उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) याचा एक फोटो जरी प्रसार माध्यमावर दिसला तरी चर्चा सुरु होते. त्यातच गेल्या आठवड्यात हे किम महाशय आपल्या आठ वर्षाच्या मुलीसह दिसले. एरवी सर्वसाधारण पालक आपल्या मुलांना फिरण्यासाठी कुठे नेतात. बागेत, पार्केमध्ये, झूमध्ये, मॉलमध्ये…एखाद्या मोठ्या पर्यटनस्थळी…पण किम जोंग यांची बातच वेगळी आहे. या हुकूमशहानं गेल्या आठवड्यात आपल्या मुलीला पहिल्यांदाच जगासमोर आणलं. किम तिला घेऊन कुठल्या बागेत किंवा झु मध्ये गेला नाही तर आपल्या मुलीला त्यानं क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केंद्रावर नेलं. किमची ही कृती साधी असली तरी जागतिक राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. हुकूमशहा म्हणून ज्याचा उल्लेख होतो, तो किम जोंग उन (Kim Jong Un) तिन मुलांचा पिता असून या तिन्ही मुलांवर त्याचे खूप प्रेम आहे. क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रावर किम ज्या मुलीला घेऊन गेला होता ती त्याची दुसरी मुलगी आहे. या फोटोतून किम जोंग उननं ही मुलगी आपली उत्तरदायी असेल असा संदेश दिला असल्याचं मानलं जात आहे. किमच्या कुटुंबातील कोणीही मिडीयासमोर येत नाही. किमची पत्नीही मोजक्यावेळी कॅमे-यासमोर येते. अशावेळी जेव्हा खुद्द किमच जाणून बूजून आपल्या मुलीला सर्वासमोर घेऊन येतो, तेव्हा त्याचा उद्देश नक्की काय याची उत्सुकता अनेकांना आहे.
गेल्या आठवड्यात किम जोंग उन (Kim Jong Un) उत्तर कोरियाच्या प्योंगयांग आंतरराष्ट्रीय विमानतळावर आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण बघण्यासाठी आला. एरवी एकटा येणारा किम यावेळी त्याच्या आठ वर्षाच्या मुलीसह आला होता. जु ए या आपल्या दुस-या मुलीचा हात धरुन किम या क्षेपणास्त्र केंद्रावर आला आणि सर्वांच्या नजरा त्याच्या मुलीवर रोखल्या गेल्या. किम जोंग उन, जु ए हिला लष्कराच्या तळावर घेऊन गेला आणि तिथून त्यांनी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण पाहिले, सोबत मुलीलाही दाखवले. या क्षेपणास्त्र प्रक्षेपणवेळी किम यांच्या मुलीसोबत त्यांची पत्नीही उपस्थित होती. उत्तर कोरियाच्या सरकारी एजन्सीनं या तिघांचा फोटो, विशेषतः किम आणि त्याची मुलगी जु ए चा फोटो सोशल मिडीयावर शेअर केल्यावर जगभरात या मुलीबाबत उत्सुकता ताणली गेली. एरवी ज्याची हुकमशहा म्हणून ओळख आहे, तो किम आपल्या मुलांसोबत कसा वागत असेल याचाही अनेकांना प्रश्न पडला. फक्त आपल्या सिंहासनाला धोका आहे, अशी शंका आली तरी पिसाळलेल्या कुत्र्यांसमोर आपल्या सख्या नातेवाईकांना सोडणा-या किमचे आपल्या मुलांसोबत कसे नाते आहे, याचीही अनेकांना उत्सुकता होती.
