Home » पक्षीपुराण

पक्षीपुराण

by Correspondent
1 comment
Share

दूरदर्शनच्या शंभर चॅनेलांपैकी बातम्या देणा-या चॅनेलांचा टीआरपी आज भलताच वधारला होता. सगळीकडे आलटून पालटून एकच बातमी. अक्षी… नव्हे पक्षी धुमाकूळ. राईचा पर्वत करणं, डोंगर पोखरून उंदीर शोधणं अशा वाक्प्रचारांचं बेस्ट ट्रेनिंग मिळण्याची जागा म्हणजे काही न्यूज चॅनेल. अर्थ नसलेल्या बातम्या दणकून इन्टरेस्टिंग कशा करायच्या हे जबरदस्त कळतं बघा ह्या लोकांना.

तर खबर अशी… म्हणजे मुळात ती खबरच आहे का? असा प्रश्न पडावा आपल्यासारख्या अतिसामान्य, बिच्चा-या नागरिकाला. तर ती खबर…महाराष्ट्रातल्या नाशिकजवळ असलेलं गोदावरीकाठचं एक बिचारं लहानसं खेडेगाव. एरवी कुणाच्या खिजगणतीतही नसलेलं. जातायेता हायवेवरून दिसणा-या हजारो हिरव्या पाट्यांवरच्या पाट्यांपैकी एक. ना कुठल्या राजकारणात, ना अध्यात ना मध्यात.

तर हे छोटुसं गाव आज मात्र सकाळपासून टिव्हीवरच्या मुख्य ब्रेकिंग न्यूजमध्ये झळकत होतं की. बिचारं ते इवलंसं गाव. सकाळी कूस बदलून, डोळे चोळत उठलं तर बाबौ … बातम्या देणा-या चॅनेलांच्या वार्ताहरांची गोदाकाठी जणू मांदियाळी जमली होती.

पार मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे पक्ष-प्रतिनिधी आपापल्या राजकीय पक्षाची सामाजिक इतिकर्तव्यता का काय म्हणतात ती आपणच फेडायची अशा उच्च उद्देशानं जमले होते. जमून काय करत होते? तर आपापल्या (सुमार) जनरल नाॅलेजचं ज्ञान चॅनेलवर पाजळणं. कॅमे-यासमोर यायची नि बोलायची किती ती प्राणांतिक इच्छा. जणू काही आख्खं जग ह्यांच्याचकडं डोळे लावून बसलंय.

तर वाचा ही अख्खी ब्रेकिंग… म्हणजे तुटकी तुटकी स्टोरी.

स्टुडिओतून चॅनेल न्यूज प्रतिनिधी दीपक : नमस्कार, दुपारचा एक वाजला आहे. आपल्या दुपारच्या जेवणाची लज्जत वाढवण्याकरता आम्ही रोज घेऊन येतो चटकमटक वार्ता.आजची चटकमटक बातमी फारच चवदार आहे. बातमी आहे नाशिकची. नाशिकजवळ एका गावात आज महत्त्वाचं काही घडलंय. काय घडलंय ते नाशिकला जाऊनच पाहू या.
नाशिकजवळ घटनास्थळी आपले प्रतिनिधी आश्विन उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशीच थेट संवाद साधू.

हॅलो, आश्विन,आश्विन, काय सांगशील तिथे घडलेल्या घटनेबद्दल, नक्की कसं, काय, केव्हा घडलं? आश्विन…

आश्विन : मी आत्ता या इथे गोदावरीकाठी उभा आहे. माझ्या मागे गोदावरी वाहताना तुम्हाला दिसत असेल. गोदावरी म्हणजे दक्षिणेकडची गंगाच. नाशिक आणि परिसरात सगळे तिला गंगाच म्हणतात. तर हा पहा तिचा खळाळता प्रवाह. आज ह्या गंगेकाठी प्रचंड जनसमुदाय जमला आहे. कारण एक फार मोठी आश्चर्यकारक घटना आज सकाळी इथे घडली. त्या घटनेची दखल घेऊन,या प्रदेशातील आमदारसाहेबांचं इथं आगमन झालं आहे. आपण आधी त्यांचं मत जाणून घेऊ.



आमदारसाहेब नमस्कार. आपली प्रतिक्रिया फार मोलाची आहे. काय वाटतं आपल्याला एकूण या प्रकाराबद्दल?

आमदारसाहेब: म्हंजी बगा, आमच्या पक्षानं या ग्रामीण भागात लई काम केलं बगा. त्याचं ह्ये फळ हाये. म्हंजी गावपातळीवर द्राक्ष प्रकल्प म्हनू नगा, जलसिंचन सुविधा म्हनू नगा. झालंच तर ते आपलं हे …सुलभ शौचालय म्हनू नगा…

चॅनेल न्यूज प्रतिनिधी दीपक : क्षमा करा आमदारसाहेब, सध्या तरी तुम्ही काहीच म्हणू नका. आमचा आमदारसाहेबांशी संपर्क तुटलेला आहे.

हॅलो आश्विन…घटनास्थळी प्रत्यक्ष घटना पाहिलेले कुणी नक्कीच असतील, काय म्हणणं आहे त्यांचं?

आश्विन : दीपक, इथे या घटनेचे अनेक साक्षीदार आहेत. आपण त्यांना विचारू या. नमस्कार. आपलं नाव?

रघुनाथ पाटील : मी रघुनाथ पाटील.

आश्विन: रघुनाथजी, नक्की काय पाहिलं तुम्ही?

