कोरोना महामारीची आठवणही कोणीही काढत नाही. या रोगानं लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या फे-यात आलेल्या अनेक कुटुंब उदधवस्त झाले. मात्र याच कोरोनामुळं एक लग्न होत आहे, असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल. बरं हे लग्न कोणा साध्यासुध्या माणसाचे नाही, तर चक्क एका राजकुमारीचं आहे. कोरोना काळात तंत्र मंत्र करुन ताबीज देणा-या एका तांत्रिकाच्या प्रेमात एक राजकुमारी पडली. आता ही राजकुमारी आणि तांत्रिक यांचा विवाह होत आहे. या लग्नाची चर्चा सर्वत्र चालू आहे. ही राजकुमारी आहे, नॉर्वे या देशाची. राजकुमारी मार्था आणि तांत्रिक वेरेट हे एकमेकांच्या प्रेमात होते. कोरोना महामारीमुळे या दोघांची ओळख झाली. ताबिज देणा-या या तांत्रिकानं आपण मृत्यूवर मात करुन पुन्हा भुलोकावर आल्याचा दावा केला आहे. त्याच्या प्रेमात पडलेल्या राजकुमारी मार्थानं आता सर्वांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत वेरेटबरोबर लग्न करण्याचा निश्चय केला आहे. नॉर्वेच्या एलेसंड शहरातील चर्चमध्ये या दोघांचे लग्न होत असून लग्नानंतर नॉर्वे बंदरावर मोठ्या बोटींची व्यवस्था कऱण्यात आली आहे. (Martha Louise And Guru Durek Verrett)
या बोटींवरच लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार केला जाणार आहे. अर्थातच या लग्नाबाबत अनेक चर्चा होत आहेत. मार्था यांनी हा लग्नाचा निर्णय घेतल्यावर त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले. लग्नाला झालेल्या विरोधामुळे, या लग्नाला हजर असणा-या पाहुण्यांवर अनेक बंधने आहेत. मुळात त्यांना लग्नाचा कुठलाही फोटो काढण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी लग्नाला आलेल्या पाहुण्यांचे फोन एकत्र जमा केले जाणार आहेत. तसेच सोशल मिडियावरही कुठलिही पोस्ट शेअर करायला या पाहुण्यांना मनाई करण्यात आली आहे. नॉर्वेजियन राजकुमारी मार्था आणि तांत्रिक वेरेट यांनी आपल्या लग्नाची घोषणा दोन वर्षापूर्वीच केली होती. ५२ वर्षाच्या राजकुमारी मार्था यांच्या लग्नाला उपस्थित कोण रहाणार यापेक्षा या लग्नावर बहिष्कार कोण टाकणार याची चर्चा जास्त आहे. कारण स्वीडिश राजघराण्यानं आधीच या लग्नाला आम्ही जाणार नाही, अशी घोषणा केली आहे. आता त्यांना किती राजघराणी साथ देतात, हे या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. याला कारण म्हणजे, तांत्रिक वेरेट याची प्रतिमा. (Martha Louise And Guru Durek Verrett)
ड्युरेक वेरेटला नॉर्वेजियन मीडियामध्ये एक फसवा तांत्रिक म्हणून ओळखले जाते. वेरेटची प्रतिमा खराब असल्यामुळे राजकुमारी मार्थाला आपला राजकुमारी हा किताबही सोडावा लागला आहे. या दोघांची ही लग्नाची गोष्ट एवढी गाजली आहे की आता नेटफ्लिक्स मार्थाच्या लग्नावर चक्क एक डॉक्युमेंट्री बनवणार आहे. मार्था लुईस २०१९ पासून ४९ वर्षाच्या वेरेटसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आता वेरेटसोबत लग्न झाल्यावर मार्थाला शाही जबाबदा-या सोडाव्या लागणार आहेत. नॉर्वे राजघराण्यासाठीही हा विवाह धक्कादायक आहे. कारण यापुढे राजकुमारी मार्था ही केवळ मार्था म्हणून ओळखली जाणार आहे. राजकुमारी मार्था राजा हॅराल्डची सर्वात मोठी मुलगी आहे. त्याचा धाकटा भाऊ, क्राउन प्रिन्स हाकोन, त्यांच्या वडिलांच्या जागी नॉर्वेचा राजा होणार आहे. राजकुमारी मार्थाचा हा दुसरा विवाह आहे. २०१७ मध्ये मार्थाने तिचा पहिला पती एरी बेन याला घटस्फोट दिला. बेनपासून मार्थाला ३ मुले आहेत. घटस्फोटानंतर मार्थाचा परिचय वेरेट बरोबर झाला. (Martha Louise And Guru Durek Verrett)
तांत्रिक असलेल्या वेरेटला खरी प्रसिद्धी मिळाली ती कोरोना काळात. कोरोना रोगापासून आपले ताबीज बचाव करु शकतात, असा त्याचा दावा होता. वेरेटचा ताबीज ऑनलाइन $२२२ मध्ये विकले गेल्याची नोंद आहे. व्हॅनिटी फेअर मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत वेरेटनं आपण २८ व्या वर्षी मृत्युलोकात जाऊन पुन्हा भुलोकात आल्याचा दावा केला आहे. शिवाय आपण नॉर्वेजियन राजकन्येशी लग्न करणार हे बालपणापासून माहित असल्याचेही त्याचे म्हणणे आहे. नॉर्वेच्या सोशल मिडियात या त्याच्या दाव्याची खिल्ली उडवण्यात आली आहे. तसेच त्याला फसवा तांत्रिक असेही बोलले जाते. राजकुमारी मार्थाच्या प्रेमात तो मागच्या जन्मीही असल्याचे सांगतो. इजिप्तमध्ये ती माझी राणी होती आणि मी फारो होतो, असे वेरेट सांगत असला तरी त्याला नॉर्वेमध्ये सर्वाधिक विरोध होत आहे. (Martha Louise And Guru Durek Verrett)
======
हे देखील वाचा : कोरोना मेड इन अमेरिका
======
वेरेटन आपल्याला भविष्यातील घटना आधीच समजतात असेही एका मुलाखतीत सांगितले होते. अमेरिकेवर झालेला ९-११ चा हल्ला आपल्याला आधीच माहित होता. पण मी ते कोणालाही सांगितले नसल्याचे वेरेट सांगतो. शिवाय कोरोना रोग येणार असल्याचेही आपल्याला माहित असल्याचा त्याचा दावा आहे. मात्र या वेरेटवर दाखल असलेल्या गुन्ह्यामुळे राजघराणे नाराज आहे. वेरेटला चोरीशी संबंधित प्रकरणांमध्ये अनेकदा अटक करण्यात आली आहे. एकदा त्याला तिकीट नसताना बसमध्ये बसल्याबद्दलही अटक झाली आहे. म्हणूनच त्याला नॉर्वेमध्ये ठग म्हणण्यात येतं. याच ठगानं आपल्या राजकुमारीसोबत लग्न करावं हे नॉर्वेच्या नागरिकांना मान्य नसलं तरी मार्था मात्र वेरेटसाठी आपल्या शाही कुटुंबालाही विसरली आहे. (Martha Louise And Guru Durek Verrett)
सई बने