पण किमचे आपल्या मुलांसोबतचे नाते उघड झाल्यावर अवघ्या जगाला धक्का बसला आहे. किम जोंग उन(Kim Jong Un), त्यांची पत्नी री सोल जू आणि त्यांची मुलगी जू ए यांनी देशातील सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, ह्वासोंग -17 चे प्रक्षेपण पाहिले. या क्षणाची छायाचित्रे जाहीर झाल्यावर जू ए च्या आयुष्याबाबत चर्चा चालू झाली. तिचे आणि किमच्या इतर दोन मुलांचे आयुष्य कसे आहे, याची माहिती मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी आहे. किम आणि त्याचे सर्व कुटुंब वॉन्सन या बंदर शहरातील त्यांच्या प्रशस्त बीचसाइड व्हिलामध्ये राहते. हे कांगवॉन प्रांतात आहे. किमला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. जू ए किमची दुसरी मुलगी आहे. आणि ती त्याची अत्यंत लाडकी आहे. किमच्या आलिशान व्हिलाची तुलना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा स्थित मार-ए-लागो या अलिशान महालाबरोबर केली जाते. हा अलिशान व्हिला पूर्व उत्तर कोरियामध्ये जपानच्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर स्थित आहे. या व्हिलावर स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, सॉकर, पाण्याचे कारंजे आणि क्रीडा स्टेडियम आदी अनेक सुविधा आहेत. वॉन्सन व्यतिरिक्त किमच्या कुटुंबाकडे देशभरात अन्यही 15 असेच भव्य राजवाडे असल्याची माहिती आहे. वॉन्सनच्या राजवाड्यात जर कंटाळा किंवा काही धोका वाटल्यास हे किमचे कुटुंब या इतर 15 राजवाड्यात जातात. बरं किमचे हे सर्व महाल गुप्तरित्या एकमेकांना जोडल्याची माहिती आहे. परदेशी गुप्तचर उपग्रहांची दृष्टी टाळण्यासाठी किमचे हे महल बोगदे आणि रेल्वेच्या विस्तृत भूमिगत नेटवर्कमधून जोडले गेले आहेत. किमचे कुटुंबही अशाच प्रकारे प्रवास करत आपल्या सर्व व्हिलामध्ये फिरत असते. किमच्या या महलात मुलांसाठी खास व्यवस्था आहे. मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या आहाराकडे बघण्यासाठी खास आया आहेत. किमचे वडील, किम जोंग-उन (Kim Jong Un) हे सुद्धा किमसारखे विक्षिप्त स्वभावाचे होते. पण त्यांचे त्यांच्या कुटुंबावर प्रेम होते. किमही आपल्या वडीलांसारखाच आहे. तो बाहेर कसाही असला तरी त्याचे आपल्या मुलांवर खूप प्रेम आहे.
========
हे देखील वाचा : दोन असे देश जेथे मुस्लिम लोक राहतात पण मस्जिद उभारण्यासाठी परवानगी नाही
=======
पण किमनं आपल्या तीन मुलांपैकी दुस-या मुलीला मिडीयासमोर आणल्यामुळे यामागे अनेक अर्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत उत्तर कोरियामध्ये किम जोंग-उन च्या नंतर त्याची बहिण, किम यो-जोंग ही उत्तरदायी मानली जात होती. मात्र गेल्या काही महिन्यात आपल्या बहिणीची वाढलेली प्रसिद्धी किमच्या नजरेस आली असून बहिणीला इशारा देण्यासाठी त्यानं त्याच्या मुलीला जु-ए ला समोर आणल्याचीही चर्चा आहे. किम जोंग-उन आणि री सोल-जू यांच्या लग्नानंतर त्याच्या पत्नीचे सार्वजनिक आयुष्य संपल्यात जमा आहे. वर्षातून एखाददोन वेळा रि सोल नागरिकांसमोर येते. मात्र आता किमनं पत्नीसोबत मुलीलाही आणून पुन्हा आपल्या विरोधकांना अप्रत्यक्षरित्या धमकी दिल्याचे बोलले जात आहे. किम अनेक रोगांनी त्रस्त आहे, त्यामुळेच त्याच्यानंतर उत्तर कोरियाची धुरा कोणाकडे जाणार याची चर्चा असते. अशात त्याच्या बहिणीचे नाव पुढे होते, पण या बहिणीपेक्षा आपल्याला आपली मुलगीच प्रिय असल्याचे किमनं या छोट्याश्या कृतीतून दाखवून दिल्याचे बोलले जात आहे.
सई बने