सध्या सर्वत्र छावा (Chhaava) या चित्रपटाचीच हवा आहे. अभिनेता विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला देशभरातून प्रेम मिळत आहे. अजूनही मूव्ही रिलीज झाला नाही, पण सगळीकडे छावाचाच बोलबाला आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी छावा नावाचा तुफान चित्रपटगृहांमध्ये धडकणार आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहीत नसेल की, शंभू राजेंची भूमिका करून सर्वांचं प्रेम मिळवणारा हाच विकी कौशल एकेकाळी शंभू राजेंची क्रूरतेने हत्या करणाऱ्या औरंगजेबाची भूमिका साकारणार होता. तो चित्रपट कोणता होता , जाणून घेऊ.
बॉलिवूडच्या (Bollywood) इतिहासात पहिल्यांदाच छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर इतका ग्रँड चित्रपट येतोय, त्यामुळे फक्त मराठी प्रेक्षक नाही, तर देश-विदेशातले इतिहास आणि सिनेप्रेमी याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. विकी कौशलने (Vicky Kaushal) साकारलेले छत्रपती संभाजी महाराज ट्रेलरमध्येच पाहून अंगावर काटा आला, तर चित्रपटात काय होईल, अशा कमेंट्स सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहेत. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि डायरेक्टर लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी शंभू राजेंना मोठ्या पडद्यावर सादर करण्याचं धाडस दाखवलं आहे.(Bollywood Update)
ट्रेलर बघून आपल्याला थोडी का होईना चित्रपटाची कास्ट कळलीच असेल. यामध्ये अजून एका भूमिकेची सर्वात जास्त चर्चा आहे, ती म्हणजे मुघल बादशाह औरंगजेबाची… आणि ती साकारली आहे अक्षय खन्नाने… अक्षय या भूमिकेसाठी सूटेबल असल्याचं अनेक प्रेक्षक म्हणत आहे. पण अनेकांना माहीत नाही, ती गोष्ट म्हणजे आज शंभू राजेंचीच भूमिका साकारणारा विकी कौशल एकेकाळी चक्क औरंगजेबाची भूमिका साकारणार होता. हो, हे खर आहे. २०१८ साली एका मेगा बजेट हिस्ट्रीकल ड्रामा मूव्हीची घोषणा झाली होती, तो म्हणजे तख्त !
बॉलीवूडचा प्रसिद्ध डायरेक्टर आणि निर्माता करन जोहरने हा मूव्ही अनाउन्स केला होता. तगड्या स्टारकास्ट सोबत कोण कोणती भूमिका साकारतय हेसुद्धा जाहीर करण्यात आलं होतं. यामध्ये रणवीर सिंग औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोह साकारणार होता, तर अनिल कपूर (Anil Kapoor) हा शाहजहान, करिना कपूर ही दिलनारा बेगम, आलिया भट ही दिलरास बानू बेगम, भूमी पेडणेकर ही रोशणारा बेगम, जान्हवी कपूर ही नादिरा बानू बेगम आणि विकी कौशल (Indian actor) हा औरंगजेबाची भूमिका करणार होता. हा चित्रपट शाहजहान नंतर दारा शुकोह आणि औरंगजेबामध्ये झालेल्या तख्ताच्या लढाईवर आधारित होता.
============
हे देखील वाचा : Ajjamada Boppayya Devayya महावीर चक्रने सन्मानित अज्जामद बोपय्या देवय्या कोण होते?
============
२०१८ ला अनाऊंस झालेल्या या चित्रपटाला अनेक कारणांना सामोरं जाव लागलं होतं. पहिलं म्हणजे कोविड-१९, त्यानंतर सर्वांचं शूटिंग वेळापत्रक जमत नव्हतं, अजून एक म्हणजे २०२० साली सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या आणि त्यानंतर उफाळलेला नेपोटिझमचा वाद… यावेळी करण जोहरला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. परिणामी त्याने हा मूव्हीच रद्द करून टाकला, जो २०२० लाच रिलीज होणार होता. म्हणजे विचार करा, शंभू राजेंची भूमिका साकारण्याच्या आधी विकी कौशल थेट औरंगजेबाची भूमिका करणार होता. (Marathi News)
हा मूव्ही जरी करण जोहरने रद्द केला असला तरी त्याने मध्यंतरी एका इंटरव्यूमध्ये म्हटलं होतं, की हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि तो मी पूर्ण करणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जोहर या मुव्हीसाठी तयारी करताना दिसू शकतो. पण आता पूर्णपणे शंभू राजेंच्या भूमिकेत घुसलेला विकी कौशल आता औरंगजेब साकारणार का यावर शंकाच आहे. त्यामुळे जर जोहरने मूव्ही केलाच तर त्याला आता आपली संपूर्ण स्टारकास्ट बदलावी लागणार, हे तर निश्चितच आहे.