रामभक्त हनुमानांचा जन्मोत्सव एप्रिल महिन्याच्या २ तारखेला सर्वत्र साजरा होणार आहे. या उत्सवाला अद्याप एक महिना असला तरी भारतातील प्रमुख हनुमान मंदिरांमध्ये आत्तापासूनच तयारीला सुरुवात झाली आहे. देशातील प्रसिद्ध हनुमान मंदिरांमध्ये चेन्नईतील अलौकिक असे श्री पंचमुख अंजनेयर मंदिर विशेष उल्लेखनीय आहे. येथे पंचमुखी हनुमानाची पूजा केली जाते. या मंदिरामध्ये पारंपरिक वैदिक विधींनी जन्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी हनुमानाचे पंचमुख स्वरूप विशेषतः सिंदूर, तेल आणि विशिष्ट निळ्या फुलांनी सजवले जाते. मंदिरात जन्मोत्सवाच्या आधीपासूनच हनुमान चालीसा पठण सुरू होते. १०८ वेळा सामूहिक हनुमान चालीसा पठण केले जाते. या पठणामध्ये सहभागी होण्यासाठी काही महिने आधीच नोंदणी सुरू होते. या संपूर्ण काळात मंदिर परिसर “जय श्री राम” आणि “जय हनुमान” या जयघोषांनी निनादून जातो. संपूर्ण भारतात भगवान हनुमानांची पूजा अंजनेय, हनुमानजी, मारुती, बजरंगबली, महावीर, पवनकुमार, वायुपुत्र अशा विविध नावांनी केली जाते. रामभक्त हनुमान हे सात चिरंजीवींपैकी एक मानले जातात. याच भगवान हनुमानांचा जन्मोत्सव एप्रिल महिन्यात साजरा होणार आहे. या उत्सवाची तयारी काही प्रमुख मंदिरांमध्ये सुरू झाली आहे. ( Panchamukha Anjaneyar Temple )

चेन्नईजवळील पुडुचेरी–तिंदिवनम रस्त्यावर असलेल्या श्री पंचमुख अंजनेयर हनुमान मंदिरात विशेष पूजाविधी सुरू झाले आहेत. या मंदिरात पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे, जी अतिशय जागृत मानली जाते. श्री पंचमुख अंजनेयर हनुमान मंदिर हे एक प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे. या भव्य मंदिराचे बांधकाम १९९९ मध्ये पंचमुख श्री जयमूर्ती सेवा ट्रस्टने सुरू केले. ११ जून २००३ रोजी ३६ फूट उंच अखंड ग्रॅनाइट मूर्तीची स्थापना करण्यात आली. २१ व्या शतकातील भगवान हनुमानांचे हे प्रमुख मंदिर मानले जाते. या मंदिराच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश हनुमानाच्या दुर्मिळ पंचमुखी स्वरूपाची पूजा स्थापित करणे हा होता. या मंदिराच्या उभारणीमागे रमणी अण्णा यांची प्रेरणा आहे. रमणी अण्णा हे भगवान हनुमानाचे परम भक्त असून चेन्नईतील नंगनल्लूर अंजनेयर मंदिर ट्रस्ट आणि पंचमुख श्री जयमूर्ती सेवा ट्रस्टसोबत ते अनेक वर्षे कार्यरत आहेत. ते कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य श्रीमहा पेरियावा यांचे शिष्य मानले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य पंचमुखी हनुमान मंदिर उभारण्यात आले. मंदिरासाठी जमीन श्री संथानम अय्यंगार यांनी दान केली आहे. येथील ३६ फूट उंच मोनोलिथिक ग्रॅनाइट मूर्ती ही भारतातील सर्वात उंच हनुमान मूर्तींपैकी एक मानली जाते. रामभक्तांसाठी हे मंदिर विशेष आदरणीय आहे. येथे भगवान हनुमानांच्या पंचमुख स्वरूपाचे दर्शन होतेच, शिवाय रामसेतूमध्ये वापरण्यात आल्याचा समज असलेला एक तरंगता दगडही येथे पाहायला मिळतो. त्यावर अस्पष्ट स्वरूपात “प्रभू राम” असे नाव दिसते, असे सांगितले जाते. ( Panchamukha Anjaneyar Temple )
श्री पंचमुख हनुमानाची कथा रामायणाशी संबंधित आहे. भगवान राम आणि रावण यांच्यातील युद्धादरम्यान रावणाने पाताळलोकाचा राजा महिरावणाची मदत घेतली. महिरावणाने विभीषणाचे रूप धारण करून भगवान राम आणि लक्ष्मण यांना पाताळलोकात नेले. प्रभू राम आणि लक्ष्मण यांच्या शोधार्थ हनुमान पाताळलोकात गेले. तेथे त्यांना समजले की, महिरावणाचा वध करण्यासाठी एकाचवेळी पाच दिवे विझवावे लागतील. तेव्हा हनुमानांनी हनुमान, हयग्रीव, नरसिंह, गरुड आणि वराह यांच्या मुखांसह पंचमुख रूप धारण केले आणि पाचही दिवे एकाचवेळी विझवले. त्यानंतर महिरावणाचा वध झाला आणि हनुमान प्रभू राम व लक्ष्मणांना परत घेऊन आले. भगवान हनुमानांचे हे पंचमुख स्वरूप भक्तांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे श्री पंचमुख अंजनेयर मंदिरात भक्तांची अहोरात्र गर्दी असते.
=======
हे देखील वाचा : Vikram Samvat 2083: नव हिंदू वर्ष – रुद्र संवत्सर
=======
याच स्थानी उपासनेतील संत श्री राघवेंद्र तीर्थ यांनी पंचमुख हनुमानाचे ध्यान केल्याचे सांगितले जाते. त्यांनी ज्या ठिकाणी ध्यान केले, तेथेच हे मंदिर उभारण्यात आले आहे. पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पूर्वाभिमुख “श्री अंजनेय स्वामी” मुखाच्या दर्शनाने पापांचा नाश होतो आणि मनाची शुद्धता प्राप्त होते, असा समज आहे. दक्षिणाभिमुख “श्री नरसिंह स्वामी” मुख शत्रूंचे भय दूर करते आणि विजय प्रदान करते. पश्चिमाभिमुख “श्री महावीर गरुड स्वामी” मुख वाईट शक्ती आणि नकारात्मक प्रभाव दूर करते. उत्तराभिमुख “श्री लक्ष्मी वराह स्वामी” मुख ग्रहदोष दूर करून समृद्धी प्रदान करते, असा विश्वास आहे. तर ऊर्ध्वमुख “श्री हयग्रीव स्वामी” बुद्धी, विजय, संतती आणि मुक्ती प्रदान करतो, असे सांगितले जाते. मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर असून आता येथे हनुमान जन्मोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. सर्वत्र “जय श्री राम” आणि “जय हनुमान” चा घोष घुमत आहे. ( Panchamukha Anjaneyar Temple )
– सई बने
