माणसाने माणसाला माणसासारखे वागवले पाहिजे. मृत्यू हा एक उत्सव आहे. त्याची वेळ निश्चित आहे त्यामुळे त्याला घाबरू नका. सत्य हे तुमच्यातच असते, त्याचा इतरत्र शोध घेण्यात वेळ खर्ची घालू नका. खुद्द जीवनापलीकडे वेगळा परमेश्वर नाही. जीवनाचे सार सांगणारी ही तत्वे आपल्या भाषणातून, प्रवचनातून सांगणारा अवलिया दुसरा तिसरा कुणी नसून ‘ओशो (Osho)’ म्हणजेच आचार्य रजनीश आहेत.
जन्माने ‘चंद्र मोहन जैन’ असे नाव असलेले पण आध्यात्म आणि तत्वज्ञानाच्या कक्षेत आल्यानंतर आचार्य रजनीश उर्फ ओशो (Osho) या नावाने प्रसिध्द असलेल्या ओशो यांच्यातील तत्ववेत्ता हा नेहमीच आयुष्यातील वैचारीक सत्यावर भाष्य करून गेला.
अमेरिकेतील आश्रमात या भारतीय तत्ववेत्याचा मृत्यू झाला. तो दिवस होता १९ जानेवारी. ओशो यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांच्यावर विषप्रयोग केल्याचा आरोप त्यांच्या अनुयायांनी केला. इतकंच नाही, तर त्यांना अविश्वासाने मारल्याचेही बोलले गेले. आयुष्यभर जीवनाच्या सत्यतेला तत्वज्ञानाच्या माध्यमातून मांडणाऱ्या ओशो यांच्या मृत्यूभोवतीचा सत्य-असत्याचा विळखा आजही कायम आहे. एकीकडे जगातील बहुतेक सर्व धर्मांच्या पाखंडी विचारांवर ओशो यांनी घणाघाती हल्ला चढवला. दुसरीकडे त्यातीलच चांगल्या मूल्यांची सोदाहरण ताकदीने मांडणी करत अखिल समाजाला नव्या दृष्टीचे परिमाण दिले.
ओशो (Osho) यांचे प्रवाहाविरोधात बोलणे, वागणे हे काही त्यांच्या आचार्य बनण्यानंतरची प्रक्रिया नव्हती, तर शालेय जीवनातच ओशो यांच्या बंडखोर, न पटणाऱ्या गोष्टींविरोधात बोलण्याच्या प्रवृत्तीचे दर्शन घडले होते. ओशो यांचे शालेय शिक्षण मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील कुचवाडा या खेड्यात झाले.
गावातील शाळेत पहिलीत असताना एक शिक्षक मुलांना बेदम मारझोड करून शिकवत असत. छोट्या ओशो यांनाही त्या शिक्षकांचा मार मिळाला होता. मुलांचे चुकत असेल, त्यांना शिकवलेले समजत नसेल, तर मारणे हा काही पर्याय नाही, हे सहा वर्षांच्या ओशोना उमगले. रोज मुले त्या शिक्षकाचा बेदम मार खातात हे काही बरोबर नाही.
अशी अध्यापन पदधती असू शकत नाही, असं म्हणत लहानग्या ओशोने त्या शिक्षकाची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली. पण दुर्दैवाने मुख्याध्यापकांनी शिक्षकाबाबत कोणतीही कारवाई केली नाही. उलटपक्षी, “मुलांना शिस्त लावण्यासाठी त्यांना मारण्याचा अधिकार शिक्षकांना आहे”, अशी पुष्टी जोडली.
ओशो (Osho) मात्र तिथेच थांबले नाहीत, तर ते थेट गावच्या सभापतींकडे गेले. तिथेही दाद मिळाली नाही तेव्हा ओशो यांनी शिक्षण आयुक्तांना गाठले तेव्हा कुठे त्या शिक्षकाची चौकशी झाली आणि त्या शिक्षकाला शाळेच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. थोडक्यात काय ओशो यांनी शाळेत सुरू असलेल्या अन्यायाविरोधात बोलण्याची चिकाटी सोडली नाही.
