Home » कतारच नाही तर शेजारील देशांमध्येही पर्यटकांचा पूर…

कतारच नाही तर शेजारील देशांमध्येही पर्यटकांचा पूर…

by Team Gajawaja
0 comment
FIFA World Cup
Share

कतार हा छोटासा देश आता फुटबॉलमय झाला आहे.  2010 मध्ये, कतारने 2022, FIFA विश्वचषक स्पर्धेच्या (FIFA World Cup) यजमानपदाचा अधिकार जिंकला आणि तेव्हापासून कतारमध्ये या विश्वचषकासाठी अनोखी तयारी सुरु झाली. आधीच देखण्या असलेल्या अवघ्या कतारचं रुप त्यामुळे बदललं. विश्वचषकाच्या स्पर्धेत यजमानपदासाठी निवड झालेला कतारमध्ये पूर्वेतील पहिला देश बनला. यामुळे कतारमध्ये  आर्थिक गुंतवणूकीचा रोख वाढला.  त्यात विश्वचषकाची जादू….परिणामी फक्त कतारच नाही तर शेजारील देशांमध्येही पर्यटकांचा पूर आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.  कतारमध्ये फूटबॉल विश्वचषकाचा महिमा बघता अनेक पंचतारांकित हॉटेलची निर्मिती करण्यात आली. आता ही हॉटेल फूल झाल्यावर शेजारील देशांमध्ये पर्यटक येत असून विमानाद्वारे अवघ्या एक-दोन तासांत कतार गाठत आहेत. पर्यटकांची ही वाढती संख्या पाहता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येथे भव्य अशी तयारी करण्यात येत आहे. 

कतार सध्या 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत 2022 फिफा विश्वचषकाचे(FIFA World Cup) यजमानपद भूषवत आहे. असे करणारा तो पहिला अरब आणि मुस्लिम बहुल देश बनला आहे.   2002 च्या जपान आणि दक्षिण कोरियामध्ये झालेल्या फिफा विश्वचषकानंतर यजमानपद मिळवणारा तिसरा आशियाई देश म्हणून कतारकडे बघण्यात येत आहे.  कतारच्या या फुटबॉल विश्वचषक आयोजनांमुळे पर्यटकांची प्रचंड संख्या या देशाकडे आकर्षित झाली आहे. कतारच नाही तर शेजारील देशांचीही आर्थिक उलाढाल वाढली आहे. या देशांमध्ये थोडीथोडकी नाही तर पर्यटकांच्या संख्येत 200 टक्के वाढ झाली आहे.  कतारचं बदललेलं रुप आणि आधुनिक सुविधा पहाता 2030 पर्यंत दरवर्षी या देशात 6 दशलक्ष पर्यटक येतील असा अंदाज आहे.  यामुळे वाळवंटी देश म्हणल्या जाणा-या कतारमध्ये आर्थिक क्रांती होणार आहे.  

विश्वचषकाच्या माध्यमातून कट्टरतावादी अशी प्रतिमा बदलण्याचा कतारचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.  20 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या फिफा विश्वचषकाने(FIFA World Cup) निम्मा टप्पा ओलांडला आहे. या स्पर्धेचे उदघाटन भव्य स्वरुपात करुन कतारनं खेळाडूंची मनं जिंकली.  सुरुवातीला कतारमध्ये असलेल्या कडक नियमांची तक्रार करण्यात येत होती.  मात्र कतारनं दिलेल्या सुविधा आणि तेथील आधुनिक रुप पहाता या सर्व गोष्टी दुय्यम ठरवल्या गेल्या.  आता अंतिम 16 संघांची निवड करण्यात आली आहे.  त्यामुळे या सर्व देशातील फुटबॉल प्रेमी कतारमध्ये मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. विश्वचषकाचा अंतिम सामना 18 डिसेंबरला होणार आहे.  या स्पर्धेच्या माध्यमातून कतारला 1.5 दशलक्ष परदेशी पर्यटकांची अपेक्षा होती.  मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने कतारमधील सर्वच पंचतारांकीत हॉटेल फुल झाली आहेत.  त्यामुळे कतारच्या आजूबाजूच्या आखाती देशांतील हॉटंलना पर्यटकांनी पसंती दिली आहे. 

