शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गळ टाकून बसले आहेत. जगभरात सुरु असलेली युद्ध आपणच थांबवल्याचा दावा ते या पुरस्कारासाठी करत आहेत. युद्ध न थांबवणा-या देशांना अतिरिक्त कर लावून जगभर शांतता आणल्याचा गजब दावा ट्रम्प सध्या करत आहेत. ट्रम्प यांना हा नोबेल पुरस्कार मिळावा म्हणून पाकिस्तानकडूवन वकिली करण्यात येत आहे. स्वतः ट्रम्प यांनीही आपणच या नोबेल पुरस्काराचे पात्र असल्याचा दावाही ठोकला आहे. पण शांततेचा नोबेल पुरस्कार कसा देण्यात येतो, हे जाणणंही गरजेचं आहे. या वर्षीच्या पुरस्कारासाठी तब्बल 338 दावेदार आहेत. यात ट्रम्प यांचा नंबर बराच खाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर होणार आहेत. यावर्षीचा पुरस्कार नेमका कोणाला मिळणार याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवाय नोबेल पुरस्कार ट्रम्प यांना मिळाला नाही तर ट्रम्प यांची त्यावर काय प्रतिक्रीया काय असेल याचीही उत्सुकता आहे. (Donald Trump)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी बरेच आतूर झाले आहेत. यासाठी त्यांनी जगभरात सुरु असलेली युद्ध आपणच थांबवली असा दावा ट्रम्प करत आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धही आपणच थांबवल्याचे ट्रम्प यांनी किमान 6 ते 7 वेळा सांगितले आहे. शिवाय रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचीही भेट घेतली आहे. पण या सर्वात ट्रम्प अपयशी ठरले आहेत, तरीही त्यांनी नोबेलवर असलेला आपला दावा सोडलेला नाही. पण यावर्षीच्या नोबेल पुरस्कारासाठी फक्त डोनाल्ड ट्रम्प हे एकटेच स्पर्धेत नाहीत, तर जभरातीली तब्बल 338 मान्यवर या नोबेल स्पर्धेत आहेत. त्यातही ट्रम्प या स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडल्याचा दावाही आता कऱण्यात येत आहे. (International News)
कारण नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांचे नामांकन अंतिम मुदतीनंतर सादर करण्यात आले. तोपर्यंत 338 नावं या पुरस्कारासाठी दाखल झाली होती. त्यामुळे 10 ऑक्टोबर रोजी जाहीर होणारा हा पुरस्कार ट्रम्प यांना मिळणार नाही, असेही सांगितले जात आहे. या सर्वांसाठी नोबेल पुरस्कार कसा दिला जातो, हे पाहणे गरजेचे आहे. नोबेल पुरस्कारासाठी नॉर्वेजियन संसदेने नियुक्त केलेल्या पाच व्यक्तींचा समावेश असतो. हे सदस्य वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर असतात. यात सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण अशा क्षेत्रांचा समावेश असतो. ही सर्व मंडळी नोबेल पुरस्कार ज्यांच्यामुळे सुरु झाला, त्या अल्फ्रेड नोबेल यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करतात. स्वीडिश उद्योगपती अल्फ्रेड नोबेल यांच्या 1895 च्या मृत्युपत्रात नमूद केलेल्या वर्णनाची पूर्तता करणारा कोणीही नोबेल पुरस्कारासाठी पात्र ठरवला जातो. (Donald Trump)
या मृत्यूपत्रानुसार दोन राष्ट्रांमध्ये बंधुत्व वाढवण्यासाठी, सैन्याच्या कारवाया कमी करण्यासाठी आणि शांतता परिषदांची स्थापना आणि प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्तम काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात यावा, असे स्पष्ट केलेले आहे. सध्याचे नोबेल शांतता पुरस्कार समितीचे सचिव क्रिस्टियन बर्ग हार्पविकेन यांच्या मते, या निकषानुसार विजेता निवडणे सोपे नसते. त्यामुळे या निवड समितीवर असलेल्या सदस्यांची चांगलीच कसोटी लागते. नोबेल पुरस्कारासाठी दरवर्षी अनेक नामांकने येतात. मात्र हे सर्व काम अत्यंत गुप्तपणे चालते. शांतता नोबेल पुरस्कारासाठी दरवर्षी किती नामांकने आली, ही संख्या जाहीर केली जाते. मात्र त्यांची नावे कधीही जाहीर केली जात नाहीत. दरवर्षी राजकीय नेते, देशांचे प्रमुख, इतिहास, सामाजिक विज्ञान, कायदा आणि तत्वज्ञानाचे प्राध्यापक आदींचाही समावेश असतो. नोबेल पुरस्कारासाठी एक वर्षाचा पुरस्कार देऊन झाला, की लगेच नामांकने येऊ लागतात. (International News)
=========
ही नामांकन पाठवण्याची मुदत 31 जानेवारी पर्यंत असते. त्यानंतर सर्व नामांकनांचे पुनरावलोकन केले जाते आणि त्यांतील नावांची छाटणी करुन एक यादी तयार होते. मग या यादीतील नावांवर समितीचे सदस्य चर्चा करतात. ही समिती महिन्यातून अंदाजे सप्टेंबरपर्यंत नोबेल पुरस्कार कोणाला द्यायचा आहे, याचा निर्णय घेते. त्यामुळे आतापर्यंत यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळणार आहे, त्या व्यक्तीचे नाव निश्चित झालेले आहे. 10 ऑक्टोबरला आता कोणाचे नाव नोबेल पुरस्कारासाठी जाहीर होणार याची उत्सुकता लागली आहे. (Donald Trump)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics