Home » व्हायरल मीम्समध्ये दिसणारे पाकिस्तानी खासदार आमिर लियाकत यांची एक्झिट

व्हायरल मीम्समध्ये दिसणारे पाकिस्तानी खासदार आमिर लियाकत यांची एक्झिट

by Team Gajawaja
0 comment
Share

टीव्ही- सिनेमातली पात्रं अतर्क्य, अद्भुत असतात, प्रत्यक्षात असं काही घडत नसतं असा समज असलेल्यांनी एकदा पाकिस्तानी टीव्ही अँकर आणि राजकारणी आमिर लियाकत हुसैन यांच्या आयुष्यावर नजर टाकावी. आपल्या कल्पनेतही नसलेली रंजकता, नाट्यमयता आणि वादविवाद त्यांच्या आयुष्यात होते. काल त्यांचा मृत्यूही त्यांच्या आयुष्याला साजेसा असा अचानक आणि गूढ ठरला. (Aamir Liaquat Hussain)

पाकिस्तानी राजकारणी आणि टीव्ही अँकर आमिर लियाकत हुसैन यांचा काल मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय फक्त ४९ होतं. पण या ४९ वर्षांच्या आयुष्यात त्यांच्या बाबतीत न घडलेला वाद किंवा त्यांनी न केलेला उपद्व्याप कदाचित शोधूनसुद्धा सापडणार नाही. सतत वादग्रस्त विधानं, गेम शोचं अँकरिंग करताना तान्ही बाळं वाटणं (हो, तुम्ही बरोबर वाचताय), तीन लग्नं, १८ वर्षांच्या तिसऱ्या बायकोनं जेमतेम काही महिन्यांत घेतलेला घटस्फोट, शोषणाचे आरोप, वादग्रस्त राजकीय कारकीर्द, निवडणुका, स्वतःचा कपड्यांचा ब्रँड उभारणं, अभिनय आणि मॉडेलिंग करणं, प्रभावी वक्तृत्व, ‘हेट स्पीच’मुळे टीका होणं, स्वतःच्या शोजवर बंदी लागणं, मीमर्सना भरपूर खाद्य देणारं अतरंगी वागणं… एवढं सगळं त्यांनी पन्नास वर्षांत जगून घेतलं आणि मृत्यूनंतर त्यांनी आपल्याबद्दल चर्चा घडवून आणण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. म्हणूनच आमिर लियाकत हुसैन हे काय रसायन होते हे जाणून घ्यायचा आपण केवळ प्रयत्नच करू शकतो!

बेधडक, वादग्रस्त

आमिर यांच्या शिक्षणापासून सांगायला सुरुवात करावी, तर आपण एमबीबीएस केल्याचा त्यांचा दावा होता. जो काही वर्षांनी खोटा असल्याचं उघडकीस आलं. आमिर यांच्याकडे अशी कोणतीही पदवी नव्हती आणि त्यांनी दावा केलेल्या सगळ्या पदव्या फार्स असल्याचंही पाकिस्तानी जनतेनं शोधून काढलं. त्यामुळे त्यांचं खरं शिक्षण काय आणि किती होतं हे सांगणं कठीणच आहे. २००२ मध्ये त्यांनी नॅशनल असेंब्ली ऑफ पाकिस्तानचं सदस्यत्व घेत राजकारणात प्रवेश केला. लगेच निवडणूक लढवली आणि ती जिंकून आमिर (Aamir Liaquat Hussain) धार्मिक घडामोडी खात्याचे मंत्री झाले. त्यांच्या बेधडक व्यक्तिमत्त्वाला जणू व्यासपीठ मिळालं. मंत्रीपद मिळून काही महिने होत नाहीत, तोवर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याचा सपाटा लावला. ‘धार्मिक विद्वानांना आत्मघातकी बॉम्बिंगविरोधात फतवा काढण्याचं’ आवाहन करत त्यांनी पाकिस्तानात खळबळ उडवून दिली. पक्षानं बऱ्याचदा समज देऊनही त्यांनी आपल्या वागण्यात काहीच बदल केले नाहीत आणि अखेर २००७ मध्ये ‘सलमान रश्दी यांनी त्यांच्या पुस्तकात केलेल्या एका विधानाबद्दल त्यांना ठार मारलं पाहिजे’ असं वक्तव्य केल्यानंतर पार्टीनं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. परत २०१८ मध्ये राजकारणात परतेपर्यंत त्यांनी टीव्हीचा पडदा गाजवला.

