नोकरीसाठी मुलाखतीला गेलेल्या एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला पगार किती असावा, हा प्रश्न विचारला तर काय उत्तर असेल, काही लाखांचे पॅकेज किंवा एखाद करोड. मात्र वर्षाला तब्बल 21 कोटी पगार आणि अन्य फाईव्हस्टार सुविधा, शिवाय बोनस वेगळा असं मिळालं तर. अर्थातच ज्या व्यक्तीला हा अलिबाबाच्या खजिन्यासारखा पगार मिळेल, ती व्यक्ती तल्लख बुद्धीची असणार. आणि ही व्यक्ती आपल्या कंपनीसाठी यापेक्षाही अधिक फायदा करुन देणार, अशी व्यवस्थापनाची खात्री असणार. तसंच पाम कौर यांच्या बाबतीत झालं आहे. भारतीय वंशाच्या पाम कौर यांची जगात सर्वाधिक पगार घेणारी महिला म्हणून नोंद झाली आहे. (Pam Kaur)
पाम कौर या लवकरच हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशनच्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. गुगलमध्ये सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टमध्ये सत्या नाडेला, ॲडोबमध्ये शंतनू नारायण, आयबीएममधील अरविंद कृष्णा, लीना नायर, संजय मेहरोत्रा, इंद्रा नूयी या भारतीयांच्या सोबत आता पाम कौर यांचेही नाव जोडले गेले आहे. गेल्या काही दिवसापासून पाम कौर हे नाव चर्चेत आले आहे. ही चर्चा सुरु आहे, ती पाम कौर यांना मिळणा-या गलेलठ्ठ पगारामुळे तब्बल 21 कोटी रुपये पगार त्यांना मिळत आहे. शिवाय ज्या व्यवस्थापानासाठी त्या काम करतात, त्यांच्यातर्फे त्यांना अन्य सुविधा आणि बोनसही वेगळा आहे. (International News)
हा सर्व आकडा पाहून सर्वसामान्यांचे डोळे टिपले नसले तर नवलच आहे. मात्र एवढा पगार घेणा-या पाम कौर यांची जबाबदारी आणि त्यांचे कतृत्व पाहिल्यावर त्यांना एवढा पगार का मिळतो आहे, याचे उत्तर मिळते. पाम कौर यांच्यासाठी 160 वर्ष जुन्या असलेल्या संस्थेला आपले नियम बदलायला लागले आहेत. पाम कौर या हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशनच्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणजेच सीएफओ झाल्या आहेत. एचएसबीसी बँकेने प्रथमच मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून एका महिलेची नियुक्ती करुन आपला 160 वर्षांचा इतिहास बदलला आहे. पाम कौर आता आता कंपनीची 13643 लाख कोटी रुपयांची आर्थिक स्थिती सांभाळणार आहेत. 60 वर्षाच्या पाम गेल्या 12 वर्षापासून एचएसबीसोबत आहेत. आता त्या त्यांच्या नव्या जबाबदारीवर नव्या वर्षापासून, म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून रुजू होतील. (Pam Kaur)
सध्या या पदावर जॉन बिंघम हे तज्ञ आहेत. त्यांची निवृत्ती झाल्यावर पाम कौर या बँकेच्या सीएफओ होणार आहेत. पाम कौर यांचा एचएसबीसोबतचा कार्यकाल एवढा चांगला आहे की गेल्या 12 वर्षात त्यांना तीनवेळा वढती मिळाली आहे. पंजाबमधील रहिवासी असलेल्या पाम कौर यांनी पंजाब विद्यापीठातून बीकॉम ऑनर्स आणि फायनान्समध्ये एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्याकडे बॅंकीग क्षेत्रातील 40 वर्षांचा अनुभव आहे. अर्न्स्ट अँड यंग (EY) येथे चार्टर्ड अकाउंटंट म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्यांनी सिटी बँकेच्या अंतर्गत लेखापरीक्षण विभागाचा प्रवास सुरू ठेवला. एचएसबीसीमध्ये सामील होण्यापूर्वी, पाम कौर यांनी सिटी बँकेत 15 वर्षे काम केले आहे. यानंतर त्यांनी लॉयड बँकिंग ग्रुपमध्ये अनुपालन आणि अँटी मनी लाँडरिंगचे ग्रुप चीफ म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडमध्ये 4 वर्ष काम केले आहे. (International News)
======
हे देखील वाचा : तो आलाय तब्बल ऐंशी हजार वर्षांनी !
======
पाम कौर इंग्लंड आणि वेल्समधील चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेच्या सदस्य आहेत. आता त्याच पाम कौर यांच्या हातात एचएसबीचा व्यवहार आला आहे. त्यांना या जबाबदारीसाठी 803,000 पौंड म्हणजेच सुमारे 8.12 कोटी रुपये मिळतील. याशिवाय 1,085,000 पौंड म्हणजेच सुमारे 10.97 कोटी रुपये वेतन भत्ता दिला जाईल. यासोबतच 80,300 पौंड म्हणजेच सुमारे 81 लाख रुपये पेन्शन भत्ताही मिळणार आहे. म्हणजेच त्याचे वार्षिक पॅकेज 21 कोटी रुपये इतके आहे. पगाराच्या पॅकेजशिवाय त्यांना बोनसही मिळणार आहे. तो 215 टक्क्यांपर्यंत वार्षिक प्रोत्साहन पुरस्कार म्हणून मिळेल. तर दिर्घकालीन कामाचा पुरस्कार देखील मिळणार आहे. वयाच्या साठीला या मोठ्यापदावर विराजमान होणा-या पाम कौर यांनी काळानुसार स्वतःमध्ये बदल केले की वयाचे बंधन रहात नाही, अशी सकारात्मक प्रतिक्रीया या नियुक्तीनंतर दिली आहे. (Pam Kaur)
सई बने