इराणमध्ये विकसित होत असलेला अणुप्रकल्प हा इस्रायलच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे, असे सांगून इस्रायलनं इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इराणच्या संरक्षण दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञ मृत्यूमुखी पडले आहेत. 4 अणु क्षेपणास्त्रे आणि 2 क्षेपणास्त्र तळांवरही हल्ले झाले. इराणकडे 15 अणुबॉम्ब बनवण्याइतके युरेनियम असल्याचा आरोप करीत इस्रायलने 4 मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले. या हल्ल्याला इराणनंही जोरदार प्रतिउत्तर देत इस्रायलची राजधानी तेलअवीवमध्ये मोठे हल्ले केले आहेत. या दोन देशांमधील या युद्धामुळे संपूर्ण मिडलइस्टमध्ये अणुयुद्धाची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याच चिंतेला जोड म्हणून इराणमधील नतांज या अणुसुविधा केंद्रातून अणु किरणोत्सर्ग होत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं केला आहे. एकीकडे इस्रायल-इऱाण एकमेकांवर क्षेपणास्त्र, ड्रोण यांचा मारा करत असतांना नतांजमधून होणारा किरणोत्सर्ग हा जागतिक चिंतेचा विषय ठरला आहे. कारण आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या अहवालानुसार या केंद्रावर 9 अणुबॉम्ब बनवण्यासाठी पुरेसे युरेनियम असल्याची माहिती आहे. (Natanz Center)
इस्रायल-इराण हे दोन्ही देश स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी लढत असतांना सर्वसामान्य नागरिकांना मात्र अणुयुद्धाला तयार होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण इराणच्या नतांज अणु केंद्रातून किरणोत्सर्ग होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. इस्रायलनं या केंद्रावर हल्ला केल्यावर इराणनं नतांज केंद्राला कुठलाही धोका नसल्याचे जाहीर केले होते. मात्र आता आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने संयुक्त राष्ट्रांना नतांजमधून रेडिएशन गळती होत असल्याचा अहवाल दिला आहे. ही रेडिएशन गळती सध्यातरी अंतर्गत आहे, आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असेही आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं सांगितलं आहे. मात्र इस्रायलनं पुन्हा नतांजमध्ये हल्ले केल्याचे सांगण्यात येत आहे. नतांजवर नव्यानं झालेल्या या हल्ल्यामुळे या अणुकेंद्राची सुरक्षा धोक्यात आली आहे. इराणकडून नतांजपासून कुठलाही धोका नसल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी इराणचा हा दावा खोटा असल्याचे जाहीरपणे सांगितल्यामुळे खळबळ उडाली आहे. (International News)
संयुक्त राष्ट्रांना दिलेल्या माहितीमध्ये नतांज अणुऊर्जा प्रकल्पामध्ये होत असलेली अंतर्गत रेडिएशन गळती ही या संपूर्ण क्षेत्रासाठी भविष्यात धोकादायक ठरण्याची शक्यताही ग्रोसी यांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं दिलेल्या अहवालात नमूद कऱण्यात आले आहे की, इस्रायलने इराणच्या नतांज अणुसुविधा केंद्रावर केलेल्या हल्ल्यात त्याचा वरचा भाग उद्ध्वस्त झाला आहे. या हल्ल्यामुळे जमिनीखाली साठवलेल्या युरेनियम समृद्धीकरण सुविधेचे नुकसान झाले असण्याची शक्यता कमी होती. पण हल्ल्यानंतर वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. शिवाय सेंट्रीफ्यूजवर परिणाम झाला असून तेच गळतीचे कारण असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. हा अहवाल जाहीर झाल्यावर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. कारण या अहवालानुसार ही गळती थांबवण्यासाठी योग्यवेळी कारवाई झाली नाही, तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले तर इराणला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असा गंभीर इशाराही यात देण्यात आला आहे. (Natanz Center)
नतांझ हे इराणच्या इस्फहान प्रांतात असलेले एक अत्यंत संवेदनशील आणि अत्याधुनिक अणुसंवर्धन केंद्र आहे. इराणच्या संपूर्ण अणुकार्यक्रमाचे सर्वात महत्वाचे केंद्र म्हणून नतांजचे नाव घेतले जाते. गेल्या अनेक वर्षापासून आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था, नतांजमधील युरेनियमच्या साठ्यावर लक्ष ठेऊन आहे. त्यांच्यासाठी येथील युरेनियमचा वाढता साठा कायम चिंतेचा विषय ठरला आहे. इराणची राजधानी तेहरानपासून सुमारे 250 किलोमीटर दक्षिणेस काशान आणि इस्फहान शहरांमधील वाळवंटी भागात हा अणुऊर्जा प्रकल्प आहे. इराणनं जगापासून लपवून हा प्रकल्प सुरु केला तरी, 2002 मध्ये उपग्रह प्रतिमांद्वारे त्याचा शोध जगाला लागला. याच अणुसंवर्धन केंद्राबाबत अमेरिकेलाही चिंता होती. येथे तब्बल 9 अणुबॉम्ब तयार करण्याची क्षमता असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं दिल्यावर इस्रायलनं चिंता व्यक्त केली होती. (International News)
===========
हे देखील वाचा : Israel : इस्रायलचा पॅटर्न आणि मोसादचे प्लॅनिंग !
इराणचा इरादा जाणूनच इस्रायलनं येथे हल्ला केला, आणि त्याच या अणुसंवर्धन केंद्रात गळती सुरु झाली आहे. लक्षात घ्यायला पाहिजे की, अणुबॉम्ब बनवण्यासाठी लागणा-या युरेनियमपैकी बहुतांश युरेनियम इराणकडे तयार होते. नतांजमध्ये पुढच्या काही दिवसात अणुबॉम्ब तयार झाले असते, अशावेळीच नतांजवर हल्ला झाला आहे. हवाई हल्ल्यांपासून आणि उपग्रहाच्या नजरेपासून सुरक्षित राहण्यासाठी नतांज अणुऊर्जा केंद्रातील बहुतेक उपक्रम भूमिगत बोगदे आणि बंकरमध्ये होतात. हे केंद्र नष्ट करण्यासाठी, अनेक शेकडो टन बॉम्ब टाकावे लागतील. त्यानंतरही भूदलाला स्वतंत्र ऑपरेशन सुरू करावे लागेल. अशा परिस्थितीत इस्रायलनं जो हल्ला केला तो एवढा जोरदार नसल्यानं नतांज वाचल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता इराणनं केलेला दावा खोटा असल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं सांगितल्यानं अणुयुद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत. (Natanz Center)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics