श्रीकांत नारायण
”बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश न केल्याबद्दल अतिशय नाराज झालेल्या त्यांच्या ज्येष्ठ भगिनी आणि महाराष्ट्राच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी उपसलेली बंडखोरीची तलवार आपल्या दिल्ली दौऱ्यानंतर म्यान केली आहे. मुंबईत परत आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी आपली सबुरीची भूमिका जाहीर केली.
याप्रसंगी बोलताना त्यांनी जी भाषा वापरली त्यावरून त्यांनी एकापरीने पक्षांतर्गत ‘धर्मयुद्ध’ टाळलेले दिसते. मात्र हे सर्व करताना पंकजा ताईंनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्यावर पर्यायाने ‘मुंडे गटावर’ अन्याय होत आहे आणि तो यापुढेही असाच चालू राहिला तर सहन केला जाणार नाही. त्यासाठी प्रसंगी आम्ही वेगळा मार्ग अवलंबू असा पक्षश्रेष्ठींना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या महाविस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्यासह चार जणांची वर्णी लागली. मात्र प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत असूनही त्यांचे नाव ऐनवेळी गळाले आणि त्यांच्या जागी वंजारी समाजाचे प्रतिनिधी म्हणून औरंगाबादचे भागवत कराड यांचे नाव झळकले. त्यामुळे ‘प्रक्षुब्ध’ झालेल्या पंकजाताईंनी तातडीने पत्रकारपरिषद घेऊन आपण नाराज नसल्याचे जाहीर केले खरे मात्र त्याचबरोबर आपल्या गटावर अन्याय होत असल्याचेही सूचित केले.
त्यानंतर लगेचच बीड आणि नगर जिल्हयातील भाजप पदाधिकाऱ्यांचे ‘राजीनामा-सत्र’ सुरू झाले. अर्थात पंकजाताईं आणि खा. प्रीतम मुंडे यांनी सांगितल्याशिवाय हे राजीनाम्याचे नाटक सुरूच झाले नसते हे उघडच आहे. तब्बल शंभरहून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर पंकजाताईना दिल्लीला बोलावण्यात आल्याचे वृत्त झळकले त्याप्रमाणे त्या दिल्लीला गेल्याही आणि पक्षश्रेष्ठींना भेटल्या देखील.
पक्षश्रेष्ठींच्या आणि त्यांच्या भेटीतील चर्चेचा सविस्तर तपशील कळला नसला तरी त्यांनी दिल्लीहून आल्यानंतर कार्यकर्त्यांसमोर बोलताना ज्या पद्धतीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ती पाहता त्यांचे तथाकथित बंड तूर्त शमलेले दिसते. त्यांनी सावधपणे पुन्हा एकदा आपले पाऊल मागे टाकले असले तरी मात्र यानिमित्ताने पंकजाताईनी आपल्या गटाची ताकद दाखविण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. त्याचबरोबर पक्षातून आपल्याला कोणी संपविण्याचा प्रयत्न केल्यास तो सहन केला जाणार नाही असा इशाराही देऊन राज्यातील पक्षनेतृत्वाला त्यांनी अप्रत्यक्षपणे शहच दिला आहे.
राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर अधूनमधून आपली ‘उपद्रवक्षमता’ सिद्ध करावीच लागते. त्याशिवाय आपल्या मनासारखे फासे पडत नाहीत. नारायण राणे यांनी आपली उपद्रवक्षमता सिद्ध केल्यामुळेच शिवसेनेविरुद्ध त्याचा वापर करण्यासाठी त्यांना मंत्रीपदाचे पाठबळ देण्यात आले. त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळात इतर ज्या तिघांचा (कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार ) समावेश करण्यात आला.
त्यांची नावे पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही देवेंद्र फडणवीस यांचाच शब्द अंतिम आहे हे सिद्ध झाले आहे. आणि देवेंद्र फडणवीस आणि पंकजाताई यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे हेही आता सर्वांना माहित झाले आहे. पंकजाताई महत्वाकांक्षी असल्यामुळे आणि त्यांनी यापूर्वीही वेळोवेळी आपली महत्वाकांक्षा व्यक्त केल्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या ‘गटाचा’ पत्ता व्यवस्थितपणे कापला जात आहे याचा अनुभव पंकजाताई गेल्या काही दिवसापासून घेत आहेत. प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न होण्यामागचे खरे कारण तेच असावे.
प्रीतम मुंडे यांना ऐनवेळी डावलण्यामागचा हेतुपुरस्सर प्रयत्न पंकजाताईना जिव्हारी लागण्यामागचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे प्रीतम मुंडे यांच्या जागी मुंडे गटाचेच समजले जाणारे भागवत कराड यांची केंद्रीय मंत्री म्हणून वर्णी लागली. थोडक्यात भविष्यात पंकजाताईंच्या नेतृत्वाखालील मुंडे गटाला विभाजनाची दिशा देण्याची चाणाक्ष खेळी खेळण्यात आली. त्यामुळे पंकजाताई आणखीनच खवळल्या गेल्या नसल्या तरच नवल.
त्यातूनच त्यांनी बंडाचे अप्रत्यक्ष निशाण उभारले आणि त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांचे राजीनामा-सत्र सुरु झाले. दिल्लीहून परतल्यानंतर पंकजाताई मोठा निर्णय घेणार, त्या शिवसेनेत जाणार अशा बातम्याही झळकल्या. मात्र दिल्लीहून परतल्यानंतर आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी आपल्या समर्थकांना राजीनामे मागे घ्यायला सांगून सबुरीचा सल्ला दिला.
मात्र यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना आपल्या मनातील खदखद पहिल्यासारखीच व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी कौरवांचा उल्लेख करताना ‘महाभारतातील धर्मयुद्धाचा’ही उल्लेख केला. कौरवसेनेकडे योग्य सारथी नव्हते असे सांगून तसेच नरेंद्र मोदी, अमित शाह हेच आमचे नेते आहेत असे स्पष्ट करून त्यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानीत नसल्याचे अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले.
हे देखील वाचा: पंकजाताईंची खदखद…..
”आपले स्वतःचे घर आपण का सोडायचे?” असा कार्यकत्यांना सवाल केला परंतु त्याचबरोबर घरात जर ‘राम’ वाटत नसेल तर अशा घरात राहण्यात काय अर्थ असे विचारून आपण भावी काळात कोणती वाटचाल करू शकतो याचीही जाणीव करून दिली. म्हणजे पक्षात आपल्याला संपविण्याचे प्रयत्न चालूच राहिले तर आपण ‘दुसरे घर’ शोधू शकतो हेही त्यांनी सांगून टाकले. याचा अर्थ त्यांनी वेळ आली की भाजप सोडण्याची मानसिक तयारी केली आहे. त्यांनी निर्णय घेण्याचाच अवकाशअन्य पक्ष पंकजाताईंच्या स्वागतासाठी पायघड्या घालून तयार आहेतच अशीच महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आहे.
थोडक्यात सांगायचे तर पंकजाताईनी पक्षांतर्गत ‘धर्मयुद्ध’ तूर्त तरी टाळलेले दिसते. मात्र आपल्या गटावरील अन्याय जाहीर करण्यास आणि त्याची दखल पक्षश्रेष्ठींना घेण्यास भाग पाडण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत असे दिसून येते.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कार्यपद्धतीचा लौकिक लक्षात घेता पंकजाताईं यांच्या या दबावतंत्राची दखल कशा पद्धतीने घेतली जाईल हे लवकरच दिसून येईल.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.