ज्याप्रकारे १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस आपल्या सर्वांच्या लक्षात असतो त्याचप्रमाणे १४ ऑगस्ट १९४७ या दिवशी काय घडलं, हे सुद्धा सर्वांना माहीत असतं. सोशल मिडियावर तर मिम्सचा पाऊस पडत असतो. आज भारत के बेटे का बड्डे, बेटे को जन्मदिन की शुभकामनाए असे मेसेज फिरत असतात. याच दिवशी पाकिस्तान भारतापासून वेगळा होऊन स्वतंत्र झाला होता. पण तेव्हापासून आतापर्यंतचा पाकिस्तानचा प्रवास पाहता हा देश सर्वात धोकादायक, सर्वात कर्जबाजारी, सर्वात गरीब देशांपैकी एक, दहशतवादाला खतपाणी घालणारा देश अशी दूषणं त्याच्यावर बसलेली आहेत. आज पाकिस्तानची हालत इतकी गंभीर आहे की, पुढच्या १०-१५ वर्षात त्यांच्यावर कोणी राज्य करतय की काय, अशीच परिस्थिती उद्भवली आहे. पाकिस्तानसारखच तिथल्या राजकारणाची स्थितीसुद्धा इतकीच खालावलेली आहे. आजपर्यंत ७८ वर्षांच्या इतिहासात पाकिस्तानचा एकही पंतप्रधान आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही. (Pakistan Prime Minister)
आजपर्यंत पाकिस्तानमध्ये तब्बल ३० पंतप्रधान झाले आहेत, त्यापैकी ६ पंतप्रधान हे काळजीवाहू होते. म्हणजेच एकूण २४ वेळा कोणाला ना कोणाला तरी पाकिस्तानने पंतप्रधानपदावर बसवलय. मात्र या पदाची पाच वर्षे आजपर्यंत कोणालाही पूर्ण करता आलेली नाहीत. यामध्ये सर्वात प्रमुख कारण लष्कराचा राजकीय हस्तक्षेप ! कुणी १३ दिवसांसाठी पंतप्रधान झालं, तर कुणी ५४ आणि ५५ दिवसांसाठी. सर्वात दीर्घ कार्यकाळ होता ४ वर्षे ८६ दिवसांचा, तो म्हणजे यूसुफ रजा गिलानी यांचा ! पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान ! त्यांचा कार्यकाळ ४ वर्ष ६३ दिवसांचा होता. पण १९५१ साली त्यांची रावळपिंडीमध्ये हत्या करण्यात आली. (Pakistan Prime Minister)
पाकिस्तानचे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणजे जुल्फीकार अली भुट्टो ! त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणूनही कार्यभार सांभाळला. १९७३ साली ते पाकिस्तानचे चौथे पंतप्रधान झाले. मात्र हुकूमशाह जिया उल हकच्या कट कारस्थानामुळे लष्करासोबत बंडखोरी केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांच्याच कन्या बेनझीर भुत्तो या पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या होत्या. १९८८ ते १९९० हा त्यांच्या पहिल्या पंतप्रधानपदाचा कार्यकाळ होता. त्यानंतर १९९३ ते १९९६ हा त्यांचा दूसरा कार्यकाळ ! मात्र २००७ साली रावळपिंडीमध्येच त्यांची हत्या करण्यात आली.
पाकिस्तानचे सहा पंतप्रधान असे होते ज्यांना एक वर्षाचा कार्यकाळही पूर्ण करता आला नाही. तर १८ असे प्रसंग घडलेले आहेत जेव्हा पंतप्रधनांना काही न काही कारणाने पद सोडावं लागलं. आतापर्यंत पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ यांनी सर्वाधिक म्हणजे तीनवेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. मात्र तीन टर्म मिळून त्यांचा कार्यकाळ ९ वर्षे १७९ दिवसांचाच राहिला. १९९३ या एका वर्षात पाकिस्तानचे तब्बल ५ पंतप्रधान बदलले गेले होते. त्यामुळे एकच कळून येतं की, पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीने अनेक आव्हानांना तोंड दिलं आहे. (Pakistan Prime Minister)
पाकिस्तानमध्ये सर्वात कमी काळ पंतप्रधान राहिले नुरुल अमीन ! ते फक्त १३ दिवस पंतप्रधान राहिले. तर सर्वाधिक काळ वरती सांगितल्याप्रमाणे यूसुफ रजा गिलानी होते, जे ४ वर्षे ८६ दिवस पंतप्रधान होते. इम्रान खान हे पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर आता पाकिस्तानी मुस्लिम लीग पार्टीचे शहबाज शरीफ हे पंतप्रधान झाले आहेत. मात्र आज इतक्या वर्षानंतरी पाकिस्तानी राजकारणावर आर्मीचाच सर्वाधिक हस्तक्षेप पाहायला मिळाला आहे. त्यामुळे पाकिस्तानची प्रगतीच खुंटली आहे. खुंटली बोलण्यापेक्षा त्यांच्या डिक्शनरीतून प्रगती हा शब्दच बाद झाल्याचं दिसून आलं आहे.
=====
हे देखील वाचा : जाणून घ्या उद्याच्या स्वातंत्र्य दिवसाची ‘ही’ माहिती
======
पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश एकत्रच स्वतंत्र झाले. दोन्ही ठिकाणी असलेली त्यावेळची आर्थिक, भौगोलिक आणि सामाजिक स्थिती एकसारखी होती. मात्र आजची पाकिस्तानची स्थिती भयंकर वाईट आहे. पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कमजोर झालाय. तसंच आता जगभरात दहशतवादासाठीच पाकिस्तान ओळखला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानमध्ये घराणेशाहीने भ्रष्टाचाराचा गाठलेला कळस ! पाकिस्तानमधील राजकीय सत्ता गेल्या काही वर्षांपासून काही निवडक कुटुंबांच्याच हातात आहे. पाकिस्तानातील दोन मुख्य घराणी म्हणजे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचं कुटुंब आणि ज्यांनी दक्षिण सिंध प्रांतावर अनेक दशके राज्य केलं ते भुट्टो कुटुंब ! त्यामुळे इतर चांगल्या नेत्यांना कधीही वर येण्याचा चान्सच मिळाला नाही. त्यामुळे भविष्यातही पाकिस्तानच्या राजकारणात काही बदल घडतील, असं कुठेही दिसून येत नाही. (Pakistan Prime Minister)