Home » मंदिर एक, रहस्य अनेक

मंदिर एक, रहस्य अनेक

by Team Gajawaja
0 comment
Temple
Share

इजिप्तची ओळख पिरॅमिडसाठी आहे.  इजिप्तच्या वाळवंटी भागात  उभारण्यात आलेली ही पिरॅमिड एक मोठं रहस्यच मानलं गेलं आहे.  हजारो वर्षापूर्वी इजिप्तवर राज्य करणा-या राज्यकर्त्यांनी ही पिरॅमिड बांधली.  हजारो वर्षापूर्वीच्या बांधकामाचं अजूनही कौतुक होतं.  त्यातील निवडक पिरॅमिडमध्ये शोध घेतला जात आहे, मात्र अद्यापही या पिरॅमिडचा बराचसा भाग हा रहस्यमयी मानला जातो. (Temple)

आता मात्र इजिप्तची ओळख बदलेल असा शोध लागला आहे.  या पिरॅमिडसारखीच रहस्यमय अशी मंदिरे, आणि प्रचंड मोठा असा खजिना सापडला आहे.  हा खजिना अत्यंत जुना असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि सोन्या, चांदीची नाणी, भांडी, तसेच मौल्यवान रत्नेही सापडली आहेत.  इजिप्तच्या भूमध्य सागरी किनार्‍याजवळील कालव्याचा शोध घेत असताना हा सर्व खजिना शोधकर्त्यांच्या हाती लागला. हजारो वर्ष पाण्याखाली राहिलेली  या भागातील देव अमून आणि देवी एफ्रोडाईट यांची ही मंदिरे (Temple) आहेत. 

विशेष म्हणजे, ही मंदिरे, खजिन्यांनी भरलेली आहेत.  इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकाच्या मध्यात या भागात मोठा प्रलय आल्याची नोंद आहे.  त्सुनामी सारखी ही घटना असावी.  यामुळे या भागातील संस्कृती काळाच्या गुहेत दबली गेली.  त्यात या मंदिरांचाही समावेश होता.  युरोपियन इन्स्टिट्यूट फॉर अंडरवॉटर आर्किओलॉजीच्या पुढाकारानं आता त्यांचा शोध घेण्यात आला आहे.  हजारो वर्षापूर्वी इजिप्तमध्ये अमून आणि एफ्रोडाईट यांची पूजा होत असल्याची नोंद आहे.  प्राचीन इजिप्शियन देवता अत्यंत सामर्थ्यशाली समजल्या जायच्या. राजा निवडण्याचा अधिकार मंदिरांना (Temple) होता.  या मंदिरातच (Temple) राजाच्या खजिन्याचा काही भाग सुरक्षित ठेवला जायचा.  त्याच खजिन्याचा आता हजारो वर्षानंतर शोध लागला आहे.  एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेला खजिना आणि पुरातन शस्त्रे बघून शोधकर्ताही आश्चर्यचकीत झाले आहेत.  

द गल्फ ऑफ अबुकीर हा इजिप्तमधील भाग अबू किर गल्फ म्हणूनही प्रसिद्ध आहे.  थॉनिस-हेराक्लियन या प्राचीन बंदराचा भाग असलेल्या भागात हा शोध लागला आहे. अत्यंत मोठा, प्रलयकारी भूकंप किंवा समुद्राच्या लाटांनी नाईल डेल्टामध्ये जमीन वाहून नेली येथील मोठा रहिवासी भाग पाण्याखाली गेला. त्यातच या प्रमुख मंदिराचा समावेश होता, असा निष्कर्ष आता काढण्यात आला आहे. या मंदिराचा (Temple) शोध लागला, सोबत पुरातत्वशास्त्रज्ञांना मोठा खजिना आणि प्राचिन काळातील अनेक रहस्यमयी वस्तूही सापडल्या आहेत. पाण्याखाली गेलेल्या यापाचव्या शतकातील लाकडी खांब आणि अन्य भक्कम संरचना देखील आढळल्या आहेत. या सर्व पथकाचे नेतृत्व फ्रेंच पुरातत्वशास्त्रज्ञ फ्रँक गोडिओ करीत आहेत. त्यांनी हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शोध असल्याचे जाहीर केले आहे.  शिवाय एका मोठ्या रहस्यचा उलगडा करण्यात जेवढी उत्सुकता असते, तशीच या मंदिराचा शोध घेतांनाही उत्सुकता वाढत असल्याची माहीती गोडिओ यांनी दिली आहे.  या मुख्य मंदिराच्या पूर्वेला, पुरातत्वशास्त्रज्ञांना ऍफ्रोडाइटला समर्पित संरचनाही सापडली आहे.  ऍफ्रोडाइटला इजिप्तमध्ये प्रेमाची देवी म्हटले जाते.  यामध्ये कांस्य आणि सिरॅमिक वस्तूंसह अनेक कलाकृती देखील सापडल्या आहेत.  पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते इजिप्तवर राज्य करणा-या तत्कालीन साते राजघराण्याला देवासाठी स्वतंत्र खजिना उभा करण्याचा अधिकार होता.  देवाच्या खजिन्याचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र सैन्य असल्याचाही उल्लेख आढळला आहे.  

===========

हे देखील वाचा : गणपतीचे एकमेव मंदिर जेथे व्यक्तीरुपी गणेशाची होते पूजा

===========

हा सापडलेला हजारो वर्षापूर्वीचा खजिना अनेक मौल्यवान वस्तूंनी युक्त आहे.  मुळात एवढ्या हजारो वर्षापूर्वी मानवी संस्कृती किती संपन्न होती, याचा पुरावाच यातून मिळाल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.  यामध्ये चांदी, सोन्याचे दागिने आणि हिरे, माणकांपासून बनवलेल्या वस्तूंचा समावेश होता. सुगंधी द्रव्य आणि औषधे ठेवण्यासाठी विशिष्ट धातुंच्या अत्यंत नाजूक आणि लहान अशा कुप्या सापडल्या आहेत.  या कुप्या कुठल्याही मशिनशिवाय करता येणार नाहीत, एवढ्या नाजूक आणि त्यावरील कलाकुसर बारीक असल्याची माहिती आहे. यावरुन या भागात जगभरातील व्यापारी मोठ्या संख्येनं येत असल्याचीही माहिती मिळाली आहे. सध्या हा सर्व खजिना पाण्याखाली आहे.  तो बाहेर कसा काढावा हा प्रश्न जसा संशोधकांना पडला आहे, तसेच खजिना सापडल्यापासून त्याचे संरक्षण कसे करावे हा प्रश्नही मोठा आहे.  मात्र या एका शोधानंतर मानवी संस्कृतीचे अनेक समृद्ध पुरावे मिळाले आहेत.  

सई बने 

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.