Home » १२ जुलै १९६१! नक्की काय घडलं होतं त्या दिवशी?

१२ जुलै १९६१! नक्की काय घडलं होतं त्या दिवशी?

by Team Gajawaja
0 comment
Panshet Dam disaster
Share

प्रत्येक शहराला चांगल्या – वाईट घटनांचा इतिहास असतो आणि या घटनांचा त्या शहराच्या जडणघडणीत खूप मोठा वाटा असतो. पुणंही त्याला अपवाद नाही. पेशवाईपासून पूर्वेच्या ऑक्सफर्डपर्यंतची कित्येक बिरूदं मानानं मिरवणाऱ्या पुण्याच्या इतिहासात पानशेतच्या धरणफुटीचं काळंकुट्ट पानही आहे. आज म्हणजेच, १२ जुलै रोजी या घटनेला तब्बल ६१ वर्ष झाली. (Panshet Dam disaster)

१२ जुलै १९६१! या दिवशी नेहमीप्रमाणे संथ- निवांत वावरणाऱ्या पुणे शहराला आणि तिथे राहाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कल्पनाही नव्हती, की आज आपलंच काय, पण या शहराचंही नशीब कायमचं बदलणार आहे. सतत चार दिवस सुरू असलेली पावसाची संततधार आणि संपर्काची कोणतीच खास साधनं नसल्यामुळे धरणफुटीच्या अफवा ऐकताना पुणेकर धास्तावलेले होते, तरी आपल्यावर किती मोठं संकट येऊ घातलंय याची त्यांना जराही कल्पना नव्हती.

तब्बल एक हजार लोकांचे बळी घेणारं पानशेतचं धरण फुटलं तेव्हा सकाळचे अंदाजे सव्वासात वाजले होते आणि त्यानंतरच्या पुढच्या दोन तासांत सगळं पुणं अक्षरशः पाण्याखाली गेलं. वाडे, इमारतींचे मजलेच्या मजले पाण्याखाली गेले. दुकानं, ऑफिस, कारखान्यांमध्ये लोक अडकून पडले. कित्येक जण जागचे वाहून गेले, ते किती याची गणतीच होऊ शकली नाही. शाळांमध्ये अडकलेल्या लहान मुलांच्या काळजीनं आई- वडिलांच्या जीवाचा झालेला थरकाप तर कल्पनातीत होता. (Panshet Dam disaster)

… ती काळरात्र ठरली असती

पानशेत धरणाचं बांधकाम पूर्ण होण्याआधीच त्यात काही दुरूस्त्या निघत होत्या. जेवढ्या वेळेत धरणाचं बांधकाम पूर्ण होणं अपेक्षित होतं, ते झालं नाही आणि अखेर ते व्यवस्थित पूर्ण होण्याआधीच वापरायला सुरुवात केली गेली. १९६१ च्या त्या पावसात धरण पूर्ण भरलं आणि त्याला तडे जायला सुरुवात झाली. त्यावरून शहरात चर्चाही सुरू झाली होती, मात्र तरीही धरणामुळे काहीही धोका नाही असंच सांगितलं जात होतं. अर्थात तसं व्हायचं नव्हतं. 

११ जुलैच्या रात्री आणि त्याआधी २ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं धरणाला तडे गेले. सुदैवाने काही धाडसी सैनिकांच्या तुकडीनं फुटू पाहाणाऱ्या त्या धरणाला अक्षरशः वाळूच्या पोत्यांनी बांध घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे शहरात बचावकार्य सुरू करायला किमान काही तास मिळाले, नाहीतर झोपेतच पुणेकरांवर काळाचा घाला पडला असता आणि बळींची संख्या कितीतरी पटींनी वाढली असती. (Panshet Dam disaster)

पानशेत फुटल्यानंतर.. 

धरणफुटीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत असली, तरी त्यात नेमकेपणा नव्हता. नदीचं पात्र दुथडी भरून वाहताना दिसत असलं, तरी पूर येईल असं कोणालाच वाटत नव्हतं. हळूहळू त्या पाण्याचा रंग गढूळ होत गेला आणि पाण्याची पातळी दर सेकंदाला वाढत होती. तेव्हा मात्र नागरिकांचा संयम सुटला. 

सर्वांनी इमारतींच्या वरच्या मजल्यांचा आश्रय घ्यायला सुरुवात केली. कित्येक नागरिकांनी पर्वती नाहीतर हनुमान टेकडीकडे धाव घेतली. विशेष म्हणजे, एवढं सगळं होऊनही ऑल इंडिया रेडिओनं धोक्याचा कोणताही इशारा प्रसारित केलाच नाही. शहर पूरमय झालं, तरी त्यावर रहदारी सुरूच होती असं सांगतात! 

पुराच्या पाण्याचा पहिला फटका बसला, तो अर्थातच पुण्यातली बैठी घरं आणि पेठांना. 

बंड गार्डन पूल सोडून सगळ्या पेठा, कर्वे रस्ता, डेक्कन जिमखाना पाण्याखाली गेलं होतं. असं म्हणतात की, तेव्हा पानशेतच्या जलाशयात पुणे शहराची जवळपास आजची गरज भागवू शकेल इतकं पाणी होतं. त्यावरून पुराची भीषणता लक्षात आली असेल. कित्येक तास पाण्याची पातळी ओसरलीच नाही. दाट अंधार, पाऊस आणि सगळीकडे पूर अशा भीषण अवस्थेत १२ जुलैचा दिवस आणि रात्रही संपली, मात्र आव्हानं सुरू झाली होती. (Panshet Dam disaster)

====

हे देखील वाचा – कोणार्क सूर्य मंदिर – येथे सूर्यास्तानंतर येतो घुंगरांचा आवाज….

====

पुरानंतरचं वास्तव

पुरानंतरचे दोन दिवस सतत ‘परत पूर येणार’ अशा अफवा पसरत असल्यामुळे नागरिक प्रचंड भेदरलेले होते. भीतीनं रात्र- रात्र जागून काढत होते. हळूहळू पूर ओसरला, मात्र पुरामुळे झालेली अतिशय भयानक स्थिती सर्वांच्या समोर आली. सगळ्या शहरात एक- दीड फुटांचा चिखल- गाळ साचलेला होता. वीज नव्हती, की प्यायला पाणी, खायला अन्न नव्हतं. प्रियजन दुरावलेले होते. प्रत्येकाच्या घरादाराची पूर्णपणे वाताहत झाली होती. कित्येकांकडे अंगच्या कपड्यांशिवाय काहीच उरलेलं नव्हतं. (Panshet Dam disaster)

तो काळ पाहाणारे पुणेकर सांगतात की, ही अवस्था एकवेळ परवडली, पण त्या परिस्थितीचा चोर- दरोडेखोरांना चीजवस्तू लुटण्यासाठी फायदा घेताना पाहाणं जास्त वेदनादायी होतं. तेव्हा कित्येक कुटुंबं पुण्याजवळच्या जिल्ह्यांत स्थलांतरित झाली. पेठांतले नागरिकही कोथरूड आणि अन्य उपनगरांत राहायला गेले. आज या घटनेला तब्बल ६१ वर्ष झाली, तरी त्या पुराच्या आठवणी जुन्या आणि नव्याही पिढीच्या मनातून ओसरलेल्या नाहीत.

कीर्ती परचुरे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.