पाकिस्तानमधील सध्याची परिस्थिती बिकट झाली आहे. एकीकडे, असीम मुनीर यांना संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्त करायचे की नाही, या कैचीत पंतप्रधान शरीफ अडकले आहेत. तर दुसरीकडे बलूच बंडखोरांनी आक्रमक हल्ले सुरु केले आहेत. असाच एक हल्ला बलूच लिबरेशन फ्रंटने कडक सुरक्षा असलेल्या पाकिस्तान फ्रंटियर कॉर्प्स कॉम्प्लेक्सवर हल्ला केला आहे. या प्रकल्पामध्ये चीनचे इंजिनीअरही काम करत आहेत. कडेकोट सुरक्षा असलेल्या या भागात बलूच महिला आत्मघातकी बॉम्बरनं प्रवेश मिळवला आणि स्वतःला उडवून दिले. यात सहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून काही जखमी झाल्याची माहिती आहे. पाकिस्तान सरकारच्या दडपशाहीविरोधात बलुचिस्तान एकवटले आहे. पाकिस्तानी सैन्याविरोधात आता बलूच महिलाही शस्त्र उचलत आहेत. त्यामुळे अनेक बलूच महिला बंदूक आणि तोफा चालवण्याचे प्रशिक्षण घेत असल्याची माहिती आहे. सोबतच नुकत्याच झालेल्या हल्ल्यातून बलूच महिला फिदायीन होण्याचे प्रशिक्षणही घेत असल्याचे स्पष्ट झाले. (Zarina Rafique)

बलूच लिबरेशन फ्रंटने पाकिस्तान सरकारविरोधात चालू असलेले आंदोलन अधिक तीव्र केले आहे. यातूनच बलूच लिबरेशन फ्रंटने पाकिस्तानच्या फ्रंटियर कॉर्प्सच्या सुरक्षित कंपाऊंडवर हल्ला केला. हा हल्ला करण्यासाठी पहिल्यांदाच महिला आत्मघातकी बॉम्बरचा वापर करण्यात आला. चीनच्या तांबे आणि सोने प्रकल्पाशी हे ठिकाण जोडलेले आहे. चीनी प्रकल्पांना सुरुवातीपासूनच बलूच लिबरेशन फ्रंटने विरोध केला होता. मात्र या विरोधाकडे दुर्लक्ष करीत बलुचिस्तानमधील अनेक बहुमुल्य खाणी चीनच्या ताब्यात दिल्या आहेत. या सर्व खाणीतील उत्खनन थांबवावे आणि चीनच्या कामगारांना परत पाठवावे अशी बलूच लिबरेशन फ्रंटची मगणी आहे. मात्र पाकिस्ताननं ही मागणीही धुडकावून लावल्यामुळे आता बलूच लिबरेशन फ्रंटने या खाणींवरच हल्ला करण्याची रणनिती आखली आहे. त्यातूनच हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला. यासाठी पहिल्यांदा महिला हल्लेखोराचा वापर करण्यात आला. (International News)
हल्लेखोराने सुरक्षा गेटवर स्वतःला उडवून दिले, यात सहा पाकिस्तानी सैनिक ठार झाले. हा स्फोट झाल्यावर अन्य बीएलएफ सैनिकांना या कंपाऊंडमध्ये प्रवेश मिळाला. पाकिस्तानी सुरक्षा दलांविरुद्ध बीएलएफने महिला फिदायीनचा वापर करत त्यांच्याकडे पाकिस्तान सैन्याविरोधात किती मनुष्यबळ तयार आहे, याची चुणूक दाखवली आहे. बलूच लिबरेशन फ्रंट फक्त हा हल्ला करुन शांत बसले नाही तर त्यांनी या महिला फिदायीनची सर्व माहितीही सार्वजनिक करत तिच्या शौर्याला सलाम केला आहे. या महिला हल्लेखोराचे नाव जरीना रफिक होते. तिने बीएलएफ सैनिकांना मुख्य संकुलात प्रवेश करता यावा म्हणून सुरक्षा गेटवर स्वतःला उडवून दिले. बीएलएफने आत्मघातकी बॉम्बर, जरीना रफिक उर्फ ट्रांग महूचा फोटो देखील जारी केला आहे. (Zarina Rafique)

या हल्ल्यानंतर बलूच लिबरेशन फ्रंटने आपले लक्ष जाहीर केले आहे. पाकिस्तान सरकार चीनच्या सहकार्यानं जे प्रकल्प बलुचिस्तानमध्ये करत आहे, आणि त्यासाठी बलूच नागरिकांवर अत्याचार करत आहे, त्याविरोधात बलूच लिबरेशन फ्रंट असेच हल्ले करणार असल्याचे या हल्ल्यानंतर जाहीर करण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सरकार आणि लष्करातही अस्वस्थता आहे. कारण एकीकडे पाकिस्तानचे राजकीय स्थिती अस्थिर आहे. अशात पाकिस्तान लष्कर प्रमुख असीर मुनीर सीडीएफ बनण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यातूनच पाकिस्तानच्या सैन्याला मात्र कोणच वाली नसल्याची स्थिती आहे. याच स्थितीचा फायदा बलूच लिबरेशन फ्रंटने घेतला आहे. बलुचिस्तानमध्ये चीनच्या सहकार्यानं चालू असलेले पाकिस्तानी सरकराचे प्रकल्प बंद करण्यासाठी बीएलएफ काम करणार आहे. बीएलएफचे प्रवक्ते ग्वाहराम बलोच यांनी यासंदर्भात सांगितले की, आत्मघातकी ऑपरेशन गटाचे आत्मघातकी युनिट, सदो ऑपरेशन बटालियन आता पाकिस्तानी सैन्याला धडा शिकवणार आहे. (International News)
========
हे देखील वाचा : Pakistan : वेटींग लिस्टवर मुनीर !
========
या आत्मघातकी युनिटचे नाव शहीद कमांडर वाजा सदो यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. या सर्वात बलूच लिबरेशन फ्रंट सोबतच बलुच लिबरेशन आर्मीनेही ग्वादरच्या पासनी भागातील पाकिस्तानी लष्कराच्या तटरक्षक दलाच्या छावणीला ग्रेनेड लाँचर्सने हल्ला केला. मास्टुंग शहरातील एका पाकिस्तानी मेजरच्या घरावरही हल्ला करण्यात आला. बीएलएने असे २९ हल्ले केले असून त्यात २७ पाकिस्तानी सैनिकांना मारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच पाकिस्तानी सैनिकांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या सर्वात बलूच महिलांचा सहभाग वाढत आहे. बलूच महिलांनी पाकिस्तानी सैन्याविरोधात हातात शस्त्र घेतले आहे, आता त्या फिदायीन दलही उभारत असल्याची माहिती आल्यामुळे पाकिस्तानी सैन्यात दहशत पसरली आहे. (Zarina Rafique)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