जे चूक आहे ते दाखवून दिले पाहिजे आणि जे सत्य आहे, पण केवळ वर्षानुवर्षे त्यावर बोलणे योग्य नाही म्हणून बोलायचे नाही, हे बंधन झुगारून देता आले पाहिजे, हे तत्वज्ञान ओशो यांनी केवळ जगालाच सांगितले नाही, तर स्वत:ही अंगीकारले. अर्थात त्याचे बरेवाईट परिणाम आचार्य रजनीश उर्फ ओशो यांना त्यांच्या जीवनप्रवासात भोगावे लागले. पण ते कधीच मागे हटले नाहीत.
मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यात असलेल्या कुचवाडा नावाच्या खेड्यात (आईच्या आजोळी) तारणपंथी जैन कुटुंबात चंद्र मोहन जैन ऊर्फ ओशो (Osho) यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बाबुलाल जैन हे कापडाचे व्यापारी होते. ओशोंनंतर त्यांना आणखी दहा अपत्ये झाली. ओशोंच्या आईचे नाव सरस्वती होते. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत ओशो आजोळीच राहिले.
खुद्द ओशोंच्या म्हणण्यानुसार आजीने दिलेल्या स्वातंत्र्याचा त्यांच्या जडणघडणीवर परिणाम झाला. सातव्या वर्षी आजोबांचे निधन झाल्यानंतर ओशो गदरवारा येथे आपल्या आईवडिलांसोबत राहावयास गेले. आपल्या आजोबांच्या निधनाचा ओशोंच्या मनावर खोल परिणाम झाला होता.
ओशो १५ वर्षांचे असताना त्यांची बालपणातील मैत्रीण आणि चुलतबहीण शशी हिचा विषमज्वर होऊन मृत्यू झाला. मृत्यूच्या या दर्शनाने ते बालपणात आणि तारुण्यावस्थेत मृत्यूविषयी अधिक चिंतन करू लागले. मृत्यू हा एक सोहळा आहे, तो ठरलेला आहे, हा विचार ठाम होण्यात त्यांच्या आयुष्यातील याच घटना कारणीभूत आहेत. शाळेत असताना ते बंडखोरपणे वागत असले तरी त्यांच्यातील प्रतिभा आणि दर्जेदार वाद-प्रतिवाद करण्याची त्यांची क्षमता लपून राहिली नाही.
वयाच्या एकोणिसाव्या वर्षी जबलपूरमधील हितकारिणी कॉलेजमध्ये ओशो महाविद्यालयीन शिक्षणासाठी दाखल झाले ते वर्ष होतं १९५१. निर्देशकांशी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर ओशोंना कॉलेज सोडावे लागले आणि जबलपूरमध्येच डी. एन. जैन कॉलेजामध्ये ते स्थलांतरित झाले. अध्यापकांशी निरंतर वाद घालण्याच्या सवयीमुळे कॉलेजमधील उपस्थितीतून त्यांना सूट मिळाली. केवळ परीक्षेसाठीच कॉलेजमध्ये यावे, अशा सूचना मिळाल्याने रिकाम्या वेळात ओशो एका स्थानिक वृत्तपत्रात सहाय्यक संपादक म्हणून काम पाहू लागले.
जबलपूरमध्ये दरवर्षी तारणपंथी जैन समुदायाचे सर्व धर्म संमेलन आयोजिले जाते. या संमेलनात भाषणे करण्यास ओशोंनी सुरुवात केली. वयाच्या एकविसाव्या वर्षी जबलपूरमधील भंवरताल गार्डनमध्ये एका वृक्षाखाली बसले असताना, त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. तत्वज्ञानाकडे त्यांचा ओढा वाढला. डी. एन. जैन कॉलेजात सन १९५५ मध्ये ओशो बी. ए. (तत्त्वज्ञान) झाले.
सागर विद्यापीठातून सन १९५७ मध्ये ते विशेष प्रावीण्यासह एम. ए. (तत्त्वज्ञान) झाले. रायपूर संस्कृत कॉलेजमध्ये लागलीच त्यांना अध्यापकाचे पद मिळाले. पण विद्यार्थ्यांच्या नैतिकतेला, चारित्र्याला आणि धर्माला ओशोंमुळे धोका आहे, असे वाटल्याने उपकुलगुरूंनी ओशोंना बदली करवून घेण्याचा सल्ला दिला.
