ब्रिटनचे राजघराणे आणि त्यांच्या परंपरा याकडे सर्व जगाचे लक्ष असते. ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर खाली झालेल्या राजगादीवर आता राजा चार्ल्स यांचा अधिकृतपणे राज्याभिषेक होणार आहे. 6 मे रोजी होणा-या या राज्यभिषेकासाठी आतापासूनच राजघराण्याची तयारी सुरु झाली आहे. या राज्यभिषेकामध्ये राजा चार्ल्स यांची पत्नी कॅमिला या सुद्धा राणी कॅमिला हा बहुमान प्राप्त करणार आहेत. या राज्यभिषेकाबाबतच सध्या चर्चा होत आहे, यात अधिक चर्चा होतेय ती कोहिनूर हि-याबाबत. कारण ब्रिटनच्या राणीच्या परंपरागत मुकुटात कोहिनूर (Kohinoor) हिरा आहे. हा कोहिनूर जडवलेला मुकूट घालण्यास केमिला यांनी नकार दिला असून त्यांच्यासाठी अन्य मुकूट तयार करण्यात येत आहे. राणीच्या मुकूटात असलेल्या कोहिनूरवर(Kohinoor) भारतानं आपला हक्क सांगितला आहे. त्यामुळे या कोहिनूर असलेल्या मुकूटामुळे काही वाद नको, म्हणूनच राणी कॅमिला यांनी ही भूमिका घेतल्याचे सांगितले आहे.
मे महिन्यात ब्रिटनमध्ये राजा चार्ल्स यांचा राज्याभिषेक होत आहे. 6 मे रोजी होणा-या या समारंभासाठी आतापासूनच मोठी तयारी करण्यात येत आहे. या सोहळ्यानिमित्त कोहिनूर (Kohinoor) हिरा चर्चेत आला आहे. सध्या ब्रिटनच्या राजघराण्याकडे असलेला हा कोहिनूर मुळ भारताचा आहे. आणि भारत सरकारनं त्याबाबत दावाही केला आहे. आता हाच कोहिनूर ज्या मुकूटावर जडला आहे, तो मुकूट कोण घालणार याची चर्चा चालू होती. मात्र हे चालू असताना ब्रिटनची नवी राणी होणा-या कॅमिला यांनी सावध पवित्रा घेत कोहिनूर जडलेला मुकूट घालणार नाही असे जाहीर केले आहे. यामुळे भारतासोबतचे संबंध बिघडण्याची भीती व्यक्त झाली, त्यामुळेच राणीसाठी 100 वर्ष जुना असलेला दुसरा मुकुट दुरुस्त करण्यात येत आहे. लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसने ही माहिती दिली आहे. यामुळे भारताची भूमिका या सर्वात किती महत्त्वाची ठरली आहे, याचीही चर्चा सुरु झाली आहे. एकेकाळी ज्या भारतावर ब्रिटननं राज्य केलं आणि त्याचा अभिमान बाळगला, त्याच ब्रिटनवर आता भारतीयांची मने दुखवू नयेत, अशी भूमिका घेण्याची वेळ आली आहे, अशीही चर्चा होत आहे.
कोहिनूर हिरा हा राजा जॉर्ज सहावा यांची पत्नी राणी एलिझाबेथ यांच्या मुकुटात जडलेला होता. तेव्हापासून हा हिरा ब्रिटिश क्वीन्सच्या मुकुटाशी जोडला गेला आहे. या मुकूटाला ‘द इम्पीरियल स्टेट क्राउन’ म्हणतात. आता 6 मे रोजी होणा-या सोहळ्यात कॅमिला क्वीन कॉन्सोर्ट म्हणून ओळखली जाईल. या निर्णयानंतर कॅमिलासाठी क्वीन मेरीचा 100 वर्षांचा मुकुट तयार केला जात आहे. कॅमिलाला अधिकृतपणे राणीचा दर्जा देण्यासाठी क्वीन कन्सोर्ट 6 मे रोजी तेथे असेल. यावेळी ती नवीन मुकुट परिधान करेल. राजघराण्याने क्वीन मेरीचा मुकुट देखील कॅमिलाच्या काही सूचना घेऊन त्यात बदल करण्यासाठी पाठवला आहे. कॅमिला, सध्या 75 वर्षांची आहे. ती सध्या कॉर्नवॉलची डचेस आहे. कॅमिला राजा चार्ल्स यांची दुसरी पत्नी आहे. राजकुमारी डायनाच्या मृत्यूनंतर चार्ल्सने कॅमिलाशी लग्न केले. राज्याभिषेकानंतर, कॅमिलाला कोणत्याही प्रकारचे घटनात्मक अधिकार नसणार आहेत. मात्र, तिची पदवी ब्रिटनच्या राणीसारखीच राहणार आहे.
कॅमिलाबाबतची ब्रिटनच्या जनतेची भूमिका आणि राजकुमारी डायनाची लोकप्रियता यांचाही विचार राजघराण्याला करावा लागत आहे. त्यामुळे ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच शाही मुकुटाच्या जागी काही बदलांसह जुना मुकुट पुन्हा वापरण्यात येणार आहे. कॅमिलाला राणीपद देताना तिच्या मुकुटात राजघराण्याची परंपरा सांगणारे काही खास हिरे जोडले जाणार आहेत. हा मुकुट 100 वर्षांहून अधिक जुना आहे आणि 1911 मध्ये क्वीन मेरीने पहिल्यांदा परिधान केला होता. राणी एलिझाबेथच्या मुळ मुकूटावर अमुल्य असा कोहिनूर आणि आफ्रिकेतील ग्रेट स्टारसह जगातील अनेक मौल्यवान हिरे जडलेले आहेत. त्याची किंमत सुमारे $400 दशलक्ष एवढी आहे. भारताने ब्रिटनसमोर अनेकवेळा कोहिनूर (Kohinoor) हिऱ्यावर आपला कायदेशीर हक्क सांगितला आहे. भारताप्रमाणेच आफ्रिकेनेही ब्रिटनच्या शाही मुकुटात जडलेले आपले मौल्यवान हिरे परत करण्याची मागणी अनेकदा केली आहे. त्यामुळेच हा मुकूट आता वादात सापडला आहे.
=======
हे देखील वाचा : १० हजार खोल्या असलेले हॉटेल ८० वर्षांपासून बंद, पण का?
=======
कोहिनूर (Kohinoor) हिऱ्याचा इतिहासच अनेक वाद-विवादांनी भरलेला आहे. 1849 मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी पंजाबवर ताबा मिळवला. महाराजा दुलीप सिंग यांनी 1849 मध्ये राणी व्हिक्टोरियाला 108 कॅरेटचा कोहिनूर (Kohinoor) हिरा दिला. नंतर हा कोहिनूर ब्रिटीश मुकूटात जडवण्यात आला. आता याच कोहिनूरवर (Kohinoor) भारताशिवाय पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्ताननेही दावा केला आहे. कोहिनूर हिरा जडलेला मुकूट राजा चार्ल्सच्या दिवंगत आजी राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी शेवटचा परिधान केला होता. हा कोहिनूर हिरा 105 कॅरेटचा आहे. त्यामुळे त्याची किंमत कधीच करता आली नाही, एवढा तो अमुल्य आहे. आता या कोहिनूरवर (Kohinoor) भारतासह अनेक देशांनी आपला दावा लावला आहे. यामुळेच ब्रिटन राजघराण्यानं सावध भूमिका घेत राणीपदाचा मान घेणा-या कॅमिलाचा मुकूटच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण काय भारताची नाराजी आता ब्रिटनला परवडणारी नाही, हेच खरं.
सई बने…