कुख्यात कारणांसाठी प्रसिद्ध असलेले दोन देश म्हणजे उत्तर कोरिया आणि पाकिस्तान (Pakistan and North Korea). दोन्हीही देश अण्वस्त्रधारी…! पाकिस्तान आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये घनिष्ट संबंध प्रस्थापित झाले ते ७० च्या दशकात. समाजवादी देशांबरोबर युती करण्यासाठी म्हणून पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फीकार भुट्टो हे उत्तर कोरियाच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते.
पाकिस्तान – उत्तर कोरिया संबंध (Pakistan and North Korea) हे एका वेगळ्याच कारणामुळे दृढ झाले ते म्हणजे उत्तर कोरियाने पाकिस्तानला अण्वस्त्र तंत्रज्ञान पुरवले तेव्हा इराण – इराक युदधमद्धे उत्तर कोरिया आणि पाकिस्तानने इराणला पाठिंबा दिला होता. हा झाला इतिहास… !
पण वर्तमानात तर उत्तर कोरिया हा पाकिस्तानवर एका वेगळ्याच कारणासाठी नाखुश आहे. ते कारण म्हणजे दारू! इथे तर असं म्हणण्याला जागा आहे की, एकविसाव्या शतकात केवळ दारुमुळे दोन देशांचे संबंध बिघडू शकतात असं हे पहिलंच उदाहरण आहे. तुम्हाला हे सगळं वाचल्यानंतर गंमत वाटेल पण हे असं घडलं आहे.
उत्तर कोरिया आणि पाकिस्तान (Pakistan and North Korea) यांचे संबंध ‘डिप्लोमॅटीक लेव्हल’चे आहेत. इस्लामाबाद इथे उत्तर कोरियाचा दूतावास आहे, तर प्योंगयंगमध्ये पाकिस्तानचा दूतावास आहे. असे हे राजनईक स्तरावर संबंध आहेत. मागच्या काही वर्षात घडलेल्या घटनांमुळे उत्तर कोरियाबरोबरचे पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. त्यात आता नवीन भर पडली आहे.
७ मार्च २०२२ रोजी, पाकिस्तानच्या इस्लामाबाद इथे असलेल्या उत्तर कोरियाच्या दूतावासावर पाकिस्तानी पोलिसानी छापे टाकले. कारण काय तर, उत्तर कोरियन अधिकारी पाकिस्तानमध्ये दारूचे स्मगलिंग करत होते, अनैतिकदृष्ट्या दारू आणत होते. पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्यांनी उत्तर कोरियन दुतावासातील अधिकाऱ्यांना दमदाटी करून, गुन्हा नोंदवून, त्यांना हातकड्या घातल्या व त्यांची कसून चौकशी केली. तसेच, बंदुकीचासुद्धा धाकही दाखवला.
२०१६ आणि २०१७ ला अशाच काहिशा घटना घडल्या होत्या. राजदूताने अनधिकृतरित्या दारू पाकिस्तानमध्ये आयात केल्याच्या संशयावरून १० पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्यानी उत्तर कोरियाच्या पाकिस्तानमधल्या, इस्लामाबाद मधल्या राजदूताचं घर फोडून, अनधिकृतरीत्या आत प्रवेश करून राजदूतला पकडलं तसंच त्याच्या पत्नीला दम दिला, धाक दाखवला, छळ केला आणि चौकशी केली.
====
हे देखील वाचा: किम जोंग उनच्या प्रकृतीविषयी चर्चांना उधाण
====
७ मार्च २०२२ ला जी घटना घडली, म्हणजे पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्यांनी जे छापे टाकले त्यामागे जे कारण देण्यात आलं ते नंतर खोटं असल्याचं निष्पन्न झालं. म्हणजे पाकिस्तानी सूत्राना टीप मिळाली होती की, उत्तर कोरियाच्या दुतावासात अगदी भरपूर प्रमाणात दारू अनधिकृतरित्या आणली आहे… पण ही माहिती खोटी निघाली.
यावर पाकिस्तानचा अंतरिम मंत्री रशीद खान याने घडलेल्या प्रसंगाबाबत माफी मागितली आणि मान्य केलं की, काहीतरी चुकीची बातमी, टीप पाकिस्तानी सूत्रांना मिळाली होती.
यावर उत्तर कोरियाच्या दुतावासाने एक पत्रक जारी केलं. त्यात त्यांनी म्हटलं की, ज्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हे सत्र चालवलं म्हणजे चौकशी केली, धाक दाखवला त्याबद्दल त्यांनी बिनशर्त माफी मागावी, त्यांना निलंबित करण्यात यावं आणि उत्तर कोरियाचा इस्लामाबाद इथला दूतावास ही सर्वस्वी उत्तर कोरिया सरकारची अधिकृत जागा आहे, तसंच ती जागा स्वतंत्र आहे, यावर अशा पद्धतीने पाकिस्तानी अधिकारी प्रवेश करू शकत नाहीत.
====
हे देखील वाचा: व्हेटो पॉवर (Veto Power) – आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्ता गाजवण्यासाठी वापरलं जाणारं साधन!
====
उत्तर कोरियाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली, तसंच पाकिस्तानला ताकीद दिली की, पाकिस्तान अशा पद्धतीने पाकिस्तान यांच्याशी वागू शकत नाही. हा ‘व्हिएन्ना कंनव्हेनशनचा (vienna convention)’ सरळ सरळ भंग आहे आणि यासाठी उत्तर कोरिया दाद मागेल.
गोष्ट इथेच थांबत नाही… आता तर कहानी मे ट्विस्ट म्हणजे या प्रकरणाबद्दलची एक धक्कादायक बाब समोर आली. त्यानुसार पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्यांना उत्तर कोरियाच्या दूतावसावर छापे टाकून, तिथून जर दारू निघाली, तर ती स्वतःकडे घेऊन खुल्या बाजारात त्याची विक्री करायची होती, अन त्यातून पैसे कमवायचे होते… म्हणजे पैसे मिळवण्याचं साधन म्हणून पोलिस अधिकारी अशा पद्धतीने थेट दूतावसावर छापे टाकत होते.
या घडलेल्या सर्व प्रकरणामुळे पाकिस्तानची उरली सुरली विश्वासार्हता संपुष्टात आली आणि जागतिक माध्यमांसमोर पाकिस्तानचं नाक कापलं गेलं. शेवटी उत्तर कोरियासारख्या मित्रदेशाने पाकिस्तानला ताकीद दिली, यावर पाकिस्तानने विचार करावा.
-निखिल कासखेडीकर