सन १९५८ पासून ओशो जबलपूर विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून काम करू लागले. १९६० मध्ये त्यांना प्राध्यापक म्हणून बढती मिळाली. विद्यापीठातील कर्तव्ये सांभाळून ओशोंनी समांतरपणे आचार्य रजनीश म्हणून भारतभर प्रवास करून समाजवाद आणि महात्मा गांधी यांचे परीक्षण करणारी व्याख्याने दिली. समाजवादाने केवळ दारिद्र्याचे समाजीकरण होईल आणि गांधी हे दारिद्र्याची पूजा करणारे आत्मपीडक प्रतिक्रियावादी आहेत, असे मत ओशो मांडू लागले.
मागासलेपणातून बाहेर पडण्यासाठी भारताला भांडवलवाद, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसंख्या नियंत्रणाची गरज आहे, असे ओशोंचे मत होते. पारंपरिक भारतीय धर्म मृतवत आहेत, त्यांच्यात पोकळ धर्मकांडे आहेत, अनुयायांचे ते शोषण करतात, अशी जहरी टीका ओशो करू लागले. अशा वक्तव्यांमुळे ते वादग्रस्त ठरले, मात्र ओशोंना काही निष्ठावान अनुयायीही मिळाले. अशा अनुयायांमध्ये बरेच श्रीमंत व्यापारी आणि उद्योगपती होते. अशा अनुयायांनी देणग्या देऊन ओशोंकडून आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि दैनंदिन जीवनासाठी सल्ले घेण्यास सुरुवात केली आणि हळूहळू हे लोण देशभर पसरले.
ओशोंची तत्व, चिंतने अनेकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या त्यांच्या व्याख्यानांमध्ये आहेत. ह्या व्याख्यानांमध्ये विनोदही असत. एखाद्या गोष्टीवर त्यांनी दिलेला भर कायम तसाच राहिला असे नाही; विरोधाभास आणि विसंगत्यांमध्ये रमणाऱ्या ओशोंचा उपदेश त्यामुळेच सारांशित करण्यास अवघड आहे. बुद्धत्व पावलेल्या व्यक्तींच्या पारंपरिक वर्तनापेक्षा ओशोंचे वर्तन अतिशय वेगळे होते. त्यांची सुरुवातीची व्याख्याने तर विनोदासाठी आणि काहीही गंभीरपणे न घेण्यासाठी लोकप्रिय झाली.
असे सर्व वर्तन, मग ते लहरी आणि पचण्यास अवघड असले तरी लोकांना मनापलीकडे नेऊन रूपांतरित करण्यासाठीचे एक तंत्र समजले गेले. ओशो यांनी अनेक बुद्ध पुरूषांवर प्रवचन दिले गौतम बुद्ध, लाओत्से, कबीर, रामकृष्ण परमहंस, अष्टावक्र, महावीर, मीराबाई, कृष्ण हे प्रमुख होते. त्यांची भाषा शैली आणि तर्क करण्याची पद्धत प्रभावशाली होती. त्यांचे प्रवचन ऐकणारे त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होत होते. एका प्रमुख पत्रकाने भारताला प्रभावित करणाऱ्या दहा महान पुरुषांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला आहे.
जैन धर्म, हिंदू धर्म, हसिदी मत, तंत्र मार्ग, ताओ मत, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म अशा प्रमुख आध्यात्मिक परंपरांवर, विविध पौर्वात्य आणि पाश्चिमात्य रहस्यवाद्यांवर आणि उपनिषदांसारख्या धार्मिक पवित्र ग्रंथांवर तसेच गुरू ग्रंथ साहिबवर ओशोंनी भाष्य केले. लुईस कार्टर या समाजशास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार हिंदू अद्वैत सिद्धांतात ओशोंच्या कल्पनांचा उगम आहे.
ओशोंचे समकालीन असणाऱ्या जिद्दू कृष्णमूर्तींनी ओशोमताशी सहमती दर्शविलेली नसली, तरी दोघांच्या उपदेशांमध्ये स्पष्ट साम्य आहे. अनेक पाश्चात्त्य कल्पनांचाही ओशोंनी वापर केला. विरोधांचे ऐक्य ही त्यांची कल्पना हेराक्लिटसची आठवण करून देते, तर मानवाचे यंत्र म्हणून त्यांनी केलेले वर्णन सिग्मंड फ्राईड आणि गुर्जेफ यांच्यासारखे आहे.