आता कतारने परदेशी पर्यटकांसाठी व्हिसाची अट रद्द केली आहे. विश्वचषकाच्या(FIFA World Cup) 48 सामन्यांनंतरही एकही गोंधळ किंवा मारामारी झाली नाही, यातून कतारनं एकूण व्यवस्था किती चोख ठेवली आहे, याचे प्रत्यंतर येते.  ही गोष्टच फुटबॉल प्रेमींच्या पचनी पडली आहे.  सुरक्षित असे वातावरण तयार करण्यास कतार यशस्वी झाले आहे.  त्यामुळे सुरुवातीला कतारमधील कठोर नियमांची जी भीती होती ती कमी झाली आणि जगभरातील फुटबॉल प्रेमींचा ओघ कतारमध्ये सुरु झाला.  कतारच्या हॉटेल्समध्ये 45 हजार खोल्या उपलब्ध आहेत.  तिथे किमान 5 लाख पर्यटक राहू शकतात.  त्यासोबत शेजारच्या दुबई, रियाध, ओमान, मस्कत या देशांनाही पर्यटकांनी पसंती दिली आहे.  हे पर्यटक तिथून  60 ते 90 मिनिटांच्या शटल फ्लाइटने कतारला पोहोचतात आणि सामना पाहिल्यानंतर परततात.  फिफामुळे अरब देशांमधून ओमानला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 200% वाढ झाली आहे आणि ही वाढ पुढची दहा वर्ष तरी कायम राहणार आहे, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.  

==========

हे देखील वाचा : ‘या’ देशांमध्ये एक्झिट पोल्सला बंदी, मीडिया ही निकालापूर्वी काढू शकत नाही अनुमान

=========

कतारमध्ये वास्तव्य करणा-या नागरिकांनी या गर्दीला पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.  येवढी गर्दी झाल्यावर गोंधळ निर्माण होईल असे वाटत होते, पण सर्व सुरळीत चालू असून कुठलाही गोंधळ, गडबड झाली नाही. याचे सर्व श्रेय चोख पोलीस बंदोबस्ताला दिला जातोय.  तसेच व्यवस्थापन समितीलाही यश मिळालं आहे.  ही विश्वचषक स्पर्धा सुरू असेपर्यंत सर्व कार्यालये फक्त 4 तास सुरू रहाणार आहेत.  80% कर्मचारी घरून काम करत आहेत त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी करण्यास प्रशासन यशस्वी झाले आहे. याशिवाय शैक्षणिक सत्र महिनाभराने वाढवण्यात आले आहे.

फुटबॉल सामने वगळता सर्व कतारच पर्यटकांसाठी आवडतं असं स्थळ आहे.  इथे खरेदीसाठी जेवढी गर्दी होते, तेवढी कुठल्याही देशात होत नसावी.  कारण कतारमधील मॉल जगभरातील मोठ्या मॉल पैकी आहेत. मशेरेब संग्रहालये,  कतारचे राष्ट्रीय संग्रहालय, कटारा सांस्कृतिक गाव, रडवानी हाऊस, फिल्म सिटी,  बार्झन टॉवर्स, फाल्कन सौक, अल खोर टॉवर, लुसेल शहर, बेडूइन कॅम्प, लगुना मॉल,  कतार मॉल, सौक अल वक्रा आदी अनेक पर्यटन स्थळे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.  कतारमधील ही पर्यटकांची गर्दी नव्या वर्षाच्या स्वागताला आणखी वाढणार आहे.  त्यासाठी तेथील प्रशासनही विशेष सुविधा देण्याच्या तयारीत व्यस्त आहे.  

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.