतःच्या मावळ्यांचा ही इतिहास घडवला होता.

शिवरायांनी आपल्या आयुष्यात बरेच किल्ले लढाई करून जिंकले, तर काही तहात जिंकले. तर अनेक किल्ले त्यांनी उभारलेही होते. मात्र त्यातील काही मोजकेच किल्ले आज स्वतःचे अस्तित्व टिकवून महाराजांच्या इतिहासाची साक्ष देत आहेत. आज आपण अशाच एका छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्याची गोष्ट पाहणार आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) परममित्र नरवीर तानाजी मालुसरे यांचा कोंढाण्याच्या लढाईत मृत्यू झाला. मालुसरे कुटुंबाचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला सहकार्याचा वाटा इथेच संपतो की काय असे वाटत असतानाच, तानाजी मालुसरे यांची परंपरा अखंडपणे टिकवून ठेवण्याचे काम त्यांचा मुलगा रायबा मालुसरे यांनी केले.

Pargad fort

पण इतिहासाने त्याची दखल घेतली नाही. आज त्याच संबंधित काहीसा हा लेख. चला तर मग जाणून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा आणि तानाजी मालुसरे यांच्या मुलाचा नक्की काय आहे संबंध ते.

माघ वद्य नवमी इ.स. १६७१ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वतःच्या मुलाचा विवाह बाजूला सारून, उदयभान सोबत लढाई करून कोंढाणा जिंकला. मात्र दुर्दैवाने या लढाईत तानाजी मालुसरेंना मृत्यू पत्करावा लागला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः उमरठला जाऊन रायबा मालुसरे यांचा विवाह लावून दिला.

सह्याद्रीची मुख्य रांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेजवळ पारगड किल्ला (Pargad Fort) बांधला. गोव्यावर लक्ष ठेवण्याच्या हेतूने हा किल्ला बांधण्यात आला होता.

महाराजांनी या किल्ल्याची किल्लेदारी तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांचा मुलगा रायबा मालुसरे यांच्याकडे दिली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत शेलार मामा सुद्धा होते. किल्ला बांधून झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे काहीकाळ मुक्काम केला होता. यावेळी शिवाजी महाराजांनी “जोपर्यंत आकाशात चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत गड जागता ठेवा.” अशी आज्ञा केली होती. त्या आज्ञेचे आजही काटेकोरपणे पालन होत आहे.

Kolhapur: Pargad

गडाचा इतिहास पहायला गेले तर आपल्याला समजते की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये पारगडावर मोघलांनी अनेक आक्रमणे केली. पण गडावरील मावळ्यांनी ती आक्रमणे परतवून लावली आणि हा पारगड अजिंक्य ठेवला.

इ.स. १६८९ मध्ये औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम याने पारगड जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्याला या मावळ्यांनी दाद लागू दिली नाही. मात्र एका आक्रमणात तोफखाना प्रमुख विठोजी माळवे हे धारातीर्थी पडले होते. त्यांची समाधी आजही या पारगडावर आपल्याला पहायला मिळते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी गड जागता ठेवण्याचे सांगितल्याने, आजही मावळ्यांचे वंशज या गडावर असलेले आपल्याला पहायला मिळतात. आजही तानाजी मालुसरे यांचे ११वे वंशज बाळकृष्ण मालुसरे, शेलार मामांचे वंशज कोंडीबा शेलार, गडावरील झेंडे लावण्याचे काम असलेले शिवाजी झेंडे व खंडोजी झेंडे, घोडदळ प्रमुखचे वंशज विनायक नांगरे तसेच गडकऱ्यांचे वंशज शांताराम शिंदे, याचबरोबर विठोजी माळवे यांचे वंशज कानोबा माळवे इत्यादी मंडळी गडावरती वास्तव्यास आहेत.

Pargad Fort

पारगडावर अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. यामध्ये गडावर अनेक तलाव, विहीरी, तटबंदी, स्मारके पहाता येतात. तसेच गडावर जाताना शिवकालीन पायऱ्या, गडाचा भग्न पावत चाललेला दरवाजा, गडप्रवेश करताच समोर तुटक्या तोफांचे काही तुकडे, बाजूलाच असलेले हनुमानाचे मंदिर आणि गडावर असलेले शिवकालीन भवानी मातेचे मंदिर आपल्याला पहायला मिळते.

आता या सर्वात तुम्हाला प्रश्न पडला असेल की गडावर नक्की जायचे कसे? तर याचेही उत्तर आम्हीच देणार आहोत.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असलेला पारगड. चंदगडपासून साधारण ३० किमी अंतरावर पारगड किल्ला वसलेला आहे. किल्ल्याच्या खाली एक गाव आहे. त्याचेही नाव किल्ल्यावरून पारगड ठेवण्यात आले आहे.

किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला ३०० पायऱ्या पार करून जावे लागते. किंवा किल्ल्यावर जाण्यासाठी डांबरी रस्ताही करण्यात आलेला आहे. पारगडापर्यंत चंदगडहून एस.टी. बसची सोय उपलब्ध आहे. ही बस गडाच्या पायर्यांपर्यंत जाते. तर खाजगी वाहन गडाला वळसा घालून गडाच्या माथ्यावर नेता येते.

-निवास उद्धव गायकवाड


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.