रघुनाथ पाटील : म्हंजी बगा, सकाळच्या पारी इथं नदीवर फिराया आलो नि जागीच थिजलो. समोरचं आघटित बगून. आवं एक भला मोटा पक्षी इथं काठावर पंख पसरून पडलेला. हे पक्ष्याचं येवडं मोटं धूड आयुष्यात पयल्यांदा बगितलं. जवळ जायाचं बी डेरिंग झालं न्हाई बगा. गावात जाऊन बोंबाबोंब केलीन् आन् गाव उटिवला. तवा कळालं ह्यो तर रामायणातला जटायू.

आश्विन : म्हणजे रामायण काळातील जटायू? ही खरंच एक चटकमटक वार्ता आहे. आमचं चॅनेल ही खास चटकमटक वार्ता तुमच्या दुपारच्या जेवणासोबत तोंडी लावण्यास देत आहे.

रावणापासून सीतेला वाचवण्याकरता जिवाची बाजी लावणारा जटायू आज पहाटेपासून या गावात अवतीर्ण झाला आहे. ही या गावासाठी, नाशिक जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद घटना आहे. देशपातळीवर आज ह्या गावाचं नाव प्रसिद्ध झालं आहे.दुपारच्या रणरणत्या उन्हातही अनेक भाविक या जटायूची पूजा आणि आरती करण्याकरता इथं अगदी श्रद्धेने जमले आहेत. नाशिकजवळील गोदाकाठावरून, कॅमेरामन राहुलसह मी आश्विन, फुकट न्यूज 24 तास.

चॅनेल न्यूज प्रतिनिधी दीपक : धन्यवाद आश्विन ही चटकमटक वार्ता देण्याकरता.

याच वार्तेच्या अनुषंगाने आता इथे सरधोपट महाचर्चा रंगणार आहे.आपल्याबरोबर चर्चेत सहभागी होतायत, धर्मप्रतिष्ठानचे रामानंद धर्मप्रकाश, कार्यसम्राट दशरथ करोडे, पुराणकथा समितीचे अध्यक्ष लक्ष्मणकुमार, लोकसमितीचे कार्यप्रतिनिधी भरतराव नाशिककर,माता ट्रस्टच्या संचालिका कौसल्याताई. सर्वांचं स्वागत. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचाय, आज गोदावरीकाठी जी अकल्पित घटना घडली, त्याविषयी आपल्या काय प्रतिक्रिया आहेत?

धर्मप्रतिष्ठान अध्यक्ष : यातून हेच सिद्ध होतंय की, आपल्या धर्मकथा या भाकडकथा नाहीत. रामायणकाळापासूनचा हा महाकाय पक्षी आज अवतीर्ण झाला. धर्म ही अफूची गोळी नसल्याचा हा एक मोठा पुरावा आहे.

कार्यसम्राट : मी अभिमानाने सांगू इच्छितो की, आज या ठिकाणी, आमच्या पक्षानं या थोर पक्ष्याचं दर्शन एका वर्षात जनतेला घडवलं. ते आधीच्या सत्ताधारी पक्षाला मागल्या दहा वर्षांत जमलं नाही.

माता ट्रस्ट संचालिका कौसल्याताई : स्त्रीचं अपहरण करणारी विकृत रावणवृत्ती आपल्या समाजात अजूनही जागृत आहे, आम्ही माता तिचा निषेध करतो. स्त्रीचं रक्षण करण्याची जटायूवृत्ती पुढल्या पिढीत जोपासण्याकरता मातांबरोबर पितांनीही कटिबद्ध राह्यलं पाहिजे हा आमचा ठाम आग्रह आहे. यासंबंधी कायदा झालाच पाहिजे.हा जटायूसुद्धा हेच सांगण्याकरता पुन्हा आलाय, जे आम्ही सांगत असतो.

लोकसमिती अध्यक्ष : लोकांचा कौल महत्त्वाचा कारण लोकसमिती लोकाभिमुख आहे, लोकराज्याचा विजय असो. लोकांचं, लोकांनी चालवलेलं लोकल राज्य. हीच लोकशाही. लोकांचा कौल हा की…

पुराणकथा अध्यक्ष : जय जटायू, मंदिर यही बनायेंगे, बस्स.

चॅनेल न्यूज प्रतिनिधी दीपक : हॅलो, हॅलो, धन्यवाद. काही तांत्रिक कारणामुळे या सर्वांशीच आपला संपर्क तुटला आहे.

एक ब्रेकिंग न्यूज, नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार आज गोदावरीकाठी जखमी अवस्थेत सापडलेला महाकाय पक्षी हा रामायण काळातील ‘जटायू’ पक्षी नसून गृध किंवा गिध म्हणजेच गिधाड या पक्षी प्रजातीतला मोठ्या आकाराचा पक्षी आहे. अशा प्रकारचे अगदी मोजके पक्षी आता भारताच्या या पश्चिम घाटी परिसरात शिल्लक आहेत असं कळलं. एका हेलिकॉप्टरला धडकल्याने आज हा पक्षी गोदावरीकाठी पडल्याचं पक्षिमित्र संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितलं.

नुकतंच या पक्ष्याला नाशिक येथील जीवशास्त्रीय प्रयोगशाळेच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून, त्याच्या पंखावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं संघटनेचे कार्यवाह श्रीराम पंचवटीकर ह्यांनी सांगितलं. त्यामुळे या दुर्मीळ पक्ष्याचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. आता या घटनेच्या चर्चेवर पडदा पडला आहे. आम्हाला खातरी आहे की, आपलं दुपारचं जेवण या चटकमटक वार्तेमुळे नक्कीच लज्जतदार झालं असेल. या बातम्यांनंतर घेऊ या एक छोटासा ब्रेक, महत्त्वाच्या ताज्या घडामोडींसाठी पाहात राहा…. फुकट न्यूज 24 तास.

———- © डाॅ निर्मोही फडके.


Share

Related Articles

1 comment

Narhari Honap August 26, 2020 - 3:30 pm

सुंदर लेखन

Reply

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.