पारंपरिक संकेतांच्या पलीकडे जाणार्या नवमानवाची त्यांची कल्पना नित्शेच्या बियॉंड गुड अन्ड ईव्हिलची आठवण अधोरेखित करते. लैंगिक मुक्ततेवरील त्यांचे विचार डी. एच. लॉरेन्ससशी तुलना करण्याजोगे आहेत, तर गतिशील ध्यानपद्धती विल्हेल्म राइखच्या पद्धतीवर आधारलेली आहे. शरीर आणि मन यांच्यामध्ये जमा झालेल्या तणावाचा निचरा करून विचाररहित ध्यानाचा अनुभव घेता येईल, अशा सूक्ष्म ध्यानपद्धतीचे दान त्यांनी जगाला दिले.
हे ही वाचा: पाकिस्तानमध्ये नवा इतिहास रचणाऱ्या आयशा मलिक (Ayesha Malik) नक्की आहेत तरी कोण?
वैयक्तिक पातळीवर सत्याच्या शोध घेण्यापासून ते ज्वलंत सामाजिक प्रश्नांपर्यंत ओशो यांची नवी विचारप्रणाली आज जग ताडून पाहत आहे. धर्म, अध्यात्म, तत्त्वज्ञानावर त्यांनी अधिकारवाणीने आपली भूमिका ठामपणे मांडली. ओशो यांच्या प्रत्येक विचारामध्ये एक नवे तत्त्वज्ञान अखंड प्रवाहासारखे वाहत राहिले आहे.
जेव्हा वाणी मौन पाळते, तेव्हा मन बोलायला लागते. जेव्हा मन मौन धारण करते तेव्हा बुद्धी बोलायला लागते, जेव्हा बुद्धी मौन पाळते तेव्हा आत्मा बोलू लागतो आणि आत्मा मौन पाळतो तेव्हा परमात्म्याशी संवाद सुरू होतो. अशी परमात्मा तथा स्वत्वाच्या दर्शनाची व्याख्या ओशो यांनी मांडली.
सम्यक संन्यास संकल्पनेचे नवनिर्माण्, बुद्धांचे ध्यान, ताओ उपनिषदाचा अन्वयार्थ, गीतेचा सामाजिक सार, महावीरांचे तत्त्वज्ञान, कृष्णाची बासरी, कबीराचा विद्रोह आणि मीराचे घुंगरू, बायबलची भूमिका आणि कुराणचे पावित्र्य अशा सर्व प्रकारच्या विचारधारांवर ओशोंनी प्रभावी विचार मांडले. इतकेच नव्हे तर सर्व धर्मातल्या पलायनवादी संन्यासाला ओशोंनी कडाडून विरोधही केला.
स्वविवेक जागृत ठेवून कोणत्याही विचारांचा स्वीकार करावा. स्वअस्तित्वाशिवाय या जगात कोणताच ईश्वर नाही. या घडीला आपण आहोत, हेच जीवन. सत्य हे स्वत:च्या अंतरी असते, शून्यात जगणे हाच सत्याचा मार्ग!
कुठल्याही क्षणी मृत्यूला कवटाळायला जो समर्थ आहे, त्याला नवजीवन प्राप्ती होते. कोणाच्या आदेशाने पोहण्यापेक्षा वाहत जाऊन वास्तव जीवनाचा अनुभव घ्यावा, असे विचार ओशो यांनी दिलेल्या प्रवचनांमधून आढळतात. आजही सुमारे सहाशे ग्रंथ आणि नऊ हजार तासांची ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात त्यांची वैचारिक संपदा उपलब्ध आहे.
हे सुद्धा वाचा: डोकं चक्रावून टाकणारे जगातील ५ विरोधाभास! बघा तुम्हाला काही सुचतंय का?
कोरोना महामारीचा भयानक परिणाम! भारताच्या शेजारचा ‘हा’ देश झाला आहे कर्जबाजारी!
आज ओशो (Osho) यांच्या तत्त्वज्ञानावर देश-विदेशातील युवक संशोधन करीत आहेत. त्यांच्या विचारसरणीचा अभ्यास करून बऱ्या-वाईट बाबींवर स्वत:चे विचार आत्मविश्वासाने मांडत आहेत. “मी मांडलेल्या विचारांचा अंधपणे स्वीकार करणारा, माझा साधक कधीच होऊ शकत नाही.” इतक्या टोकाची निखळ भूमिका ओशो यांची असायची, त्यामुळे त्यांच्या तत्वांवर, विचारांवर संशोधन करणारया विद्यार्थ्यांना याचे भान कायम असते.
– अनुराधा कदम