Home » America : अमेरिका यातही नंबर वन !

America : अमेरिका यातही नंबर वन !

by Team Gajawaja
0 comment
America
Share

अमेरिका हे नाव काढलं की अनेकांचे डोळे चमकतात. रोज लाखो लोक या देशामध्ये जाण्यासाठी धडपडत असतात. अमेरिकेत राहायला जाण्यासाठी दिवसाला लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल होतात. पण याच अमेरिकेत बेघर लोकांची संख्या सर्वाधिक झाल्याचा धक्कादायक अहवाल आला आहे. अमेरिकेतील घरांच्या भाड्यात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे अनेकांनी अशा महागड्या घरात राहण्यापेक्षा रस्त्यावर राहणे पसंत केले आहे. अमेरिकेत बेघर लोकांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार, 2024 मध्ये बेघर नगरिकांची संख्या 18 टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये एकाच ठिकाणी सतत येणा-या नैसर्गिक आपत्ती, घरांच्या वाढत्या किंमती आणि कोरोना महामारीचा बसलेला फटका या सर्व कारणांचा समावेश आहे. त्यातही अमेरिकेत स्थलांतरितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, या स्थलांतरितांचाही भार वाढल्यानं येथील घरांच्या भाड्यातही मोठी वाढ झाली आहे. परिणामी अमेरिकेतील बेघरांच्या संख्येने जगात वरचा क्रमांक पटकवाला आहे. (America)

यूएस डिपार्टमेंट ऑफ हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंटच्या एका अहवालानं शक्तीमान अशा अमेरिकेचं वास्तव जगासमोर आणलं आहे. या अहवालानुसार, 2023 पेक्षा 2024 मधील बेघर नागरिकांची संख्या 18.1 टक्क्यांनी वाढली आहे. अहवालानुसार सध्या अमेरिकेत 7,71,480 नागरिक बेघर आहेत. या अहवालात इलिनॉय, हवाई आणि इतर राज्यांमध्ये बेघर नागरिकांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. इलिनॉय प्रांतामध्ये बेघर लोकांची संख्या 116.2 टक्क्यांनी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. शिकागो परिसरातही 91 टक्के वाढ झाली आहे. यामध्ये स्थलांतरितांची संख्या अधिक आहे. याच शिकागोमधील आपत्कालीन आश्रयस्थानांमध्ये 13,600 हून अधिक स्थलांतरित आणि निर्वासित आश्रयाला आले आहेत. शिकागोपाठोपाठ हवाईमध्येही बेघर नागरिकांची संख्या 87 टक्क्यांनी वाढली आहे. मॅसॅच्युसेट्समध्ये 53.4 टक्के आणि न्यूयॉर्कमध्ये 53.1 टक्के बेघर नागरिक वाढले आहेत. न्यूयॉर्क (New York) सारख्या शहरी भागात घरांचे दर गगनाला भिडले आहेत. (International News)

ज्यांना घर भाड्यांने हवे असेल त्यांनीही महिन्याच्या भाड्याचे दर परवडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच न्यूयॉर्क सारख्या शहरात मोठ्या प्रमाणात बेघर रस्त्यावर रहात असल्याचे पहायला मिळते. अमेरिकेतील कॅलिफोर्निया सारख्या भागातही बेघर नागरिकांची संख्या वाढली आहे. या भागात सातत्यानं येणा-या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेकांनी आपली घरे गमावली आहेत. आत नव्यानं घर उभे करणे त्यांना शक्य नसल्यामुळे त्यांना बेघर व्हावे लागले आहे. ही परिस्थिती एवढी काळजीची आहे की, एकट्या कॅलिफोर्नियात अमेरिकेतील बेघर नागरिकांमधील अर्धेअधिक नागरिक रहात आहेत. येथे 187,084 नागरिक बेघर आहेत. याशिवाय लॉस एंजेलिससारख्या शहरातही बेघर नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. याचे कारण म्हणजे हे शहर महागडे म्हणून ओळखले जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या शहरामध्ये बेघर नागरिकांची संख्या 5 टक्क्यांनी वाढली आहे. (America)

यातील बरेचसे बेघर रस्त्यावरच आपला दिवस काढत आहेत. अनेकजण ऑफीसमध्ये किंवा गाडीमध्येही राहणे पसंद करतात. या सर्व बेघरांना नॅशनल लो इन्कम हाऊसिंग कोलिशनतर्फे घर देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. अमेरिकेतील वाढत्या बेघरांच्या संख्येबाबत अनेक सामाजिक संस्था पुढे येत असून काहींनी आपला अहवालही प्रसिद्ध केला आहे. त्यातीलच एका अहवालानुसार बेघरांच्या संख्येत सर्वाधिक वाढ इलिनॉय, हवाई आणि इतर राज्यांमध्ये झाली आहे. या ठिकाणी घरांच्या किंमती आभाळाला भिडल्यासारख्या आहेत. (International News)

=======

हे देखील वाचा : America : ट्रम्पना हवा आहे बर्फाचा देश !

Bashar Al-Assad : बेशुमार संपत्तीसाठी अस्मा यांचा घटस्फोटाचा अर्ज

=======

शिवाय येथे स्थलांतरितांचे प्रमाण अचानक वाढले असल्यामुळे रहाण्यासाठी घर मिळणे कठीण झाले आहे. यासोबत अमेरिकेच्या हवाई शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात बेघरांची संख्या वाढली आहे. येथील बेघरांच्या संख्येत 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या सर्व नागरिकांना घरे उपलब्ध करुन देणे हे सरकारपुढील आव्हान ठरले आहे. अमेरिकेची छबी जगभर शक्तीमान देश अशीच आहे. मात्र या देशात पर्यटनासाठी आलेल्यांना रस्त्यावर आडोसा करुन रहात असलेल्या नागरिकांचे वास्तव दिसल्यावर त्यांची प्रतिक्रिया मोठी विलक्षण असते. या सर्वांचा अमेरिकेच्या प्रतिष्ठेला धोका लागत आहे. त्यामुळे अमेरिकतील बेघरांना घर द्यायचे आव्हान येथील प्रशासनासमोर आहे. त्यासोबत याला कारणीभूत असलेल्या स्थलांतरितांना रोखण्याचेही आव्हान त्यांच्या समोर आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.