शोमॅन

आमिर यांनी २००१ मध्ये जिओ टीव्हीवरून काम सुरू केलं आणि काही काळाने खासगी चॅनेल्सवर रमजानवर आधारित प्रोग्रॅम तसंच गेम शोजचं होस्टिंग करायला सुरुवात केली. ते उत्तम वक्ते होते आणि तितकेच उत्तम शोमॅनसुद्धा! त्यांचा शो म्हणजे रेटिंग्जची खात्री असायची. शोचं स्क्रिप्टिंग कसं चोख असावं हे आमिर (Aamir Liaquat Hussain) यांच्याकडून शिकण्यासारखं होतं, असं त्यांच्याबरोबर काम केलेले सांगतात. टीव्ही शोजमधलं त्याचं बोलणं किंवा वागणं मीमर्ससाठी मेजवानी असायची. त्यांच्या बोलण्यात माहिती आणि मनोरंजनाचा समतोल साधलेला असायचा, वर बऱ्याचदा शिव्यांची फोडणी पण असायची. धर्माशी संबंधित विषयावर कार्यक्रम सादर करण्यावर त्यांचा भर असायचा आणि त्यातून अर्थातच नव्या वादांना जन्म मिळायचा. त्यांच्या अशा स्फोटक कार्यक्रमांमुळे पाकिस्तानात काहींना जीवही गमवावा लागला होता. स्त्री कलाकार, लेखिका, मानवतावादी कार्यकर्त्या यांच्याविषयी तद्दन पुरुषी विधानं करणं त्यांना खास आवडायचं.

क्विझ शो होस्ट करताना त्यांनी एकदा गाड्या, बाइक्स, घरगुती वस्तू यांच्याबरोबर रस्त्यावर टाकून दिलेली लहान बाळं जोडप्यांना वाटून कळस गाठला होता. ‘हा प्रकार मी माझ्या शोचं रेटिंग वाढवण्यासाठी केलेला नाही, कारण ते तसंही चांगलंच असतं, तर उलट कचराकुंडीत टाकून दिलेल्या या बाळांना आम्ही नवं आयुष्य जगण्याची संधी दिली’ अशा शब्दांत त्यांनी स्वतःचं समर्थन केलं होतं. इतकंच नाही, तर माझं हे वागणं किती महान आहे हे सांगायलाही ते विसरले नव्हते.

अखेर

अशा या बहुरंगी, बहुढंगी माणसाच्या आयुष्याचा शेवटचा अध्याय काही फारसा चांगला गेला नाही. फेब्रुवारीमध्ये दानिया शाह नावाच्या फक्त १८ वर्षांच्या मुलीशी लग्न केल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. आमिर (Aamir Liaquat Hussain) यांचं हे तिसरं लग्न सहा महिनेसुद्धा टिकलं नाही. वर दानियानं आमिर ड्रग अडिक्ट असून ते आपलं शोषण करायचे असं जाहीरपणे सांगत घटस्फोट घेतला. त्यावरून त्यांच्यावर परत टीका झालीच, पण टीकेची सवय असलेल्या आमिर यांना त्याचं काही वाटलं नाही. मात्र, सोशल मीडियावरचे मीम्स, युट्यूबर्सकडून घेतल्या जाणाऱ्या दानियाच्या मुलाखती, तिनं प्रसिद्ध केलेले त्यांचे व्हिडिओज व्हायरल होऊन इंटरनेटवर झालेली जहरी टीका यामुळे ते निराश झाले होते. दानियाच्या इच्छेप्रमाणे घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे, मग हे सगळे प्रकार कशासाठी असा त्यांचा प्रश्न होता.

==========

हे देखील वाचा – आर्थिक संकटात असणाऱ्या ब्रिटनला भन्नाट उपयोजना करून या ‘पोलादी स्त्रीने’ सावरलं

==========

आमिर (Aamir Liaquat Hussain) जिवंत असतानाही त्यांची टीव्हीवरची कारकीर्द असो किंवा राजकीय एकतर लोक त्यांच्यावर अफाट प्रेम करायचे, नाहीतर प्रचंड संताप. ही परंपरा त्यांच्या अचानक झालेल्या एक्झिटनंतर त्यांना श्रद्धांजली वाहतानाही कायम आहे हे विशेष.

– कीर्ती परचुरे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.